अंजिरापासून बर्फी, गर, पावडर

अंजिरामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व-क व खनिजद्रव्ये (पोटॅशिअम, लोह) या अन्नद्रव्यांचे प्रमाण मुबलक आहे. अंजीर फळांपासून बर्फी, टॉफी, जॅम, गर (पल्प), पावडर, वाळलेले अंजीर, आइस्क्रीम, मिल्कशेक, बार इ. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थं तयार करता येतात.
value added products of common fig
value added products of common fig

अंजिरामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व-क व खनिजद्रव्ये (पोटॅशिअम, लोह) या अन्नद्रव्यांचे प्रमाण मुबलक आहे. अंजीर फळांपासून बर्फी, टॉफी, जॅम, गर (पल्प), पावडर, वाळलेले अंजीर, आइस्क्रीम, मिल्कशेक, बार इ. प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थं तयार करता येतात. पावडर  

  • अंजीर पावडरचा वापर फळांचा हंगाम नसताना विविध प्रक्रियायुक्त पदार्थ (मिल्कशेक, आइस्क्रीम, टॉफी) तयार करण्यासाठी होतो. 
  • प्रथम पिकलेली फळे घेऊन त्यापासून गर (पल्प) तयार करावा. हा गर घट्ट होईपर्यंत मंद आचेवर किंवा निर्वात पोकळीच्या सान्निध्यात घट्ट करावा. घट्ट झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमध्ये पसरून वाळवणी यंत्राच्या साह्याने (कॅबिनेट ड्रायर : ५०-५५ अंश सेल्सिअस तापमानास २४-२८ तास) वाळवावा. 
  • वाळलेला गर दळणी यंत्राच्या साह्याने दळून, गराची पावडर (भुकटी) करावी.
  • दुसऱ्या पद्धतीनुसार अंजीर फळास बारीक कप देऊन त्यांच्या फोडी तयार कराव्यात. फळांच्या फोडी स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमध्ये पसरून वाळवणी यंत्राच्या साह्याने (कॅबिनेट ड्रायर: ६०-६५ अंश सेल्सिअस तापमानास २०-२४ तास) वाळवाव्यात. कडक वाळलेल्या फोडी दळणी यंत्राच्या साह्याने दळून, पावडर (भुकटी) करावी. तयार झालेली पावडर (भुकटी) प्लॅस्टिकच्या पिशवीत हवाबंद करावी. 
  • गर (पल्प)

  • फळांच्या हंगामात त्यापासून गर तयार करून तो हवाबंद कॅन/बाटल्यांमध्ये दीर्घकाळ साठवून ठेवता येतो. फळांचा हंगाम नसताना त्याचा वापर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ (जाम, मिल्कशेक, आइस्क्रीम, टॉफी) तयार करण्यासाठी होऊ शकतो. 
  • गर तयार करताना पूर्ण पिकलेली निरोगी फळे निवडावीत. ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. फळे स्क्रू-टाइप ज्युसरमध्ये टाकून गर तयार करावा. गराचा शर्करांश (साखरेचे प्रमाण) २०-२२ अंश  ब्रिक्स करून आम्लता ०.५  टक्का ठेवावी. 
  • तयार झालेला गर निर्जंतुक केलेल्या कॅन/ काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा. बाटल्या ८०-८५ अंश सेल्सिअस तापमानास १०-१५ मिनिटे गरम पाण्यात ठेवाव्यात, सदर प्रक्रियेमुळे गर (पल्प) दीर्घकाळ चांगला टिकविला जातो.
  • बर्फी 

  • बर्फी तयार करण्यासाठी पिकलेली फळे घेऊन, ती स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून टाकावी. फळांचे बारीक काप करून ते गरम पाण्यामध्ये नरम होईपर्यंत शिजवावेत. त्या नरम कापांना मिक्सरमधून फिरवून त्यापासून गर तयार करावा. 
  • बर्फी तयार करण्यासाठी  गर १०० ग्रॅम घेऊन त्यात ४०० ग्रॅम साखर टाकावी. सदर मिश्रणात ५०० ग्रॅम खवा मिसळून मिश्रण गॅसच्या मंद आचेवर चांगले शिजवावे. तयार मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये पसरून ठेवावे. 
  • मिश्रण थंड झाल्यावर त्याचे १.५ ते २  सें. मी. जाडीचे काप करावेत. आवश्यकतेनुसार त्यावर किसलेल्या सुकामेव्याचा थर पसरावा.
  • जॅम

  • पिकलेली फळे घेऊन त्यापासून गर (पल्प) तयार करावा. जॅम तयार करण्यासाठी एक किलो  गर (पल्प) स्टीलच्या पातेल्यात घेऊन त्यात ७५० ग्रॅम साखर मिसळून गॅसच्या मंद आचेवर शिजवून त्यामध्ये साखर पूर्णतः विरघळून घ्यावी. त्यानंतर मिश्रणात १.५ ते २ टक्के सायट्रिक आम्ल मिसळावे. आम्ल मिसळल्यामुळे जॅममध्ये साखर पूर्णतः विरघळते. त्याचे पांढरे स्फटिक तयार होत नाहीत. 
  • जॅम तयार झाला आहे का नाही हे ओळखण्यासाठी त्याचा शर्करांश (साखरेचे प्रमाण-ब्रिक्स) ६८.५ टक्के आला आहे का हे पहावे. शर्करांश मोजण्यासाठी हॅन्ड रिफ्रक्ट्रोमीटरचा वापर करावा. किंवा त्याचा १ थेंब ग्लासमधील पाण्यात टाकून तो जर न विरघळता जसाच्या तसा राहिला तर जॅम तयार झाला आहे असे समजावे. तयार झालेला जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा.
  • बार 

  • पूर्ण पिकलेली निरोगी फळे घेऊन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत, त्यापासून गर तयार करावा. बार तयार करण्यासाठी अंजीर गर १ किलो, साखर १०० ग्रॅम, पेक्टिन १० ग्रॅम, सायट्रिक आम्ल ४ ग्रॅम आणि पोटॅशिअम मेटाबायसल्फाईट १ ग्रॅम इत्यादी प्रमाण वापरावे.
  • गर जाड बुडाच्या कढईत टाकून त्यात इतर पदार्थ मिसळावेत. सदर मिश्रण  स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमध्ये पसरून वाळवणी यंत्राच्या साह्याने (कॅबिनेट ड्रायर: ६०-६५ अंश सेल्सिअस  तापमान) मिश्रणातील पाण्याचे प्रमाण १५ टक्के येईपर्यंत वाळवावे. त्यापासून अंजीर बार आवश्यक त्या आकारात कापून घ्यावेत.
  • संपर्क - डॉ. अमोल खापरे, ८०५५२२६४६४ (अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com