जमीन सुपीकतेसाठी करा द्रवरूप जिवाणूखतांचा वापर

जीवाणू खतांच्या वापराची पद्धत
जीवाणू खतांच्या वापराची पद्धत

जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी जिवाणूखताचा वापर विविधप्रकारे करता येतो. जमिनीतून, पानांवर फवारणीद्वारे किंवा सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान कुजवणीसाठी द्रवरूप जैविक खते उपयुक्त ठरतात. त्यांचा वापर करण्याविषयी माहिती घेऊ.

जमिनीतील जिवाणू हे मातीची सुपीकतेमध्ये आणि पिकांच्या शरीरातील विविध क्रियांचा वेग वाढवण्यामध्ये मोलाची भूमिका निभावतात. त्याच प्रमाणे शेतामध्ये उपलब्ध सेंद्रिय पदार्थांना कुजवण्याच्या प्रक्रियेतही ते उपयुक्त ठरतात. अशा योग्य प्रकारे कुजलेल्या सेंद्रिय खतातून पिकांना पोषक द्रव्ये मिळतात. अशा उपयुक्त जिवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढवण्यासाठी जिवाणूखतांचा वापर विविध प्रकारे करता येतो. अलीकडे त्यात द्रवरूप जिवाणू खतेही उपलब्ध होत आहे. अशा जिवाणूखतांच्या वापरातून जमिनीची सुपीकता व उत्पादनामध्ये वाढ साधणे शक्य होते.

जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण पिकांच्या वाढीसाठी आवश्यक ती मूलद्रव्ये उपलब्ध करणामध्ये विविध जिवाणू कार्यरत असतात. त्यात यामध्ये असहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारे, स्फुरद, सिलिकेट, लोह व जस्त विरघळविणारे, पालाश उपलब्ध करून देणारे, गंधक विघटन करणारे, प्रकाशसंश्लेषण करणारे काही यीस्ट व अॅक्टिनोमायसेट्स आदी जिवाणू असतात. अशा जिवाणूंचे कल्चर खास प्रयोगशाळेमध्ये तयार करण्यात येते. असे विविध जिवाणू वेगवेगळ्या स्वरुपामध्ये किंवा एकमेकांना पूरक असल्यास मिश्रणामध्ये वापरता येतात.   फायदे

  • जमिनीमध्ये उपयुक्त जिवाणूंची संख्या जोमाने वाढते.
  • जमिनीची जैविक व भौतिक सुपीकता वाढते.
  • असहजीवी जिवाणूंमार्फत नत्र स्थिरीकरणाद्वारे वातावरणातील नत्र पिकास उपलब्ध होतो. पिकांना स्फुरद, पालाश, लोह,जस्त, गंधक, सिलिकॉन अशा अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी या रासायनिक खतांची मात्रा कमी करणे शक्य होते. खर्चात बचत होते.
  • पिकाच्या निरोगी वाढीला चालना मिळते. उत्पादनात वाढ होते.
  • वापरण्याची पद्धत

  • ऊस लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर ४५, ६० व ९० दिवसांनी प्रत्येक वेळी हेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी.
  • खोडवा ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत व त्यानंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी प्रतिहेक्टरी २.५ लिटर या प्रमाणात २०० लिटर पाण्यात मिसळून पंपाच्या सहाय्याने आळवणी करावी.
  • किंवा लागवड व खोडवा उसात वर उल्लेखलेल्या वेळी ठिबक सिंचनातूनही देता येते. त्यासाठी वेगळ्या टाकीत २.५ लिटर द्रवरूप जिवाणू खत प्रति २०० लिटर पाणी याप्रमाणात द्रावण करावे.
  • किंवा जिवाणू द्रवरूप खत एक लिटर प्रति हेक्टर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या १०० ते २०० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खतात मिसळावे. जमिनीत ओल असताना उसाच्या बाजूला चळी घेऊन रांगोळी पद्धतीने समप्रमाणात सरीत मिसळावे.
  • खोडव्यात आळवणी करावयाची झाल्यास उसाच्या बुडख्याजवळ ओळीलगत करावी.
  • पानांवर फवारणीसाठी जिवाणू मिश्रण असिटोबॅक्टर, डायझोट्रॉफिकस, बुरखोलडेरिया, हर्बास्पिरीलम, अॅझॉस्पिरीलम व अॅझॉअरकस आदी जिवाणूंचे एकत्रित मिश्रण उपलब्ध आहे.  त्याची पानावर फवारणी केल्यास पिकाच्या अंतर्गत भागातील जैविक गुणवत्ता वाढून आरोग्यासाठी फायदा होतो. उदा. ऊस पिकामध्ये प्रतिहेक्टरी फवारणी ३ लिटर प्रति ५०० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. त्यातून नत्राची उपलब्धता वाढते. नत्रयुक्त रासायनिक खताची मात्रा कमी करता येते. तसेच उसातील साखर उताऱ्यात वाढ होते. ही फवारणी ऊस लागवडीनंतर ६० दिवसांपासून मोठ्या बांधणीपर्यंत (१२० दिवस) घ्यावी. खोडवा पिकामध्ये ऊस तुटल्यानंतर ४५ दिवस ते मोठ्या बांधणीपर्यंत घ्यावी. फवारणी सकाळी ११च्या आत किंवा संध्याकाळी ४ नंतर करावी.

    पाचट व इतर सेंद्रिय पदार्थ विघटन करणारे जिवाणू पिकाचे उर्वरीत अवशेष उदा. पालापाचोळा, टाकाऊ भाग, उसाचे पाचट यांचे शेतातच विघटन करण्यासाठी विशेष जिवाणू कार्यरत असतात. अशा जिवाणूंचा वापर केल्यास वेगाने विघटन होऊन पिकांना सेंद्रिय कर्बासह विविध मुलद्रव्ये उपलब्ध होतात. उदा. उसामध्ये पाचट जाळून टाकले जाते. त्याऐवजी जिवाणूंचा वापर केल्यास त्याचे विघटन होऊन जमिनीच्या सुपीकतेला फायदा होतो. जमिनीचा पोत सुधारून ती भुसभुशीत होते. हवा खेळती राहते. प्रमाण :  साधारणत: प्रतिहेक्टरी १० ते १३ टन पाचट निघते. त्यासाठी २.५ लिटर प्रतिहेक्टरी सेंद्रिय पदार्थांचे विघटन करणारे द्रवरुप जिवाणू वापरावेत.

    द्रवरूप जिवाणू खतांमधील घटक द्रवरूप जिवाणू खतात काही जिवंत व सुप्तावस्थेतील जिवाणू, जिवाणूंचे उत्सर्जित होणारे स्राव यांचा वापर केला जातो. याशिवाय पेशीसंवर्धक आणि पेशी संरक्षकांचाही वापर केला जातो. ही खते प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा पिशवीत निर्जंतुक वातावरणात हवाबंद केली जातात. त्यामुळे ती जास्त काळ टिकविता व वापरता येतात. त्यातील जिवाणूंची संख्या दोन वर्षांपर्यंत कमी होत नाही.

  • द्रवरूप खते संपृक्त स्वरूपात असतात, त्यामुळे त्यांची मात्रा कमी प्रमाणात लागते.
  • द्रवरुप जिवाणूखतांचा वापर घ्यावयाची काळजी

  • द्रवरूप जिवाणूखते सावलीत ठेवावीत (२५ ते ३० अंश सेल्सिअस)
  • बियाणे प्रक्रियेसाठी प्रथम बुरशीनाशक मग कीटकनाशक व त्यानंतर द्रवरूप जिवाणू खताची प्रक्रिया करावी.
  • द्रवरूप जिवाणूखते वापरासंबंधी जी अंतिम तारीख दिलेली असते, त्यापूर्वीच ती वापरावीत.
  • द्रवरूप जिवाणूखते वापरावयाच्या विविध पद्धती  

  • बेणेप्रक्रिया : ॲसिटोबॅक्टर द्रवरूप जिवाणू खत १ लिटर प्रति २०० लिटर पाणी या प्रमाणात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे किंवा बियाणे १० ते ३० मिनिटे बुडवावे. नंतर सावलीत वाळवून लागवड करावी.
  • फवारणी : फवारणीसाठी वापरावयाचे जिवाणू मिश्रण हेक्टरी ३ लिटर प्रति ७५० लिटर पाणी याप्रमाणात वापरावे.
  • रोपप्रक्रिया  : रोपाची मुळे बुडतील इतके पाणी घ्यावे. त्या पाण्यात प्रतिलिटरला १० मि.लि. द्रवरूप जिवाणू खत मिसळावे. या द्रावणात मुळ्या १० ते २० मिनिटे बुडवाव्यात व नंतर पुनर्लागवड करावी.
  • जमिनीत वापर : जमिनीत वापरासाठी द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रतिहेक्टरी २.५ लिटर प्रति ७५० लिटर पाणी या प्रमाणे फवारावे. किंवा १५०० किलो शेणखत/ कंपोस्ट खत/ माती यात मिसळून जमिनीत सर्वत्र सारखे पसरावे. त्याच प्रमाणे झारी, फवारणी पंप किंवा सूक्ष्म सिंचन संच प्रणालीद्वारे द्रवरूप जिवाणू खते देता येतात.
  • सेंद्रिय खतांच्या गुणधर्मात वाढ : गांडूळ खत आणि कंपोस्ट खतामध्ये जमिनीत वापरावयाचे द्रवरूप जिवाणू मिश्रण प्रतिटन १ लिटर याप्रमाणात वापरावे. त्यामुळे त्यांच्या उपयुक्त गुणधर्मात वाढ होते.
  • वापरामुळे होणारे फायदे

  • पिकांच्या उगवणीमध्ये ८ ते २२ टक्के वाढ होऊन मुळांची वाढ चांगली होते.
  • नत्र, स्फुरद, पालाश, गंधक व इतर मूलद्रव्यांची उपलब्धता वाढते. परिणामी रासायनिक खतांची २५ ते ५० टक्के बचत होते.
  • पीकवाढीसाठी आवश्यक पदार्थांची निर्मिती करतात. उदा. जिब्रॅलिक ॲसिडमुळे उगवण शक्ती वाढते.
  • जमिनीची जैविक सुपीकता व पोत सुधारतो. पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ होते. पाण्याचा ताण सहन करण्याची पिकाची क्षमता वाढते.
  • पिकांची उगवण क्षमता, फुटवे येण्याची क्षमता, मुळांची संख्या, फूल व फळ धारण करण्याची क्षमता वाढते. परिणामी उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते, त्याची प्रत सुधारते. द्रवरूप डिंकपोस्टिंग कल्चर जमिनीतील पिकांच्या उरलेल्या अवशेषांचे विघटन करतात, त्यामुळे कर्ब व नत्र यांचे गुणोत्तर सुधारते.
  • उपयुक्त जिवाणूंनी तयार केलेल्या प्रतिजैविकांमुळे रोगकारक बुरशीचे नियंत्रण होते. पिकाची रोग व कीड प्रतिकार क्षमता वाढते.
  • संपर्क : रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१ (सहाय्यक प्राध्यापक, सौ. के. एस. के. कृषी महाविद्यालय, बीड.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com