कासदाह तपासणीसाठी विविध चाचण्या

कासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब होण्याचा धोका असतो. दुधाळ जनावरांना कासदाह होऊ नये यासाठी सोमॅटिक सेल काउंट, कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट, सर्फ फिल्ड टेस्ट या चाचण्या पशुपालकांनी करून घेणे महत्त्वाचे आहे.
Mastitis can be diagnosed by CMT test
Mastitis can be diagnosed by CMT test

कासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब होण्याचा धोका असतो. दुधाळ जनावरांना कासदाह होऊ नये यासाठी सोमॅटिक सेल काउंट, कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट, सर्फ फिल्ड टेस्ट या चाचण्या पशुपालकांनी करून घेणे महत्त्वाचे आहे. कासदाह म्हणजे दुधाळ जनावरांच्या कासेला येणारी सूज. यामुळे गाई, म्हशी दूध देणे कमी करतात किंवा दूध देणे पूर्णपणे थांबवतात. पहिल्या वेतातील जनावरांमध्ये या आजाराचे प्रमाण हे ५ टक्क्यांपर्यंत आहे, तर अधिक वेत देणाऱ्या जनावरांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव ८० टक्क्यांपर्यंत दिसून येतो. हा आजार प्रामुख्याने जिवाणूंमुळे होतो.  त्याचबरोबर काही प्रकारच्या बुरशी आणि मायकोप्लास्मा हे देखील या आजारास कारणीभूत असतात. लक्षणीय कासदाहामध्ये त्याच्या तीव्रतेनुसार तीव्र, अतितीव्र आणि दुर्धर असे तीन प्रकार आहेत. कासदाहामुळे दुधाळ जनावराचे सड निकामी किंवा खराब होण्याचा धोका असतो. यामुळे जनावरांचे बाजारमूल्यही कमी होते. कासदाह होण्याचे प्रमाण प्रामुख्याने भाकडकाळात किंवा जनावर विल्यानंतर लगेच झालेल्या जंतुसंसर्गामुळे होत असल्याचे दिसून येते. ज्या म्हशींमध्ये वार अडकण्याच्या समस्या उद्‍भवतात त्यांच्यामध्ये कासदाह होण्याची शक्यता तिपटीने वाढते. दूध काढणाऱ्या व्यक्तीच्या अस्वच्छतेमुळे देखील हा आजार होतो. सुप्त कासदाहाचा प्रादुर्भाव हा गायींमध्ये १० ते १५ टक्के आणि म्हशींमध्ये ५ ते २० टक्के एवढा  आहे. संसर्गाचा स्रोत आणि प्रसार वातावरणातील रोगजंतू आणि गायीच्या संबंधित रोगजंतूंमुळे आजाराचा प्रसार होतो. वातावरणातील रोगजंतू जसे ई कोलाय, स्त्रेप्टोकोकस उबेरीस यांचा संसर्ग हा माती, चारा आणि पाणी यांच्यामार्फत होतो. गायीच्या संबंधित रोगजंतू, जसे की स्टाफालोकोक्स ऑरिअस आणि स्त्रेप्टोकोकस अगलाक्टीये इ. हे कासदाह होण्यास कारणीभूत असतात. यांचा संसर्ग कास, सडाची अस्वच्छ त्वचा आणि दूध काढण्याचे साहित्यामुळे होतो.   लक्षणे लक्षणीय कासदाह

  • कासेला सूज येते. जनावरांना ताप येतो. कासेला हाताने स्पर्श केल्यास कास कडक व गरम जाणवते. 
  • कास सुजल्यामुळे जनावरांना प्रचंड वेदना होतात. बाधित सडातून दुधाच्या गुठळ्या किंवा पू येतो.
  • दुधाची चव आणि रंग बदलतो. कासेत दूध राहिल्यामुळे तीव्रता वाढते. दुधामध्ये गाठी तयार होतात आणि दूध उत्पादन कमी होते.
  • सुप्त कासदाह 

  • जनावर डोळ्यास दृश्‍य कोणतेही लक्षण दाखवत नाही.
  • दुधातील पेशींची म्हणजे सोमॅटिक सेलची संख्या वाढते. 
  • दूध उत्पादनात घट होते. 
  • कासदाहाच्या निदानासाठी परीक्षण सोमॅटिक सेल काउंट

  • सोमॅटिक सेल काउंट ही दुधाळ जनावरांमधील सुप्त कासदाह ओळखण्यासाठी सर्वांत प्रभावी चाचणी आहे. यामध्ये बाधित जनावरांच्या दुधातील पेशींची संख्या 
  • मोजण्यात येते. मुख्यत्वेकरून प्रति मिलिलिटर दुधामध्ये पांढऱ्या रक्तपेशी मोजल्या जातात. 
  • जर जनावर निरोगी असेल तर भारतामध्ये एक लक्ष पेशी दुधाच्या प्रति मिलिलिटरमध्ये कोणताही परिणाम दाखवत नाहीत. हेच प्रमाण जर दोन लक्ष पेशी प्रति मिलिलिटर वाढले तर दूध उत्पादन कमी होते. याला जनावरांमध्ये सुप्त प्रकारचा कासदाह आहे असे म्हणतात.
  • जर बाधित जनावरांमध्ये हेच प्रमाण तीन लक्ष पेशी प्रति मिलिलिटर दुधात आढळल्यास जनावरांना औषधोपचाराची गरज भासते. 
  • आजार संसर्गजन्य असल्यामुळे गोठ्यातील इतर जनावरांची तपासणी करणेदेखील आवश्यक असते. बऱ्याच जागी डेअरीमधून घेतलेल्या दुधाचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतात.
  • कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट

  • कमी खर्चाची गोठ्यात करता येणारी सोपी चाचणी आहे.
  • यामध्ये कॅलिफोर्निया मस्टायटिस रसायन द्रावण हे एका चार खणी पॅडलमध्ये घेतले जाते आणि त्यामध्ये बाधित सडातील दूध टाकून ते रसायनासोबत एकत्रित केले जाते. १० ते १५ सेकंद कालावधीनंतर प्रादुर्भाव झालेल्या दुधाचे जेलीमध्ये रूपांतर होते.
  • कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्टची संवेदनशीलता ही ८६.२० टक्के एवढी आहे.
  • सर्फ फिल्ड टेस्ट 

  • घरगुती वापरात असणाऱ्या धुण्याच्या सोड्याचे ३ टक्के द्रावण (अर्ध्या लिटर पाण्यात १५ ग्रॅम घरगुती वापरातील धुण्याचा सोडा मिसळून एकजीव तयार केलेले द्रावण) तयार करून घ्यावे.
  • तयार केलेले द्रावण आणि सडातील दूध सारख्याच प्रमाणात घेऊन (उदा. १० मिलि दूध आणि १० मिलि द्रावण) एक मिनिट चांगले मिसळून घ्यावे.
  • द्रावणात जेली तयार झाल्यास असे नमुने सुप्त कासदाहासाठी सकारात्मक असल्याचे दिसते. यामुळे जनावरांवर तातडीने उपचार करावेत. 
  • - डॉ. गिरीश पंचभाई,  ९७३०६३०१२२ (पशू उत्पादन व व्यवस्थापन विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com