tomato value addition
tomato value addition

टोमॅटोपासून सूप, चटणी, लोणचे..

टोमॅटो ही अत्यंत नाशीवंत फळभाजी असून, लगेच खराब होते. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. टोमॅटोपासून सूप, चटणी, लोणचे, सॉस आदी मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

टोमॅटो ही अत्यंत नाशीवंत फळभाजी असून, लगेच खराब होते. त्यामुळे टोमॅटोवर प्रक्रिया करून मूल्यवर्धन केल्यास होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. टोमॅटोपासून सूप, चटणी, लोणचे, सॉस आदी मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. सूप साहित्य  पिकलेले टोमॅटो १ किलो, मीठ २० ग्रॅम, साखर २० ग्रॅम, लोणी २० ग्रॅम, मक्याचे पीठ १० ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा २० ग्रॅम, बारीक चिरलेला लसूण ५ ग्रॅम, लवंग ५, जिरे, मोठी वेलची, काळी मिरी, दालचिनी यांची पावडर प्रत्येकी १ ग्रॅम, पाणी ३५० मिलि कृती  प्रथम टोमॅटो स्वच्छ धुऊन मिक्सरमधून बारीक करून घ्यावे. तयार ज्यूस गाळणीने गाळून टोमॅटोची साल आणि बिया वेगळ्या कराव्यात. एका पातेल्यामध्ये मंद आचेवर तयार ज्यूस उकळण्यासाठी ठेवावा. ज्यूस उकळत असताना सुती कापडामध्ये सर्व मसाल्यांची पुरचुंडी बांधून पातेल्यामध्ये सोडून द्यावी. नंतर लोणी आणि मक्याचे पीठ चांगले एकजीव करून घ्यावे आणि थोड्या घट्ट झालेल्या टोमॅटोच्या ज्यूसमध्ये मिसळावे. सूप जेवढे घट्ट पाहिजे तेवढा वेळ त्याला शिजत ठेवावे. मिश्रण शिजत असताना अधूनमधून ढवळत राहावे. जेणेकरून मक्याच्या पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत. त्यानंतर मसाल्याची पुरचुंडी थोडीशी चमच्याने दाबून बाहेर काढावी. तयार सूप गरम असताना कॅनमध्ये भरावे. कॅन गरम पाण्यामध्ये २० मिनिटांसाठी ठेवून पुन्हा थंड होण्यास ठेवावा. नंतर थंड आणि कोरड्या ठिकाणी कॅनची साठवणूक करावी. चटणी  साहित्य  टोमॅटो १ किलो, साखर ५०० ग्रॅम, मीठ २५ ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा १०० ग्रॅम, आल्याचे बारीक काप १० ग्रॅम, चिरलेल्या लसूण पाकळ्या ५ ग्रॅम, लाल तिखट १० ग्रॅम, दालचिनी, काळी मिरी, मोठी वेलची, जिरे पावडर प्रत्येकी १० ग्रॅम, व्हिनेगार १०० मिलि, सोडिअम बेन्झोएट ०.५ ग्रॅम कृती  पिकलेले टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्यावेत. गरम पाण्यामध्ये ५ मिनिटांसाठी टोमॅटो मऊ करून घ्यावेत. गरम पाण्यातून बाहेर काढून त्याला थंड पाण्यात ठेवावे आणि त्यांची साल काढावी. साल काढलेले टोमॅटो बारीक कुस्करून घ्यावेत. मीठ आणि व्हिनेगार वगळता बाकी सर्व जिन्नस एकत्र करून मंद आचेवर थोडावेळ एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यावे. त्यानंतर त्यात व्हिनेगार आणि मीठ मिसळून पुन्हा ५ मिनिटांसाठी शिजवावे. तयार चटणीमध्ये सोडिअम बेन्झोएट मिसळावे. आणि गरम असताना बाटलीमध्ये भरावे आणि थंड-कोरड्या ठिकाणी साठवावे. लोणचे  साहित्य  टोमॅटो १ किलो, मीठ ७५ ग्रॅम, चिरलेल्या लसूण पाकळ्या १० ग्रॅम, आल्याचे बारीक काप ५० ग्रॅम, लाल मिरची, जिरे, मोठी वेलची, दालचिनी, हळद, मेथी, बडीशेप यांची प्रत्येकी १० ग्रॅम पावडर, लवंग ५, व्हिनेगार २५० मिलि, मोहरी तेल ३०० मिलि. कृती  लोणच्यासाठी शक्यतो पूर्ण पिकलेले रसरशीत टोमॅटो निवडावेत. टोमॅटो स्वच्छ धुऊन गरम पाण्यामध्ये ५ मिनिटांसाठी गरम करावेत. जेणेकरून टोमॅटोवरील साल काढता येईल आणि ते मऊ होतील. गरम पाण्यातून काढल्यानंतर टोमॅटो थंड होण्यासाठी ठेवून द्यावेत. साल काढलेले टोमॅटो ४ ते ६ भागांमध्ये चिरून घ्यावेत. व्हिनेगार वगळता इतर सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यावेत. परतलेले मिश्रण चिरलेल्या टोमॅटोमध्ये एकत्र करून २ मिनिटांसाठी पुन्हा गरम करून नंतर मिश्रण थंड होऊ द्यावे. मिश्रणामध्ये उरलेले तेल आणि व्हिनेगार मिसळावे. तयार लोणचे मुरण्यासाठी बरणीमध्ये भरून हवाबंद करावे. हे लोणचे बराच काळ टिकते. सॉस साहित्य  टोमॅटो लगदा १ किलो, साखर ७५ ग्रॅम, मीठ १० ग्रॅम, बारीक चिरलेला कांदा ५० ग्रॅम, आल्याचे काप १० ग्रॅम, लसूण ५ ग्रॅम, तिखट ५ ग्रॅम, दालचिनी, मोठी वेलची, बडीशेप, जिरे, काळी मिरी यांची प्रत्येकी १० ग्रॅम पावडर, लवंग ५, व्हिनेगार २५ मिलि, सोडिअम बेन्झोएट ०.२५ ग्रॅम कृती  सॉस बनविण्यासाठी टोमॅटोचा ज्यूस किंवा लगदा तयार करावा लागतो. त्यासाठी पिकलेले रसरशीत टोमॅटो स्वच्छ धुऊन गरम पाण्यामध्ये ५ मिनिटांसाठी गरम करावेत. त्यानंतर टोमॅटोवरील साल काढून ग्राइंडरमधून फिरवून त्याचा लगदा तयार करावा. तयार लगदा गाळणीने गाळून घ्यावा. लगद्यामध्ये साखर मिसळून मंद आचेवर शिजवावे. सुती कापडामध्ये सर्व मसाल्यांची पुरचुंडी करून ती टोमॅटोच्या लगद्यासोबत शिजू द्यावी. अधूनमधून पुरचुंडी चमच्याने दाबत राहावी. मिश्रण साधारण एक तृतीयांश प्रमाण होईपर्यंत शिजवावा. त्यानंतर पुरचुंडी दाबून काढून घ्यावी. तयार मिश्रणात ५० ग्रॅम साखर आणि मीठ मिसळून पुन्हा शिजवावे. मिश्रण चांगले घट्ट होईपर्यंत शिजवावे. त्यानंतर त्यात व्हिनेगार व सोडिअम बेन्झोएट मिसळावे. तयार सॉस गरम असतानाच बाटलीमध्ये भरून हवाबंद करावा. सॉस भरलेल्या बाटल्या गरम पाण्यामध्ये ३० मिनिटांसाठी ठेवाव्यात. नंतर त्या थंड होण्यास ठेवू द्याव्या. तयार सॉस थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवावा. - करिश्मा कांबळे, ८४५९३ ७४६८४ (सहायक प्राध्यापक, अन्नतंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com