agricultural news in marathi Use of artificial insemination for goats | Agrowon

शेळ्यांसाठी कृत्रिम रेतनाचा वापर

डॉ. रुचिका सांगळे, डॉ. चैतन्य पावशे, डॉ. श्याम देशमुख
मंगळवार, 3 ऑगस्ट 2021

कृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून आपल्या कळपात चांगल्या अनुवंशिकतेचे नर किंवा मादी पिले तयार करू शकतो. चांगले आनुवंशिक गुण असणारी पिले लवकर वाढतात. यातून शेळीपालनाची प्रगती होते.
 

कृत्रिम रेतनाद्वारे शेळ्यांमध्ये गर्भधारणा करून आपल्या कळपात चांगल्या अनुवंशिकतेचे नर किंवा मादी पिले तयार करू शकतो. चांगले आनुवंशिक गुण असणारी पिले लवकर वाढतात. यातून शेळीपालनाची प्रगती होते.

शेळीपालनासाठी अत्यंत कमी जागा लागते. बोकडास १५ चौ.फूट, शेळीस १० चौ. फूट आणि करडास ५ चौ.फूट इतकी जागा पुरेशी असते. मांसाच्या बरोबरीने दूध उत्पादनही मिळते. कातडीलाही चांगला दर मिळतो. इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत शेळ्यांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण खूप कमी आहे. शेळ्या एका वेताला २ ते ३ करडे देतात. शेळीपालन करताना उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने सुधारित व्यवस्थापन पद्धती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज आहे. यात ऋतुचक्राचे नियमन, कृत्रिम रेतन या पद्धतींचा अवलंब करून उत्तम व्यवस्थापनाच्या जोडीने उत्पादनात वाढ शक्य आहे.

शेळीचे प्रजोत्पादन नियोजन 

 • समशीतोष्ण कटिबंधामध्ये विशिष्ट ऋतूमध्ये शेळ्या माजावर येतात. उष्णकटिबंधात शेळ्या वर्षातील कोणत्याही ऋतूत माजावर येतात. बोकड १० महिन्यांचा झाल्यावर, तर शेळी ६ महिन्यांनंतर प्रजननक्षम होते.
 • प्रजोत्पादनासाठी प्रामुख्याने तीव्र वाढीच्या व मोठ्या आकाराच्या चौदा महिने वयाच्या नर बोकडाचा आणि एक वर्षे वयाच्या मादी शेळीचा उपयोग केला जातो. साधारणतः २ वर्षांमध्ये शेळ्या ३ वेळा वितात.
 • शेळ्या सुमारे १८ ते २१ दिवसांच्या अंतराने माजावर येतात. ही अवस्था २४-३६ तास टिकते. माजावर आल्याचे लक्षण म्हणजे शेपटी जोर-जोराने इकडे-तिकडे हलविणे, त्याच्या जोडीला त्यांचे बाह्य जननेंद्रिय थोडेसे सुजल्यासारखे आणि योनीमार्गातील स्रावामुळे ओले दिसते. त्यांची भूक मंदावते आणि मूत्रत्यागाची वारंवारता वाढते. माजावर आलेली मादी स्वतः नर असल्यासारखी इतर मादीच्या अंगावर चढण्याचा प्रयत्न करते किंवा इतर माद्यांस अंगावर चढू देते.
 • माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यावर १२ ते १८ तासांच्या काळात मादीचा समागम घडविण्यात यायला हवा. काही माद्यांमध्ये माज २-३ दिवस टिकतो, त्यामुळे त्यांचा समागम पुन्हा दुसऱ्या दिवशी घडवायला हवा. गर्भधारणेनंतर गर्भावस्थेचा कालावधी हा सुमारे १४५ ते १५० दिवसांचा असतो.

शेळीपालनात कृत्रिम रेतनाचा वापर 

 • महाराष्ट्रात नोंदणीकृत चार शेळ्यांच्या जाती आहेत. यामध्ये उस्मानाबादी शेळ्यांची संख्या सर्वांत जास्त आहे. त्याखालोखाल संगमनेरी, बेरारी, कोकण कन्याळ आणि उर्वरित शेळ्या गावठी या प्रकारात मोडतात.
 • सध्या कमी वयामध्ये बोकड मांसासाठी विकले जातात, त्यामुळे पैदाशीकरिता चांगले आनुवंशिक गुणधर्म असणारे बोकड उपलब्ध होत नाहीत. यामुळे कमी प्रतीचे बोकड पैदाशीसाठी वापरले जातात किंवा बोकड उपलब्ध न झाल्याने शेळ्यांचा माज वाया जाऊन दोन वेतांतील अंतर वाढल्याने उत्पन्नामध्ये घट होते. अशावेळी अतिउच्च आनुवंशिक गुण असलेल्या जातिवंत नराच्या शीत वीर्य कांड्या वापरून कृत्रिम रेतन केल्यास आपल्या प्रक्षेत्रावर उच्च आनुवंशिकता असणाऱ्या नराची किंवा मादीची पैदास शक्य होते.
 • कृत्रिम रेतन हे लैंगिक रोगप्रसार टाळण्यासाठी उत्तम तंत्र आहे. प्रसंगी शारीरिक अपंगत्वावर मात करून प्रजनन सुलभता कृत्रिम रेतनाने सध्या करता येते.
 • कृत्रिम रेतन हे संकरीकरणाच्या पैदाशीसाठी अतिशय फायदेशीर तंत्र ठरते. नैसर्गिक रेतनात नराकडून उद्‌भवणारे अनेक दोष याद्वारे टाळण्यास मदत होते. सर्वसाधारण शेळ्यांसाठी नर ठेवणे त्यांचे संगोपन करणे खर्चिक आहे, परंतु या तंत्रज्ञानामुळे बोकडरहित प्रक्षेत्रावर सिद्ध बोकडाचा वापर करणे शक्य आहे.

अतिशीत रेतमात्रेची निर्मिती 

 • कृत्रिम रेतन पद्धतीत सिद्ध नर बोकडाचा वापर रेतमात्रेद्वारे केला जातो. नर बोकड प्रजननक्षम झाल्यावर साधारणपणे आठवड्यातून दोनदा त्याचे वीर्य कृत्रिम योनी पद्धतीने संकलित केले जाते. संकलित केलेले वीर्य त्यात योग्य त्या माध्यमाची मात्रा वाढवून वीर्यकांड्या बनवण्यासाठी वापरले जाते. त्यानंतर वीर्यकांड्यांची गुणवत्ता प्रयोग शाळेत वेगवेगळ्या चाचण्यांद्वारे ठरवतात.
 • कृत्रिम रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या रेतमात्रा -१९६ अंश सेल्सिअस तापमानात द्रव नत्र पात्रात साठवतात. रेतमात्रेमध्ये योग्य प्रतीचे योग्य संख्येत शुक्राणू असतात.
 • रेतमात्रेच्या वापरापूर्वी शुक्राणू शरीर तापमानात पुनर्उत्तेजित केले जातात. त्यानंतर ते हालचाल क्षमता आणि फलनक्षमता धारण करतात.
 • रेतमात्रेत असणाऱ्या शुक्राणूंची फलनक्षमता अतिउच्च असल्याने यशस्वी गर्भधारणा लाभते.
 • बाएफ (उरुळीकांचन, जि.पुणे) येथे अतिउच्च अनुवंशिकतेच्या उस्मानाबादी, बेरारी, संगमनेरी, सिरोही, जमनापारी, बिटल, बारबेरी, ब्लॅक बेंगाल या शेळ्यांच्या रेतमात्रा कृत्रिम रेतनासाठी उपलब्ध करून दिल्या जातात.

कृत्रिम रेतनाची वेळ 

 • यशस्वी गर्भधारणेचा कृत्रिम रेतनाच्या अचूक ठरवलेल्या योग्य वेळेशी संबंधित असते. शेळ्यांचा ऋतुकाल हा २४ ते ४८ तासांसाठी टिकतो, माजावर येण्याची लक्षणे सुरू झाल्यानंतर १८ ते २० तासांनंतर शेळ्यांमध्ये कृत्रिम रेतन अपेक्षित असते.
 • अचूक रेतनाच्या कार्यपद्धतीत स्त्रीबीज सुटण्याची वेळ आणि शुक्राणू उपलब्धतेची वेळ जुळून आल्यामुळे फलन होण्याचे प्रमाण वाढते. कृत्रिम रेतनाची वेळ शक्यतो तीव्र ऊन टाळून सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा असावी.

कृत्रिम रेतनाची जागा 

 • कृत्रिम रेतन हे जैवतंत्रज्ञान असल्यामुळे अचूक पद्धतीने माजावरील शेळीत रेतन करणे अपेक्षित असते. कृत्रिम रेतनासाठी आणलेल्या शेळीस रेतनापूर्वी २० मिनिटांची विश्रांती देणे गरजेचे आहे.
 • सर्वप्रथम माजावर आलेल्या शेळीस रेतन सापळ्यात योग्य प्रकारे नियंत्रित करावे लागते. त्यानंतर रेतमात्रा द्रवीकरण म्हणजे अतिशीत तापमानात असणाऱ्या गोठीत रेतमात्रा सामान्य तापमानात आणल्या जातात. नंतर रेतमात्रा कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या गनमध्ये अचूक बसवली जाते.
 • रेतन सापळ्यात नियंत्रित शेळीचे मागील दोन्ही पाय उचलून किंवा घट्ट पकडून ठेवण्यात येतात जेणेकरून शेळी बसणार नाही याची काळजी घेतली जाते. त्यानंतर रेतनाची गन योनीमार्गात प्रवेशीत केल्यानंतर योनीमार्गात वरच्या बाजूने गोलाकार गतीने आणि हळुवार दाब देऊन गर्भाशयमुखाच्या घड्यांमधून पुढे सरकवतात. रेतन गन गर्भाशयमुखात सरळ रेषेत आत गेल्यानंतर वर्धित रेत थेंबाथेंबाने पडेल अशाप्रकारे सोडले जाते.
 • रेतन कार्य करताना शेळी हालचाल करणार नाही, अस्वस्थ होणार नाही, तसेच रेतन गनमुळे जननेंद्रियास इजा होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
 • कृत्रिम रेतन पद्धतीचा अवलंब पशुतज्ज्ञाकडूनच करावा. सोबतीने ऋतुचक्राचे नियमन करून कृत्रिम रेतन केल्यास अधिक फायदेशीर ठरते.

ऋतुचक्राचे नियमन व कृत्रिम रेतन 

 • बऱ्याचवेळा शेळ्यांच्या गर्भधारणेची वेळ माहिती नसल्यामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे गाभण काळात शेळयांकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे शेळ्यांमध्ये होणारे गर्भपात तसेच पुरेसे लक्ष न दिल्याने प्रसूतीच्या वेळी शेळ्यांना होणारा त्रास किंवा जन्माला येणारी अशक्त पिले यामुळे नुकसान सोसावे लागते. अशावेळी ऋतुचक्राचे नियमन उपयुक्त ठरते.
 • या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याकडे असणाऱ्या शेळी कळपास विशिष्ट ऋतूचा विचार न करता संप्रेरकांच्या उपचाराने शेळ्या ठरावीक वेळेत माजावर आणून फळवणे शक्य आहे.
 • एकाच वेळी शेळ्या माजावर आणायला प्रजननासाठी लागणाऱ्या संप्रेरकांचा वापर केला जातो. यामध्ये संप्रेरक असलेले स्पॉन्जेस शेळ्यांच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ साधारणपणे १० ते १२ दिवस ठेवतात. सदर स्पॉन्जेस बाहेर काढल्यानंतर काही संप्रेरक दिले जातात आणि साधारणपणे ४८ ते ७२ तासांत बहुतांशी शेळ्या माजावर येतात. त्यानंतर कृत्रिम रेतन पद्धतीने भरवल्या जातात. ऋतुचक्राचे नियमन करून माजाची खात्री झाल्यामुळे गर्भाधारणेच्या प्रमाणातही वाढ दिसून येते.

संपर्क ः डॉ. चैतन्य पावशे, ९९२१६११८९९
(डॉ. पावशे हे स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था,अकोला येथील पशुप्रजनन स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागाचे प्रमुख, डॉ. देशमुख हे सहायक प्राध्यापक आणि डॉ. सांगळे या संशोधक विद्यार्थिनी आहेत.)


इतर कृषिपूरक
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...
गाय निगेटीव्ह एनर्जीमध्ये का जाते?आपल्या गोठ्यातील जनावरांचे संगोपन करत असताना...
संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात...
गायी-म्हशीमध्ये गर्भपाताची समस्यासंसर्गिक गर्भपात हा एक जीवाणूजन्य रोग असून त्याचा...
खुडूक कोंबडी कशी ओळखावी?अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः...
शेतकरी बापाचा शेतकरी पोरगा; 'आयटी'ची...वृत्तसंस्था - जम्मूतील तरुणांना रोजगार देण्यासाठी...
स्टार्टर, ग्रोवर आणि फिनिशर म्हणजे काय? कोंबडीच्या वयानुसार त्यांच्या खाद्यात बदल करावा...
सुप्तअवस्थेतील कासदाह कसा ओळखाल? दुग्धव्यवसायातील सर्वात खर्चिक आजार म्हणजे कासदाह...
जनावरांमध्ये प्रतिजैविकांचा करा योग्य...योग्य प्रमाणात आणि विशिष्ट कालावधीत...
जनावरांच्या वंध्यत्वास कारणीभूत घटक प्रत्येक पशुपालकाला आपल्या गोठ्यात जास्त दूध...
आजारी शेळ्यांची ओळख कशी करावी?शेळी पालन व्यवसायामध्ये संगोपन व व्यवस्थापनाला...