चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थ

चिंच फळांवर प्रक्रिया करून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ बाजारपेठेमध्ये विक्री केल्यास फायद्याचे प्रमाण वाढते. यातील अनेक पदार्थांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी असून, त्यांच्या निर्यातीतून परकीय चलन व अधिक फायदा मिळू शकतो.
value added products of tamarind
value added products of tamarind

चिंच फळांवर प्रक्रिया करून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ बाजारपेठेमध्ये विक्री केल्यास फायद्याचे प्रमाण वाढते. यातील अनेक पदार्थांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी असून, त्यांच्या निर्यातीतून परकीय चलन व अधिक फायदा मिळू शकतो. चिंच हे महाराष्ट्रात व भारतात सर्वत्र आढळणारे असे फळझाड आहे. कांचनाथ कुळातला चिंच वृक्ष हा मूळ आफ्रिकेतील असून, अति प्राचीन काळापासून तो भारतीय भू‍मीत आहे. जागतिक पातळीवर भारतात सर्वाधिक चिंचेचे उत्पादन होते. चिंचेच्या एकूण २४ उपजाती आहेत. आपल्‍याकडे हिरवी चिंच व लाल चिंच अशा दोन जाती आहेत. गुजरात राज्‍यात लाल चिंचेची झाडे विपुल प्रमाणात आहेत. एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे उत्पादन व उत्पन्न मिळवून देणारी चिंच शेतकऱ्यांसाठीही अत्यंत महत्त्वाची आहे. नुसत्या चिंचेच्या विक्रीतूनही दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. अर्थात, स्वतःच चिंच फळांवर प्रक्रिया करून वेगवेगळे प्रक्रियायुक्त पदार्थ बाजारपेठेमध्ये विक्री केल्यास फायद्याचे प्रमाण वाढते. यातील अनेक पदार्थांना आंतरराष्ट्रीय पातळीवर मागणी असून, त्यांच्या निर्यातीतून परकीय चलन व अधिक फायदा मिळू शकतो. चिंचेपासूनचे प्रक्रियायुक्त पदार्थ  चिंचेच्या गोळ्या, चटणी, चिंचेचा काढा, गर, चिंच पावडर, सॉस, पोळी, लोणचे, पेय, सिरप. चिंचेच्या पाचक गोळ्या  चिंचा स्वच्छ करून घ्याव्यात. त्यातील धागे आणि कडक साल काढून घ्यावी. चिंचा धुण्यासाठी व प्रक्रियेदरम्यान पाण्याचा वापर करू नये. स्वच्छ केलेली चिंच मिक्सरच्या साह्याने वाटून घ्यावी. किंवा कुटून घेतली तरी चालते. वाटलेली चिंच एका भांड्यात काढून घ्यावी. एक सॉस पॅन मंद आचेवर ठेवून तापल्यानंतर त्यात गूळ घालावा. गूळ मंद गॅसवर वितळू द्यावा. वितळायला सुरुवात झाल्यानंतर त्यामध्ये थोडे पाणी घालावे. गूळ चांगला वितळला, की त्यात भाजलेली जिऱ्याची पूड, सैंधव आणि लाल तिखट घालावे. ते चांगले एकजीव केल्यानंतर तयार मिश्रणात चिंचेचा गोळा टाकावा. गूळ चिंचेत मुरेपर्यंत चांगले ढवळत राहावे. चिंच शिजून त्याचा चांगला लगदा होतो. गूळ चांगल्याप्रकारे मुरल्यानंतर मिश्रण वाटीमध्ये काढून घ्यावे. थंड झाल्यानंतर (सुमारे चार ते पाच तासांनंतर) तयार चिंचेचे बारीक बारीक गोळे करून छान कणीदार साखरेत घोळवावेत. आंबट-गोड चिंचेच्या गोळ्या तयार होतात. या गोळ्या तोंडाला रुची आणणाऱ्या असून, हवाबंद डब्यात दीर्घकाळ साठवता येतात. या गोळ्या चटकदार असल्याने आबालवृद्धांना आवडतात. चिंच जेली जेली तयार करण्यासाठी चिंचेतील अर्काचा वापर करतात. चिंचेचा अर्क व्यवस्थित गाळून शिजवला जातो. त्यात पेक्‍टीन पावडर, फळांची पावडर, साखर, सायट्रिक ॲसिड इ. साहित्य प्रमाणात मिसळावे. हे गरम मिश्रण ट्रेमध्ये ओतावे. त्याची जेली तयार होते. ही थोडी सुकल्यानंतर काप करावेत. फूड ग्रेड पेपरमध्ये पॅक करावे. एका जारमध्ये सरासरी ऐंशी तुकडे जेली बसते. चिंच लोणचे उत्तम प्रतीच्या पूर्ण पिकलेल्या चिंच फळाची निवड करावी. वरील वाळलेली टरफले काढून चिंच अंदाजे १२ तास थंड पाण्यात भिजवून ठेवावी. त्यानंतर फळांमधील चिंचोके वेगळे करून चिंचेचा गर वेगळा करावा. एका किलो चिंचेच्या गरामध्ये १ किलो साखर मिसळून मिश्रण उकळून घ्यावे. उकळताना मिश्रण सारखे पळीने हलवत राहावे. या मिश्रणामध्ये मोहरी डाळ २०० ग्रॅम, तिखट पावडर २०० ग्रॅम, मीठ ३० ग्रॅम, हिंग १० ग्रॅम मिसळावे. सर्व घटक मिश्रणात चांगल्याप्रकारे मिसळल्यानंतर २५० ग्रॅम मोहरीचे तेल गरम करून घ्यावे. तेल चांगले थंड झाल्यानंतर मिश्रणामध्ये मिसळावे. हे तयार झालेले लोणचे निर्जंतुक केलेली काचेची बाटली किंवा प्लॅस्टिक बॅगमध्ये भरावे. काही काळ सामान्यतः तापमानात ठेवल्यानंतर थंड करून घ्यावे. थंड झाल्यानंतर बाटली झाकण लावून थंड ठिकाणी ठेवावी. १२ ते १५ महिन्यांपर्यंत हे चिंचेचे लोणचे चांगले राहते. चिंचेचा काढा चिंचेचा काढा बनविण्यासाठी दोन मुठी भरून पिकलेली, साले काढलेली चिंच घ्यावी. ही चिंच थोड्या पाण्यामध्ये घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. त्यानंतर हा चिंचेचा कोळ गाळून घेऊन एक लिटर पाण्यामध्ये मिसळावा. हे पाणी दहा मिनिटे उकळून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे मध, ब्राऊन शुगर किंवा गूळ मिसळावा. अशा प्रकारे चिंचेचा काढा तयार होतो. चिंच पावडर सुरुवातीला उत्तम दर्जाच्या चिंचेपासून गर काढून घ्यावा. हा गर मंद आचेवर घट्ट होईपर्यंत ठेवावा. घट्ट झालेला गर स्टेनलेस स्टीलच्या ट्रेमध्ये पसरून वाळवावा. हे वाळवण सूर्यप्रकाशात किंवा वाळवणी यंत्राने करता येते. वाळलेला गर दळणीयंत्राच्या साह्याने दळून भुकटी करून घ्यावी. ही भुकटी प्लॅस्टिकच्या पिशवीत हवाबंद करावी. ही भुकटी स्वयंपाकासह व विविध प्रक्रियायुक्त पदार्थांच्या निर्मितीसाठी वापरता येते. यामुळे वेळ वाचू शकतो. चिंचेपासून कॅण्डी चिंच स्वच्छ करून पल्परद्वारे गर काढून घ्यावी. त्यात गरजेनुसार साखर व अन्य घटक मिसळावेत. साच्यात तयार झालेली कॅण्डी प्लॅस्टिक आवरणात पॅक करावी. चिंचेचे औषधी उपयोग ब्रह्मसंहिता या प्राचीन ग्रंथात चिंचेचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत. चिंच फळ हे आंबट असून, तोंडाला चव आणते. चिंचेच्या फळासोबतच चिंचेचा पाला आणि झाडाची सालही औषधी आहे. शाकाहारी व्यक्तींना त्यांच्या अन्नातून मिळणारे लोह पचायला अवघड ठरते. चिंच, कोकम, आवळा असे आंबट पदार्थ हे लोह पचायला मदत करतात. यासाठी आमटीमध्ये गूळ आणि चिंच घातल्यास गुळातून उपलब्ध होणारे लोह पचवण्यासाठी चिंचेची मदत होते.

  • चिंच भूक वाढविण्यासाठी मदत करते.
  • श्रम, भ्रम व ग्लानी दूर करण्यासाठी चिंच उपयुक्त.
  • चिंचेचे सरबत उत्तम पित्तशामक आहे. पित्त वाढून शरीरातील उष्णता वाढते, अशा व्यक्तींना एक कप चिंचेचे सरबत घेतल्यास फायदा होतो. उष्माघातात चिंच सरबत किंवा पन्हे हितकारक आहे.
  • चिंचेची कोवळी पाने लोह, फॉस्फरस, क्‍लोरिन, तांबे व गंधक ही खनिजे या परिपूर्ण असतात. ती तशीच कच्ची खाता येतात. किंवा काही ठिकाणी कोवळ्या पाल्यापासून भाजी बनवली जाते.
  • चिंचेची पाने सूज दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत.
  • चिंच ही वात व पित्तशामक आहे.
  • हृदयाची ताकद कमी झाली की पिकून मऊ झालेल्या काळी चिंचेपासून सरबत तयार करून घ्यावे. हृदयाच्या स्नायूंना ताकद देण्याचे काम चिंच करते.
  • संपर्कः   ज्ञानेश्‍वर शिंदे, ७५८८१७९५८० (आचार्य पदवीचे विद्यार्थी, अन्न विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, सॅम हिग्गीनबॉटम कृषी तंत्रज्ञान आणि विज्ञान विद्यापीठ, प्रयागराज, उत्तर प्रदेश.) परमेश्‍वर पोळ, ९७६३४३४५०४ (प्राध्यापक, सौ. के.एस.के. अन्नतंत्र महाविद्यालय, बीड

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com