कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
कृषी प्रक्रिया
अळिंबीपासून केचअप, कॅण्डी, मुरंबा
उष्णकटिबंधाजवळील भागामध्ये २४ तासांपेक्षा जास्त काळ ती साठवता येत नाहीत. अळिंबीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास ती जास्त साठविणे शक्य होते. अळिंबीपासून सूप पावडर, बिस्किट, केचअप, कॅण्डी, मुरंबा, लोणचे, चिप्स इत्यादी उत्पादने तयार केली जातात.
अळिंबीमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे अळिंबीचा पोत नाजूक असतो. त्यामुळे उष्णकटिबंधाजवळील भागामध्ये २४ तासांपेक्षा जास्त काळ ती साठवता येत नाहीत. अळिंबीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित उत्पादने तयार केल्यास ती जास्त साठविणे शक्य होते. अळिंबीपासून सूप पावडर, बिस्किट, केचअप, कॅण्डी, मुरंबा, लोणचे, चिप्स इत्यादी उत्पादने तयार केली जातात.
प्रक्रियायुक्त पदार्थ
सूप पावडर
बटण अळिंबीचे तुकडे किंवा संपूर्ण अळिंबी बारीक करून त्याची पावडर करावी. तयार पावडर पाकिटामध्ये किंवा डब्यामध्ये हवाबंद करावी. ही पावडर दुधात टाकून सर्व्ह करावी. या पावडरीमध्ये कॉर्न फ्लोअर आणि इतर घटक मिसळून अळिंबी सूप तयार करता येते.
बिस्किट
साहित्य
बटण अळिंबी पावडर, मैदा, साखर, तूप, नारळ पावडर, खाण्याचा सोडा आणि दूध पावडर.
कृती
मिक्सरमधून वरील साहित्य चांगले एकत्रित करून घ्यावे. बारीक चाळणीच्या साह्याने ते चाळून घ्या. मिश्रणामध्ये तूप आणि साखर घालून चांगले एकजीव करावे. मिश्रणामध्ये अर्धा लिटर पाणी घालून त्याची कणीक तयार करावी. तयार कणीक ओल्या कापडाखाली १० मिनिटे ठेवावी. कणीक पातळ बिस्किटाच्या आकारात कापून घ्यावी. कापलेली बिस्किटे स्टीलच्या ट्रेमध्ये ठेवावीत. ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअस तापमानाला हा ट्रे २० मिनिटे ठेवावा. तयार बिस्किटे ओव्हनमधून काढून घ्यावीत.
केचअप
कृती
ताजी बटण अळिंबी पाण्यात धुऊन कापून घ्यावी. अळिंबी शिजवून घेतल्यावर मिक्सरमधून बारीक करून त्याची पेस्ट तयार करावी. तयार पेस्ट एका भांड्यात घेऊन मंद आचेवर ठेवावी. त्यामध्ये मसाले व इतर साहित्य टाकून सतत ढवळत राहावे. केचअप चांगला शिजल्यावर त्याची ड्रॉप टेस्ट घ्यावी. केचअप तयार झाल्यावर गॅस बंद करावा. तयार केचअप निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरावे.
कॅण्डी
कॅण्डी म्हणजेच साखरेच्या पाकामध्ये फळे किंवा फळांचे काप ठरावीक काळासाठी भिजवून ते वाळवले जातात.
कृती
ताजी अळिंबी स्वच्छ धुऊन त्याचे तुकडे करावेत. पाण्यामध्ये पोटॅशिअम मेटाबायसल्फेट ०.०५ ग्रॅम मिसळून त्यामध्ये हे तुकडे ५ मिनिटांसाठी उकळून घ्यावेत. मिश्रण चांगले उकळल्यानंतर उष्णता देणे थांबवावे. प्रतिकिलो अळिंबीसाठी दीड किलो साखरेचा वापर करावा. साखर तीन समान भागात विभागून घ्यावी. पहिल्या दिवशी साखरेचा पहिला भाग मिश्रणामध्ये मिसळावा. दुसऱ्या दिवशी साखरेचा दुसरा भाग मिसळावा. तिसऱ्या दिवशी मिश्रणातून रस वेगळा करून घ्यावा. रस चांगला उकळून घ्यावा. रसामध्ये उर्वरित साखरेचा तिसरा भाग घालून पुन्हा उकळी द्यावी. बाजूला काढून ठेवलेली अळिंबी रसामध्ये टाकून पुन्हा उकळी द्यावी. मिश्रण चांगले उकळल्यानंतर थंड होण्यास ठेवून द्यावे. वेगळे केलेली अळिंबी वाळवून त्याची कॅण्डी तयार केली जाते. तयार कॅण्डी निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरावी. तसेच वेगळा केलेला रसदेखील विविध पदार्थांमध्ये वापरता येतो. तयार अळिंबी कँडी ८ महिन्यांपर्यंत चांगली टिकते.
मुरंबा
प्रथम ताज्या बटण अळिंबीचे तुकडे करून घ्यावेत. पाण्यामध्ये पोटॅशिअम मेटाबायसल्फेट ०.०५ ग्रॅम मिसळून त्यामध्ये हे तुकडे टाकावेत. तयार मिश्रण ५ मिनिटांसाठी मंद आचेवर ठेवावे. मिश्रण तीन दिवस ४० टक्के साखरेच्या पाकामध्ये ठेवावे. चौथ्या दिवशी रस वेगळा करून घ्यावा. रस ५ मिनिटे चांगला उकळून घ्यावे. रसाचा ब्रिक्स ६५ पर्यंत आल्यानंतर आधी वेगळी केलेली अळिंबी त्यात टाकावी. तयार मुरब्बा थंड झाल्यानंतर निर्जंतुक भरणीमध्ये भरून कोरड्या जागी ठेवून द्यावा.
चिप्स
ताजे बटण अळिंबी स्वच्छ धुऊन चकत्या कराव्यात. या चकत्या मीठ पाण्याच्या द्रावणामध्ये उकळून घ्याव्यात. या चकत्या सायट्रिक आम्ल (०.१ टक्का), मीठ पाण्याचे द्रावण (१.५ टक्का) आणि लाल मिरची पावडरच्या (०.३ टक्का) द्रावणात मिसळून रात्रभर ठेवाव्यात. अळिंबी चांगल्या भिजल्यानंतर मिश्रणातून वेगळे करावेत. या चकत्या कोरड्या करून तळून घ्याव्यात. तयार चिप्समध्ये चवीनुसार मसाले मिसळून घ्यावेत.
संपर्क : अमरसिंग सोळंके, ९९२१०९२२२२
(आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)
- 1 of 16
- ››