जल, मृद्संधारण, बियाणे तपासणी महत्त्वाची

कमी-अधिक पर्जन्यमान, दोन पावसांतील मोठा खंड अशा निसर्गाच्या लहरीपणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामाचे योग्य नियोजन करणे जरुरीचे होते. ऐनवेळी निविष्ठा उपलब्ध करण्यामुळे त्यांची अनुपलब्धता आणि खर्चातील वाढ या बाबी टाळता येतील.
जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यासाठी उताराला आडवे सपाट वाफे तयार करावेत.
जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यासाठी उताराला आडवे सपाट वाफे तयार करावेत.

महाराष्ट्रातील ८२ टक्के शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. कमी-अधिक पर्जन्यमान, दोन पावसांतील मोठा खंड अशा निसर्गाच्या लहरीपणाच्या पार्श्‍वभूमीवर खरीप हंगामाचे योग्य नियोजन करणे जरुरीचे होते. ऐनवेळी निविष्ठा उपलब्ध करण्यामुळे त्यांची अनुपलब्धता आणि खर्चातील वाढ या बाबी टाळता येतील. खरीप हंगामात पिकांचे नियोजन करताना आपल्या विभागातील हवामान, जमिनीचा प्रकार, ओलिताची साधने यांचा विचार करून पिकांची निवड करावी. त्यापूर्वी माती परीक्षण, पूर्वमशागत, सेंद्रिय खतांचा वापर, संकरित तसेच सुधारित वाण, वेळेवर पेरणी, शिफारशीनुसार पेरणीनंतर हेक्‍टरी झाडांची संख्या, खतांच्या मात्रा, पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन, तणनियंत्रण अशा घटकांकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. माती परीक्षण  पिकांच्या भरघोस उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता टिकवणे महत्त्वाचे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी माती परीक्षण करून घ्यावे. त्यामुळे जमिनीची प्रत समजते. माती परीक्षणावरून जमिनीची आम्लता, विम्लता आणि क्षारांचे प्रमाण कळते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या प्रमाणानुसार नियोजित पिकाला किती प्रमाणात अन्नद्रव्य द्यावयाची या नियोजन करता येते. पूर्वमशागत  पिकांच्या मुळांची वाढ चांगली व्हावी, यासाठी खोल नांगरट करावी. त्यानंतर २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडावीत. आधीच्या पिकाची धसकटे, पाला व इतर कचरा गोळा करून तो कुजवावा. शेत स्वच्छ ठेवावे. त्यामुळे कीड व रोगांच्या सुप्तावस्था नष्ट होण्यास मदत होते. उपलब्धतेप्रमाणे शेणखत, कंपोस्ट खत शिफारशीत मात्रेत जमिनीत मिसळावे. सपाट वाफे  शेतीत जिथे पाणी मुरण्याचा वेग जास्त आहे आणि जमिनीला फारसा उतार नाही, अशा ठिकाणी उताराला आडवे वाफे तयार करावेत. खरीप हंगामात वाफे तयार करताना रिजरने उभे-आडवे ६६ मीटर अंतरावर उतारास आडवे वाफे तयार करावेत. वरब्याची उंची २० ते ३० सें.मी. ठेवावी. असे वाफे जागच्या जागी पाणी मुरण्यास मदत करतात. अशा जमिनीमध्ये नेहमीपेक्षा ५० टक्के जास्त ओल साठवली जाते. सरी-वरंबे  मध्यम ते भारी जमिनीत खरीप हंगामात बळिराम अथवा लोखंडी नांगराने उतारास आडवे तास घालावेत, त्यामुळे जमिनीत सऱ्या तयार होतात. पडणाऱ्या पावसाचे पाणी सऱ्यातून जमिनीत मुरते. सऱ्यांमुळे उताराची लांबी कमी होऊन निरनिराळ्या भागात विभागली जाते. वाहून जाणाऱ्या पाण्यास जागोजागी अडथळे निर्माण होतात. पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. या पद्धतीत ८० टक्‍क्‍यांपर्यंत पाणी जमिनीत मुरते. सऱ्यांची लांबी साधारण ९० मीटरपर्यंत ठेवावी. या पद्धतीमुळे ३५ ते ४० टक्के पीक उत्पादनात वाढ दिसून येते. समपातळीत मशागत  पाणलोट क्षेत्रातील माती व पाणी वेगवेगळ्या स्तरावर थोपवून धरली जाते. यासाठी जमिनीचे आवश्यक तेवढे सपाटीकरण, नांगरणी, कुळवणी, पेरणी यासारख्या मशागती समपातळीत, पण उताराला आडव्या दिशेने कराव्यात. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. जमिनीची धूप टाळता येते. बियाणे खरेदी करतानाची काळजी  खरीप हंगामासाठी बी बियाणे खरेदी करताना विशेष खबरदारी घ्यावी. बियाणे खरेदी करताना बियाण्याचे थैलीवर उत्पादकाचे नाव, बियाणे प्रमाणित आहे किंवा नाही याची नोंद, वजन व किंमत इ. माहिती पडताळून पाहावी. बियाणे थैलीवर प्रमाणीकरणाचे निळे लेबल शिवलेले असावे. सत्यस्थिती दर्शक म्हणून पिवळे लेबल लावलेले आहे की नाही, याची खात्री करावी. निविष्ठा खरीप पिकांचा नियोजनाचा आराखडा तयार केल्यानंतर आवश्यकतेनुसार लागणारे बियाणे सेंद्रिय खते रासायनिक खते बीजप्रक्रियेसाठी लागणारे बुरशीनाशके, जैविक खते तसेच विविध पिकासाठी लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये यांची जुळवाजुळव करून ठेवावी. वाणांची निवड हवामान,जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता इत्यादी नुसार पिकांची निवड केल्यानंतर, किती क्षेत्रावर कुठले पीक घ्यायचे ते निश्‍चित करावे. त्यानंतर पिकांच्या सुधारित व वाणांची निवड करावी. विविध पिकांचे उत्पादनामध्ये स्थिरता असणारे, पाण्याचा ताण सहन करू शकणारे, कमी कालावधीत तयार होणारे व कीड -रोगांना कमी बळी पडणारे वाण निवडावेत. खरीप पिकांचे संकरित व सुधारित वाण बाजरी

  • संकरित वाण - फुले आदिशक्ती, फुले महाशक्ती
  • सुधारित वाण - धनशक्ती
  • खरीप ज्वारी

  • संकरित वाण - सीएसएच- ५, सीएसएच -९ , सीएसएच -१० सीएसएच-१३, सीएसएच-१४, सीएसएच-१६ सीएसएच-१७, सीएसएच-१८, सीएसएच-२१, सीएसएच-२३ सीएसएच-२५ सीएसएच -३०, सीएसएस -३५
  • सुधारित वाण - एसपीव्ही- ४६२, सीएसव्ही- १३, सीएसव्ही-१५, सीएसव्ही-१७, सीएसव्ही-२३, सीएसव्ही- २७, , सीएसव्ही-२८, पीव्हीके -८०१.
  • मका लवकर तयार होणारे वाण

  • संकरित वाण - जेएच-३४५९, पुसा हायब्रीड-१, जेके-२४९२
  • संमिश्र वाण - पंचगंगा, प्रकाश, किरण
  • मध्यम कालावधीत तयार होणारे वाण

  • संकरित वाण- डीएचएम-११९, डीएचएम-११७, एचएम-४, एचएम-१०, राजश्री, बायो-९६३७
  • संमिश्र वाण- करवीर, मांजरी, नवज्योत.
  •  उशिरा पक्व होणारे वाण

  • संकरित वाण- पीएचएम-१, पीएचएम--३, सीड टेक-२३२४
  • संमिश्र वाण- प्रभात, शतक-९९०५
  • तूर आयएसपीएल -८७, विपुला, फुले राजेश्‍वरी, बीडीएन -७०८, बीडीएन -७११, बीएसएमआर-८५३, बीएसएआर -७३६, बीडीएन -७१६. पीकेव्ही-तारा मूग वैभव, पीकेव्ही ग्रीनगोल्ड, बीएम २००३-२, बीएम २००२-१, बीपीएमआर- १४५, उत्कर्षा उडीद बीडीयू -१, टीएयू १, टीपीयू -४, मेळघाट, पीकेव्ही उडीद- १५ भुईमूग फुले उन्नती, जे एल-५०१, टीजी-२६, फुले प्रगती (जे एल-२४), टी ए जी-२४, एस बी-११ सोयाबीन जेएस -३३५, एमएयूएस-७१, एमएयूएस-१५८, फुले कल्याणी (डी.एस.२२८) फुले अग्रणी (केडीएस-३४४) फुले किमया (केडीएस-७५३), फुले संगम (केडीएस-७२६), एमएयूएस-१६२, जेएस-९३०५. सूर्यफूल

  • सुधारित वाण- फुले भास्कर, एसएस-५६, मॉडर्न, भानू, ईसी-६८४१४
  • संकरित वाण- केबीएसएच -१, एलएसएफएच -१७१, एलएसएफएच-०८, केबीएसएच -४४, फुले रविराज, एमएसएफएच-१७.
  • तीळ फुले तीळ नं.-१, तापी (जेएलटी-७), पद्मा (जेएलटी-२६), जेएलटी-४०८. बियाण्याची उगवणशक्ती  पेरणीपूर्वी उपलब्ध असलेल्या बियाण्याची उगवणशक्ती तपासून घ्यावी. त्याकरिता बियाण्यांमधील शंभर दाणे न निवडता घ्यावेत. ते ओल्या फडक्यात किंवा गोणपाटाच्या तुकड्यात किंवा माती टाकलेल्या कुंडीत पेरावेत. त्यापैकी किती दाणे जोमदार उगवतात, त्यावरून त्याची टक्केवारी काढावी. त्यानुसार बियाण्याचे हेक्‍टरी प्रमाण ठरवावे. बियाण्याच्या उगवणशक्तीवरच हेक्‍टरी झाडांची संख्या अवलंबून असते. मागील हंगामातील घरचे बियाणे तसेच बाजारातील विकत घेतलेल्या बियाण्याची तपासणीसुद्धा घरी करून पाहावी. त्यानुसार बियाण्याचे हेक्टरी प्रमाण वापरावे. - डॉ. शरद जाधव, ९९७०९९६८९० (विषय विशेषज्ञ - कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र, मोहोळ, जि. सोलापूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com