agricultural news in marathi Value added fodder production techniques | Agrowon

मूल्यवर्धित चारानिर्मिती तंत्र

डॉ. नरेंद्र प्रसादे, डॉ. बाळकृष्ण देसाई
गुरुवार, 28 ऑक्टोबर 2021

पावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते. उपलब्ध असलेला हिरवा चारा तसेच सुका चारा यांची उपलब्धता आणि पोषणमूल्य वाढविण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करून मूल्यवर्धन करावे.
 

पावसाळ्यानंतर कोकणात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते. उपलब्ध असलेला हिरवा चारा तसेच सुका चारा यांची उपलब्धता आणि पोषणमूल्य वाढविण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करून मूल्यवर्धन करावे.

भात पेंढ्यांवर युरिया प्रक्रिया 
कोकणच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पावसाळ्यात भाताची एकपीक पद्धती आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाईमुळे हिरवा चारा मिळत नाही. अशा वेळी पशूआहाराची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरिया प्रक्रिया महत्त्वाची ठरते. 
वाळलेल्या वैरणीवर प्रक्रिया करण्याकरिता घटक 

 •     भाताचा पेंढा,नाचणी, वरीचे काड. 
 •     युरिया प्रति १०० किलो वैरणीस ४ किलो. 
 •     प्लॅस्टिकची बादली व १०० लिटर क्षमतेची टाकी. 
 •     मिश्रण शिंपडण्यासाठी झारी. 
 •     लाकडी दाताळे किंवा फावडे. 
 •     प्लॅस्टिकचा कागद / गोणपाटाचे पोते. 
 •     अर्धा किलो मीठ. 

टीप
जनावरांमध्ये असलेल्या पोटातील चार कप्पे व त्यातील सुक्ष्मजीवांमुळे ४ टक्क्यांपर्यंत युरिया असलेला चारा ही रवंथ करणारी जनावरे पचवू शकतात. त्यापेक्षा जास्त युरियाचे प्रमाण झाल्यास विषबाधा होऊ शकते. 

चाऱ्यावर युरिया प्रक्रिया 

 • प्रकियेकरीता सिमेंट काँक्रीटची ओल नसलेली किंवा सारवलेली स्वच्छ कोरडी जागा निवडावी. 
 • वाळलेला १०० किलो भाताचा  पेंढा या जागेवर व्यवस्थित पसरून ४ ते ६ इंच उंचीचा समान थर तयार करावा. 
 • प्लॅस्टिकच्या टाकीत ४० लिटर पाणी घेऊन त्यामध्ये ४ किलोग्रॅम युरिया पूर्णपणे विरघळून घ्यावा 
 • युरियाचे तयार केलेले द्रावण वाळलेल्या वैरणीवर समप्रमाणात झारीने शिंपडून घ्यावे. 
 • लाकडी दाताळ्याच्या साह्याने किंवा हाताने वैरणीचा थर उलटा करावा. 
 • उर्वरित मिश्रणात अर्धा किलो मीठ विरघळून पूर्ण मिश्रण पुन्हा वरील पद्धतीने वैरणीवर फवारून घ्यावा. 
 • प्रक्रिया केलेल्या वैरणीचा ढीग करावा. ढीग करताना वैरणीच्या थरावर थर देऊन दाबून उडवी तयार करावी. 
 • वैरणीचा ढीग प्लॅस्टिक कागदाच्या साह्याने पूर्णपणे झाकून ठेवावा. 
 • चार आठवडे वाळलेल्या वैरणीचा रंग पिवळा सोनेरी होऊन वैरण खाण्यास योग्य अशी तयार होते. 

हायड्रोपोनिक्स चारा 

 • या तंत्राने चारा उत्पादन करण्यासाठी ७५ ते ९० टक्के क्षमतेचे शेडनेट, फॉगर पद्धत, टायमर, प्लॅस्टिक ट्रे, इत्यादी साधनसामग्रीचा वापर करून शेड तयार करावी. 
 • बियाणे : चारानिर्मितीसाठी शुद्ध, चांगल्या प्रतीचे मका, गहू, बार्ली, ज्वारी, बाजरी इत्यादी बियाण्यांचा वापर करावा. यामध्ये मका बियाण्यांपासून तुलनेने चांगला चारा तयार होतो. 

चारानिर्मिती पद्धत 

 • एक किलो निवडलेले बियाणे २ लिटर कोमट पाण्यात १८ ते २४ तास भिजत ठेवावे. 
 • भिजवलेले बियाणे ओल्या गोणपाटात गुंडाळून २४ तास अंधाऱ्या जागेत / खोलीत ठेवावे.
 • २४ तासानंतर या बियाण्यास मोड येणास सुरुवात होते. हे मोड आलेले बियाणे ३ X २ फूट आकाराच्या स्वच्छ प्लॅस्टिक ट्रेमध्ये पसरून घ्यावे. त्यावर बुरशीची वाढ होऊ नये यासाठी ५ टक्के मिठाचे पाणी शिंपडावे. 
 • यानंतर दर दोन तासांच्या फरकाने २ मिनिटे या प्रमाणात फॉगर पद्धतीने किंवा झारीने पाणी द्यावे. एका ट्रे साठी साधारणतः प्रति दिवस २५० ते ३०० मिलि पाणी आवश्यक आहे. 
 • अशा पद्धतीने मोड आलेल्या धान्यापासून ८ ते १० दिवसांत २० ते २५ सेंटीमिटरपर्यंत वाढ झालेला ६ ते ८ किलो उत्तम प्रतीचा हिरवा चारा मिळतो. 
 • पारंपारिक पद्धतीने मका चारा उत्पादनास लागणारा ६० दिवसांचा कालावधी हायड्रोपोनिक पद्धतीने ८ ते १० दिवसांत करता येतो. 
 • हायड्रोपोनिक्स मका चाऱ्यामध्ये कमी तंतुमय पदार्थ (१४.०७ %), पिष्टमय पदार्थ (६६.७२ %) असतात. पारंपारिक मका चाऱ्यामध्ये तंतूमय पदार्थ (२५.९२ %) आणि कमी पिष्टमय पदार्थ (५१.७८% ) असतात.
 • हायड्रोपोनिक्स मका चारा अधिक रुचकर, लुसलुशीत, पौष्टिक, चवदार, पचनीय असतो. 
 • जनावरांना चारा देण्याचे प्रमाण ः दुभती जनावरे १०-१२ किलो/दिवस आणि भाकड जनावरे ६-८ किलो/दिवस

हिरव्या चाऱ्यापासून मुरघास 

 • मुरघासासाठी मका, ओट, उसाचे वाढे (शेंडे), संकरित नेपिअर, ज्वारी (कडवळ), बाजरी, गिनी गवत, गिरीपुष्प या पिकांची निवड करावी. 
 • १०० किलो कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी १ किलो युरिया, ४ किलो उसाची मळी किंवा गूळ, १ किलो मीठ, ०.१ टक्के डाय कॅल्शिअम फॉस्फेट आणि १ लिटर ताकाची गरज असते. हे  घटक वेगवेगळ्या भांड्यात घेऊन १० ते १५ लिटर पाण्यात विरघळून घ्यावेत. त्यानंतर द्रावण एकत्र करावे. 

मुरघास बनविण्याच्या पद्धती 

 • चर पद्धत  
 • खड्डा पद्धत  
 • मनोरा पद्धत  
 • प्लॅस्टिक पिशवी पद्धत

मुरघास तयार करण्यासाठी जागेची निवड 

 • मुरघास बनविण्यासाठी खोदाव्या लागणाऱ्या खड्डयाची जागा आजूबाजूच्या जमिनीपेक्षा उंच पातळीवर व मुरमाड असावी. 
 • खड्डा गोल, चौकोनी अथवा खंदकासारखा करावा. 
 • आच्छादनासाठी २०० मायक्रॉन प्लॅस्टिक कागद वापरावा. 
 • खड्ड्याच्या भिंती हवाबंद करण्यासाठी भिंतींना सिमेंटचे प्लास्टर करावे.

 मुरघास तयार करण्याची पद्धत 

 • मुरघासाचा खड्डा साफ व कोरडा करून घ्यावा. 
 • प्लॅस्टिकचा कागद खड्डा पूर्ण झाकेल अशा पद्धतीने अंथरावा. 
 • खड्ड्याच्या तळाशी थोडेसे वाढलेले गवत व तणस अंथरावे. 
 • चारा पिकाचे कडबा कुट्टी यंत्राने लहान तुकडे करावेत. 
 • एकदलवर्गीय व द्विदलवर्गीय पिकापासून मुरघास बनविताना ४:१ हे प्रमाण घ्यावे. ६) खड्ड्यात कुट्टी थरावर थर टाकून भरण्यास सुरुवात करावी.
 •  कुट्टीचा १ फुटाचा थर झाल्यानंतर प्रत्येक थरानंतर तयार केलेले द्रावण शिंपडावे. ८)  चारा कुट्टीचा थर खड्ड्यात चांगला दाबून भरावा. चाऱ्यांमध्ये अजिबात हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी. 
 • जमिनीच्या पातळीच्या वर अंदाजे दीड ते दोन फूट उंचीपर्यंत चारा भरावा. नंतर प्लॅस्टिकने खड्डा बंद करावा. त्यावर १० ते १५ सेंटिमीटरचा जाडीचा वाळलेल्या गवताचा व तणसाचा थर पसरवून त्यावर १० ते १५ सेंटिमीटर जाडीचा मातीचा थर टाकून घुमटाचा आकार करावा. सर्व बाजूंनी तो मातीने लिंपून घ्यावा. म्हणजे हवा किंवा पाणी आत जाणार नाही.
 • खड्डा मातीने बंद केल्यावर काही दिवसांनी खड्ड्याला पडणाऱ्या भेगा बुजवून उंदीर आणि घुशींपासून संरक्षण करावे. 
 • खड्ड्याचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यावर छप्पर करावे. 
 • मुरघास तयार होण्यास साधारणतः ५० ते ६० दिवस लागतात. 

- डॉ. नरेंद्र प्रसादे,  ९४०४९९२४९८,
- डॉ. बाळकृष्ण देसाई,  ९४२२३९१४०९

(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी)


इतर कृषिपूरक
जनावरांना चाऱ्यातून सायनाइडची विषबाधाअयोग्य पद्धतीने चारा दिल्यामुळे जनावरांना...
जनावरांमधील रक्त संक्रमण फायदेशीरकावीळ झालेल्या जनावराला वाचविण्यासाठी दुसऱ्या...
व्यावसायिक पद्धतीने ब्रॉयलर कोंबड्यांचे...ब्रॉयलर कोंबड्यांचे व्यवस्थापन करताना त्यांचे...
गाईचे गाभण काळातील व्यवस्थापनव्यायल्यानंतर वार अडकणे, कासदाह आणि गर्भाशय दाह...
कॉमन कार्प माशाचे प्रजनन तंत्रकॉमन कार्प माशाच्या बिजाची मागणी वाढत आहे. योग्य...
अंड्यात खरंच भेसळ असते का?अंड्याचे सर्वात बाहेरील आवरण म्हणजे त्याचे कवच...
कुक्कुटपालनात रोगनियंत्रण महत्वाचे माणसांप्रमाणे जनावरांमध्ये तसेच पशु-पक्ष्यांनाही...
जनावरांची वार का अडकते?जनावर व्यायल्यानंतर साधारणतः वार सहा ते आठ...
गावरान कि ब्रॉयलर चवीला कोण जबरदस्त?कोंबडीची पचनसंस्था कशी कार्य करते. तुम्ही कोंबडी...
थंडीत खा अंडी रोज सकाळी उठल्यावर कसला नाष्टा करावा जो कि...
शेळ्यांना द्या सुबाभुळचा चारा शेळ्यांच्या आहारात ४०% सुबाभळीचा वापर करावा....
शेळ्यांसाठी शेंगवर्गीय चारा पिक शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडाचा पाला....
खायला कोणती अंडी चांगली?तुम्ही अंडी खाल्लीत का ? कोणती खायची? गावरान अंडी...
जनावरांमध्ये अचानक गर्भपात का होतो?या रोगाचा प्रसार प्रामुख्याने गवत, पिण्याचे पाणी...
जनावरांचे उत्पादन कसे वाढेल?दुग्ध व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी जनावरांची...
गायीचे मायांग तिरके का होते?गाय किंवा म्हैस माजावर आल्यानंतर सोट टाकण्याचे...
हिरव्या चाऱ्यासाठी नेपिअर लागवड तंत्रसंकरित नेपिअर या चारा पिकाच्या फुले जयवंत, यशवंत...
जातिवंत कालवड पैदाशीसाठी आधुनिक प्रजनन...आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरज असेल तेव्हाच पूर्ण...
शेळ्या-मेंढ्यातील अतिसंसर्गजन्य पीपीआर...पीपीआर म्हणजे पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स....
बहुवार्षिक नेपियर गवत पशुपालन व्यवसायात ६० ते ७० % खर्च हा आहार...