समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिका

समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिका
समजून घ्या जमिनीची आरोग्यपत्रिका

बऱ्याच शेतकऱ्यांकडे जमिनीची आरोग्यपत्रिका उपलब्ध आहे. आरोग्यपत्रिकेमुळे जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता लक्षात येते. या आरोग्यपत्रिकेचा अर्थ समजून घेऊन जमिनीतील अन्नद्रव्य संतुलन आणि सुपीकता जपणे आवश्यक आहे. पिकांना जमिनीच्या माध्यमातून पाणी व अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी प्रमाणात झाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. पीक उत्पादनामध्ये एखाद्या अन्नद्रव्याचा जरुरीपेक्षा जास्त वापर केल्यास जमिनीमध्ये उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांचा समतोल बिघडतो. त्यामुळे काही अन्नद्रव्य पिकांकडून जास्त प्रमाणात शोषून घेतली जातात, इतर आवश्‍यक अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीत किंवा असे अन्नद्रव्य जमिनीत असून देखील पिके त्यांचे शोषण करू शकत नाहीत.  उदा. कॅल्शियम या अन्नघटकाचे प्रमाण खूप जास्त झाल्यास स्फुरद व बोरॉनची उपलब्धता कमी होते.

  • पिकांची वाढ होण्यासाठी निरनिराळ्या अन्नद्रव्यांचे संतुलित प्रमाण आवश्‍यक असते. पिकांना आवश्‍यक अन्नद्रव्य वनस्पतींनी शोषून घेण्यासाठी उपलब्ध अवस्थेत व योग्य प्रमाणात जमिनीत असावी लागतात.
  • पिकांना सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता व योग्य प्रमाणात पुरवठा होण्यासाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान असावा.
  • जमिनीतील पोषक अन्नद्रव्यांच्या एकूण साठ्यापैकी फक्त उपलब्ध स्वरूपातील साठा वनस्पतींना उपयोगी पडतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून जमिनीची आरोग्यपत्रिका स्वतःजवळ ठेवावी.
  • जमिनीचा सामू :

  • सामूवर जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्म अवलंबून असतात.
  • सर्वसाधारणपणे कोणत्याही शुद्ध द्रावणाचा सामू सात असेल तर तो पदार्थ उदासीन असतो. सामू सातपेक्षा कमी असेल तर आम्लधर्मी आणि सातपेक्षा जास्त असेल तर अल्कधर्मी असे म्हणतात.
  • जमिनीत असणारे खनिज पदार्थ, सेंद्रिय पदार्थ, सूक्ष्मजीव, मशागतीची पद्धत, जमिनीत घेतलेली पिके, सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे गुणधर्म यावर जमिनीचा सामू अवलंबून असतो.
  • जमिनीत असलेले पाणी विविध घटकांनी युक्त असल्याने जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ हा उदासीन गृहीत धरला जातो.
  • जमिनीची सुपिकता व उत्पादकता या दोन्ही घटकांचा निर्देशांक म्हणून जमिनीचा सामू ओळखला जातो. पिकांना होणारा अन्नपुरवठा तसेच जमिनीची रचना व पोत टिकवून ठेवण्यासाठी जमिनीचा सामू माहिती असणे आवश्‍यक आहे.
  •             जमिनीच्या आरोग्यपत्रिकेसाठी आवश्यक शेतजमिनीचा तपशील

     १) शेतकऱ्याचे नाव व पत्ता     ५) जमिनीचा प्रकार
     २) शेतजमिनीचा सर्व्हे / गट नं. / शेताचे नाव    ६) मागील हंगामातील वापरलेल्या खतांची नावे व प्रमाण
     ३) नमुना घेतल्याची तारीख    ७) सिंचनाचा प्रकार
     ४) पूर्वी असलेले पीक  

      ८) पुढे घ्यावयाचे पीक

    जमिनीच्या आरोग्यपत्रिकेचा नमुना

     गुणधर्म      योग्य प्रमाण     शेरा
     जमिनीचा सामू (पीएच)    ६.५ ते ७.५     ७.९
     क्षारता (विद्युत वाहकता)   १ डीएसएमपेक्षा कमी     ०.५
     सेंद्रीय कर्ब      ०.५ ते ०.७५ टक्के     ०.४
     मुक्त चुनखडी   ५ टक्केपेक्षा कमी     ८.०
     उपलब्ध नत्र      २८१ ते ४२० कि./हेक्टर     ११४.००
     उपलब्ध स्फुरद      १५ ते २१ कि/हेक्टर     १३.५२
     उपलब्ध पालाश    १८१ ते २४० कि./हेक्टर      ५१६.००
     उपलब्ध गंधक    १० पीपीएम पेक्षा जास्त  ८.७२
     डीटीपीए लोह      ४.५ पीपीएम पेक्षा जास्त    १३.१७
     डीटीपीए जस्त    ०.६ पीपीएम पेक्षा जास्त      ०.५३
     डीटीपीए तांबे      ०.२ पीपीएम पेक्षा जास्त   ३.९
     डीटीपीए मंगल      २ पीपीएम पेक्षा जास्त     ११.३४
     उपलब्ध बोरॉन   ०.५ पीपीएम पेक्षा जास्त  ०.३५

    आरोग्यपत्रिकेचे वाचन

  • वरील आरोग्यपत्रिकेमध्ये जमिनीचा सामू ७.९ दर्शविलेला आहे. यावरून आपल्या असे लक्षात येते की, माती विम्लधर्मी होण्याच्या मार्गावर आहे. साधारणपणे ७.५ ते ७.८ पर्यंत किंचित विम्लधर्मी, ७.९ ते ८.२ विम्लधर्मी  आणि ८.२ पेक्षा जास्त सामू असणाऱ्या जमिनी समस्यायुक्त जमिनी (चोपण, क्षारपड, चिबड व चोपण क्षारपट जमीन) म्हणून वर्गीकरण केले जाते.
  • आरोग्यपत्रिकेनुसार करावयाची कार्यवाही जमिनीचा सामू ७.९ वरून ७.५ पर्यंत कमी करण्यासाठी खालील प्रकारे उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

  • प्रति हेक्‍टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे किंवा कंपोस्ट, गांडूळ खत, साखर कारखान्यातील मळी (प्रेसमड) प्रति हेक्‍टरी २ ते २.५ टन या प्रमाणात वापर करावा.
  • हिरवळीच्या खतासाठी ताग, धैंचा, शेवरी यासारखी पिके घेऊन फुलावर येताच जमिनीत  गाडावीत.
  • जमिनीत हे घटक मिसळल्यानंतर आम्लता निर्माण करणाऱ्या रासायनिक खतांचा वापर करावा. उदा. अमोनियम सल्फेट
  • सूक्ष्मजीवांच्या कार्यासाठी आवश्‍यक जमिनीचा सामू

  • सामू उदासीन ते थोडासा विम्ल असलेल्या जमिनीत जिवाणूंची वाढ चांगली होते.
  • अति आम्ल जमिनीत सूक्ष्म जिवाणूंची क्रिया कमी प्रमाणात होते. तसेच ॲझेटोबॅक्टर जिवाणू आणि गांडूळ यांची वाढ देखील होत नाही. अशा जमिनीत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. अशा जमिनीत नत्रयुक्त सेंद्रिय पदार्थांचे रुपांतर उपलब्ध नत्रामध्ये होण्यास विलंब लागतो.
  •  सूक्ष्मजिवांचा  प्रकार   अधिकतम कार्यासाठी  आवश्‍यक असणारा जमिनीचा सामू
     ॲक्टिनो मायसिटस    ५.५-७.५
     उपयुक्त बुरशी   ५.५-७.५
     उपयुक्त जिवाणू      ५.५-७.५

    अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी आवश्यक जमिनीचा सामू

    अन्नद्रव्य     अन्नद्रव्य उपलब्ध असणारा जमिनीचा सामू    अन्नद्रव्य    अन्नद्रव्य उपलब्ध असणारा जमिनीचा सामू
     लोह     ३.०-६.५     नत्र     ६-७.५
     मंगल     ३.०-६.५      स्फुरद     ६-७.०
     जस्त    ३.५-७.०     पालाश    ६-८.०
     तांबे      ५.०-७.५    गंधक     ६-७.५
     मोलाब्द    ६.५-९.०    कॅल्शियम     ६-८.०
     बोरॉन   ५.०-७.२      मॅग्नेशियम     ६-८.०

    संपर्क :  डॉ. हरिहर कौसडीकर, ७५८८०८२०४९ (संचालक, संशोधन, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com