कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
कृषी प्रक्रिया
बेलफळाच्या प्रक्रिया उद्योगाला संधी
बेलापासून जेली, जॅम, सरबत निर्मिती करता येते. या फळापासून मूल्यवर्धनाला चांगली संधी आहे.
बेलापासून जेली, जॅम, सरबत निर्मिती करता येते. या फळापासून मूल्यवर्धनाला चांगली संधी आहे.
उष्णदेशीय आणि उपोष्णकटिबंधीय भागात बेलाचे झाड प्रामुख्याने आढळते. याची फळे जेव्हा पिकतात तेव्हा त्याचे तुकडे करून किंवा दूध, पाणी आणि साखर मिसळून वापरले जाते किंवा सरबतनिर्मितीसाठी वापरले जाते. पाने, फळ, साल आणि बियाण्यांचा आयुर्वेदिक औषधी घटक म्हणून वापर होतो.
बेलफळाची पौष्टिकता
बेलफळामध्ये स्टिरॉइड्स, कूमारिन,फ्लॅवोनोयड्स, टेरपेनॉईड, फिनोलॉलिक संयुगे, लिग्निन, इनुलीन आणि अन्य अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. हे घटक जुनाट रोगांवर उपयुक्त आहेत. याचबरोबरीने प्रथिने, कर्बोदके, खनिजे (कॅल्शिअम, फॉस्फरस, पोटॅशिअम, लोह) आणि जीवनसत्त्वे (अ,ब,क आणि रिबोफ्लेव्हिन) यांचा समावेश आहे. अल्कलॉइड्स, कार्डियाक ग्लायकोसाइड आणि फ्लॅनोवोयड्स इत्यादीचा उत्तम स्रोत आहे.
आरोग्यदायी फायदे
- मधुमेह रुग्णांसाठी बेल अतिशय फायदेशीर आहे. बेलाच्या पानांचा रस काढून दिवसाला दोन वेळा घेतल्यास मधुमेहावर उपयुक्त ठरतो.
- बेलाच्या नियमित सेवनाने अपचनाचा त्रास कमी होतो. वाळलेल्या बेलाच्या गराची पावडर तयार करून गरम दुधात रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.
- उन्हाळ्याच्या दिवसांत उलट्या, हगवण, मळमळ वाटते. बेलफळाचा गर असलेल्या पाण्यात साखर मिसळून प्यायल्यास याचे लाभ दिसून येतात.
- ऊन लागले असता बेलाच्या ताज्या पानांना कुटून मेहंदीप्रमाणे तळपायांवर लावावे. याने तत्काळ आराम मिळतो.
प्रक्रियायुक्त पदार्थ
जेली
- प्रथम बेलफळ थंड पाण्याने स्वच्छ धुऊन त्याच्या लहान आकाराच्या फोडी कराव्यात. या सर्व फोडी एका स्टेनलेस स्टील पातेल्यात घेऊन त्या पूर्ण बुडतील इतके पाणी घ्यावे. त्यामध्ये प्रति किलो फोडीस दोन ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून फोडी चांगल्या (अर्धा तास) शिजवाव्यात.
- पातेल्यातील लगदा थोडा थंड झाला, की मलमलच्या कापडातून गाळून घ्यावा.
- बेलफळाच्या निवळलेल्या स्वच्छ रसापासून जेली तयार करण्यापूर्वी त्याची पेक्टीनसाठी परीक्षा करावी. स्टेनलेस स्टीलच्या भांड्यात रस वजन करून घ्यावा. त्यातील पेक्टीनच्या प्रमाणानुसार प्रति किलोस एक किलो साखर (जास्त पेक्टीन असेल तर) किंवा तीन-चार किलो साखर (पेक्टीन कमी असेल तर) मिसळावी. नंतर हे मिश्रण उकळी येईपर्यंत शिजवावे. मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात झाल्यानंतर परीक्षण करावे. तयार झालेल्या जेलीमधील एकूण विद्राव्य घटक रिफ्रॅक्टोमीटरच्या साह्याने मोजल्यास ६७ अंश ब्रिक्सच्या वर गेले तर जेली तयार झाली असे समजावे. जेली तयार झाल्यावर ती गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या कोरड्या रुंद तोंडाच्या बाटल्यांत भरावी व ती बाटली व्यवस्थित हवाबंद करून कोरड्या जागी ठेवावी.
जाम
यामध्ये ४५ टक्के बेल फळाचा गर आणि ६८ टक्के टीसीएस (साखर) असते. तसेच ०.५ -०.६ टक्का आम्ल असते. एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये ७५० ग्रॅम साखर आणि ५ ते ६ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून स्टीलच्या पातेल्यामध्ये मंद आचेवर शिजवावे. मिश्रण विरघळेपर्यंत आणि घट्ट द्रव होईपर्यंत हलवत रहावे. नंतर घट्ट झालेले मिश्रण चाचणी करुण निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.
पोळी
ज्याप्रमाणे आंब्याची पोळी केली जाते. त्याचप्रमाणे बेलफळाच्या गरापासून उत्तम प्रतीची पोळी तयार करता येते. यासाठी बेलफळाच्या गरामध्ये एकास एक (१ :१) या प्रमाणात साखर मिसळून हे मिश्रण ९० अंश सेल्सिअस तापमानात थोडा वेळ गरम करून पातळ थर ताटामध्ये ओतून वाळवावेत. असे एकावर एक थर देऊन थराची जाडी १.५ सें.मी. येईपर्यंत थर द्यावेत. वाळल्यानंतर पोळी कापून कोरड्या जागी साठवून ठेवावी.
बेलफळाचे आरटीएस / सरबत
यामध्ये १० टक्के बेल फळाचा गर आणि १० टक्के टीसीएस (साखर) असते. तसेच ०.१ -०.३ टक्का आम्ल असते. एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये १ किलो साखर आणि १ ते ३ ग्रॅम सायट्रिक आम्ल व ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे. बनवलेले मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे गरम करून थंड करून घ्यावे. थंड केलेले आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवावे.
टॉफी
पिकलेली फळे घेऊन त्यापासून गर तयार करावा. टॉफी तयार करण्यासाठी बेल फळाचा गर १ किलो, साखर ४५० ग्रॅम, लिक्विड ग्लुकोज ८० ग्रॅम, दूध पावडर ६० ग्रॅम, सायट्रिक ॲसिड २ ग्रॅम व वनस्पती तूप १०० ग्रॅम या प्रमाणात घ्यावे. गर भांड्यामध्ये घेऊन त्यात वनस्पती तूप मिसळून गर गॅसच्या मंद आचेवर चांगला शिजवून आटवावा. घेतलेल्या प्रमाणानुसार साखर, दूध पावडर, सायट्रिक ॲसिड हे घटक मिसळून मिश्रण एकजीव करावे. मंद आचेवर मिश्रण चांगले ढवळून शेवटी त्यात लिक्विड ग्लुकोज टाकून मिश्रणाचा ब्रिक्स ७० ते ७२ दरम्यान आल्यावर गॅस बंद करून मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये किंवा प्लेटमध्ये पसरून ठेवावे. मिश्रण थंड झाल्यावर त्याचे हव्या त्या आकाराचे काप करावेत. तयार टॉफी बटरपेपर मध्ये पॅक करावी.
मुरंबा
एक किलो बेलफळाच्या गरामध्ये एक किलो साखर या प्रमाणात साखर मिसळून घ्यावी. एक रात्र तसेच ठेवून द्यावे. दुसरे दिवशी मंद गॅसवर पातेले ठेवावे. मिश्रण सतत ढवळत राहावे. यामध्ये चवीनुसार वेलची पूड, सुंठ व मीठ मिसळावे. त्यानंतर गॅस बंद करावा. गार झाल्यावर बेलफळाचा मुरंबा कोरड्या काचेच्या बरणीमध्ये भरून साठवावा.
- व्ही. आर. चव्हाण, ९५१८३४७३०४
(सहायक प्राध्यापक, एम. जी. एम. अन्नतंत्र महाविद्यालय, गांधेली, औरंगाबाद)
- 1 of 16
- ››