agricultural news in marathi value added products of tamarind | Page 2 ||| Agrowon

चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थ

करिश्मा कांबळे
सोमवार, 15 मार्च 2021

विविध पदार्थांमध्ये चवीसाठी चिंचेचा उपयोग केला जातो मुख्यतः दक्षिण भारतामध्ये सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. चिंचेपासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेमध्ये विशेष मागणी असते.

चिंच चवीला आंबट, तुरट व थोडीशी गोडसर असते. विविध पदार्थांमध्ये चवीसाठी चिंचेचा उपयोग केला जातो. पिकलेली चिंचा किंवा चिंचेचा कोळ भारतामध्ये खूप जास्त प्रसिद्ध आहे. मुख्यतः दक्षिण भारतामध्ये सांबार, रसम, चटणी आणि विविध प्रकारची आमटी बनवताना चिंचेचा कोळ वापरला जातो. चिंचेपासून तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेमध्ये विशेष मागणी असते.

प्रक्रिया केलेले पदार्थ 
चिंच लगदा 
पिकलेल्या चिंचेच्या बिया काढून गर वेगळा करावा. हा गर एकत्रित करून त्याचा लगदा तयार केला जातो. यामध्ये साधारणपणे १२ टक्के तंतुमय पदार्थ असतात. चिंच लगद्यामध्ये असणाऱ्या पेक्टीनचा (जेलीसारखा पदार्थ) उपयोग चांगल्या प्रतीची जेली बनवण्यासाठी करता येतो.

कृती
प्रथम चिंचेची टरफल काढून घ्यावीत. साधारणपणे २०० ग्रॅम चिंच गरम पाण्यामध्ये १ तास चांगली भिजवून घ्यावी. भिजलेली चिंच ४ मिनिटे हातांनी कुस्करून घ्यावी. जेणेकरून त्याचे जाडसर मिश्रण तयार होईल. हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यावे. एका मोठ्या चमच्याने त्याला दाबून शक्य होईल तेवढा लगदा काढून घ्यावा. चाळणीमध्ये उरलेला चोथा बाजूला काढून टाकावा. हा लगदा थोडा घट्ट होईपर्यंत चांगला शिजवून घ्यावा. लगदा शिजल्यानंतर थंड करून काचेच्या बाटल्यांमध्ये हवाबंद करून ठेवावा. चिंच लगदा फ्रीजमध्ये ३ महिन्यांपर्यंत चांगला राहतो.

चिंच रस 
चिंच लगद्याप्रमाणेच चिंच रस बनविला जातो. लगदा बनवण्यासाठी वापरलेली कृती रस तयार करण्यासाठी वापरली जाते. फक्त यामध्ये गाळून घेतलेले मिश्रण खूप जास्त घट्ट होईपर्यंत शिजवले जाते. घट्ट झाल्यानंतर मिश्रण थंड करून काचेच्या हवाबंद बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा. हा चिंच रस बराच काळ टिकतो.

चिंच बियांची पावडर 
व्यावसायिक स्तरावर चिंच बियांची पावडर तयार करण्यासाठी बिया ड्रायर किंवा कडक उन्हामध्ये वाळवल्या जातात. त्यानंतर हॅमर मिल (गिरण)मध्ये दळून त्याची पावडर बनविली जाते. टेक्स्टाईल उद्योगामध्ये या पावडरला खूप मागणी आहे. 

कृती 
प्रथम चिंचेच्या बिया (चिंचोके) लोखंडी तव्यावर भाजून घ्याव्यात. भाजलेल्या चिंचोक्यावरील साल बाजूला काढून घ्यावी. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमधून फिरवून बारीक पूड तयार करावी. तयार पावडर चाळणीने चाळून घ्यावी. आणि विविध आकारांच्या पाकिटांमध्ये भरून विक्रीसाठी पाठवावी.

सिरप 
कृती 

चिंच सिरप बनवण्यासाठी कच्च्या चिंचेचा वापर केला जातो. कच्च्या चिंचेचा लगदा गरम पाण्यामध्ये उकळून घ्यावा. उकळल्यानंतर हा लगदा सुती कापडामधून गाळून रस काढावा. एक कप रसामध्ये अर्धा चमचा बेकिंग सोडा घालावा. मंद आचेवर चिंच रस अर्धा होईपर्यंत चांगला उकळून घ्यावा. उकळलेला रस थंड करून त्यावर तयार झालेला साका काढून टाकावा. रस पुन्हा गाळून त्यामध्ये अर्धा कप साखर मिसळावी. मिश्रणास पुन्हा मंद आचेवर २० मिनिटे उकळून घ्यावे. मिश्रण थंड करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करावे.

लोणचे 
साहित्य

चिंच २०० ग्रॅम, साखर २०० ग्रॅम, मिक्स मसाला (तिखट, मीठ, हळद, जिरे पावडर प्रत्येकी १ चमचा) 

कृती 
लोणचे बनवण्यासाठी साधारणपणे २०० ग्रॅम चिंचा १२ तास पाण्यामध्ये भिजवून ठेवाव्यात. चिंच चांगली भिजल्यानंतर त्याचा लगदा वेगळा करावा. त्यामध्ये १ः१ (२०० ग्रॅम चिंचेसाठी २०० ग्रॅम साखर) प्रमाणात साखर घालावी. मंद आचेवर मिश्रणास चांगले उकळून घ्यावे. मिक्स मसाल्यांची बारीक पूड करून तयार मिश्रणामध्ये मिसळावी. तयार पेस्ट पुन्हा मंद आचेवर उकळून घ्यावे. तयार लोणचे थंड करून काचेच्या बाटल्यांमध्ये भरून हवाबंद करावे. 

कँडी 
साहित्य

चिंच २०० ग्रॅम, गूळ ४०० ग्रॅम, तिखट, जिरेपूड, सैंधव मीठ प्रत्येकी १ चमचा.

कृती 
प्रथम चिंचेमधून बिया वेगळ्या काढून घ्याव्यात. कॅण्डी बनवण्यासाठी गुळाचा पाक आवश्‍यक असतो. पाक तयार करण्यासाठी साधारणपणे ४०० ग्रॅम गूळ किसून घ्यावा.  किसलेल्या गुळामध्ये १ चमचाभर पाणी टाकावे. मिश्रणास मंद आचेवर ठेवून सतत ढवळत राहावे, जेणेकरून मिश्रण करपणार नाही. हा पाक उकळत असताना त्यामध्ये तिखट, सैंधव मीठ व जिरेपूड प्रत्येकी १ चमचा घालून चांगले एकत्रित करावे. तयार पाकामध्ये चिंच घालून त्याचा जाडसर गोळा होईपर्यंत चमच्याने हलवत राहावे. तयार लगद्याच्या छोट्या आकाराच्या गोळ्या बनवून त्या साखरेमध्ये घोळवून घ्याव्यात. हे गोळे एका बांबूच्या मांडणीवर ठेवून उन्हात वाळवून घ्यावेत. तयार कॅण्डी थंड झाल्यानंतर सेलोफेनमध्ये पॅक करावी.

जॅम 
साहित्य

चिंच पल्प/ लगदा २०० ग्रॅम, साखर ४०० ग्रॅम.

कृती 
जॅम बनवण्यासाठी मंद आचेवर २०० ग्रॅम चिंचेचा लगदा १० मिनिटांसाठी उकळवून घ्यावा. त्यानंतर बिया वेगळ्या कराव्यात. साखर व चिंच पल्प २:१ (२०० ग्रॅम चिंच लगद्यासाठी ४०० ग्रॅम  साखर) या प्रमाणात घेऊन मिश्रण जाडसर होईपर्यंत चांगले शिजवून घ्यावे. शिजवताना हे मिश्रण करपू नये यासाठी सतत हलवत राहावे. मिश्रण घट्ट झाल्यानंतर उष्णता देणे बंद करावे. तयार जॅम थंड करून निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरून हवाबंद 
करावा.

- करिश्मा कांबळे, ८४५९३७४६८४
(सहाय्यक प्राध्यापिका, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, आचळोली, जि. रायगड)


इतर कृषी प्रक्रिया
लिंबू प्रक्रियेतील संधी लिंबाच्या रसात जंतुनाशकता व रोगप्रतिकारकता...
अळिंबी स्पॉन निर्मिती तंत्रज्ञानअळिंबी लागवडीसाठी योग्य प्रकारचे स्पॉन आणि त्याची...
जवस एक सुपरफूडअलीकडच्या काळात जवस एक सुपरफूड म्हणून उदयास येत...
खरबुजापासून पावडर, सरबतखरबुजाचे  मूल्यवर्धन वेगवेगळ्या स्वरूपात...
आरोग्यवर्धक लसूण लसणाचा उपयोग स्वयंपाकात अन्न स्वादिष्ट होण्यासाठी...
अळिंबीची मूल्यवर्धित उत्पादनेपारंपरिक पदार्थांमध्ये वाळलेल्या आणि पावडर धिंगरी...
शास्त्रोक्त पद्धतीने हळद बियाण्याची...निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी...
चिंचेपासून प्रक्रिया केलेले पदार्थचिंच चवीला आंबट, तुरट व थोडीशी गोडसर असते. विविध...
आरोग्यदायी किवी फळकिवी  हे हिरवट चॉकलेटी रंगाचे केसाळ आंबट-गोड...
बेलफळाच्या प्रक्रिया उद्योगाला संधीबेलापासून जेली, जॅम, सरबत निर्मिती करता येते. या...
अळिंबीपासून केचअप, कॅण्डी, मुरंबाअळिंबीमध्ये जास्त आर्द्रता असल्यामुळे अळिंबीचा...
आरोग्यदायी हळद मिश्रित दूधहळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते...
होळीसाठी नैसर्गिक रंगनिर्मितीचा व्यवसायघरगुती पातळीवर रंगांची निर्मिती सोपी आहे....
बर्ड फ्लू रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायएव्हीयन इन्फ्लूएन्झा किंवा “बर्ड फ्लू” हा एक...
अंजिरापासून बर्फी, गर, पावडरअंजिरामध्ये तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व-क व...
शेळी दूध प्रक्रियेला संधीभारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून...
चिंचेपासून प्रक्रियायुक्त पदार्थचिंच फळांवर प्रक्रिया करून वेगवेगळे...
गुणकारी अन् औषधी हरभरासाधारणपणे हिवाळ्यात कोवळा हरभरा येतो. हरभऱ्याचे...
वातदोषावर उपाय ः हादग्याची फुले, शेंगाआयुर्वेदानुसार त्रिदोषांपैकी वातदोष कमी...
आरोग्यवर्धक तांदूळअन्नपदार्थात ‘तांदूळ’ सर्वांना सुपरिचित आहेच. या...