लिंबूवर्गीय फळपिकांत पाण्याचे व्यवस्थापन करताना

लिंबूवर्गीय फळझाडे ही कमी किंवा अधिक पाण्यासाठी संवेदनशील असतात. बागेमध्ये अचूकतेने पाणी देण्यासाठी शास्त्रीय पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यातील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय किंवा प्लॅस्टिक आच्छादनाला प्राधान्य द्यावे.
Plastic mulching to reduce evaporation
Plastic mulching to reduce evaporation

लिंबूवर्गीय फळझाडे ही कमी किंवा अधिक पाण्यासाठी संवेदनशील असतात. बागेमध्ये अचूकतेने पाणी देण्यासाठी शास्त्रीय पद्धती जाणून घेणे गरजेचे आहे. उन्हाळ्यातील पाण्याचा ताण कमी करण्यासाठी ठिबक सिंचन, सेंद्रिय किंवा प्लॅस्टिक आच्छादनाला प्राधान्य द्यावे. विदर्भ मराठवाड्यातील बहुतांश फळबागा या विहिरी, कूपनलिका यावर आधारित आहेत. दरवर्षीच्या उपसा आणि दोन- तीन वर्षांतून येणारी दुष्काळ सदृश स्थिती यामुळे भूजल पातळी कमालीची खोल जाते. याचा फटका लिंबूवर्गीय फळबागांना बसतो. हे टाळण्यासाठी पुढील उपाययोजना महत्त्वाच्या आहेत. 

  • बागेमध्ये दोन झाडांच्या ओळींमध्ये सलग नाल्या काढाव्यात. यामुळे जमिनीची धूप २८-३० टक्के रोखली जाते. वाहून जाणारे पाणी ३२-३५ टक्के जमिनीत मुरवले जाऊ शकते.
  • नागपुरी संत्रा व कागदी लिंबाच्या लहान बागांमध्ये काळ्या पॉलिथिन कापडाचे आच्छादन (१०० मायक्रॉन) टाकावे. यामुळे १५ टक्के पाण्याची बचत होते. झाडांची वाढ जोमदार होते. वरील प्रकारे ३.२ हेक्टर क्षेत्रावरील पाण्याचे संवर्धन आणि काळ्या पॉलिथिन आच्छादनाद्वारे पाणी बचतीची उपाययोजना केल्यास, ठिबक सिंचन संचाद्वारे पाण्याचा वापर केल्यास २८८ संत्रा झाडांचे व्यवस्थित संगोपन करता येते.
  • जमिनीच्या उतारावरील नैसर्गिक नाल्यांना आडवा बांध बांधल्यास सिंचनासाठी पाणी साठवले जाते. सोबतच भूगर्भातील जलपातळी १ ते २.५ मीटरने वाढण्यास मदत होते.
  • पाण्याच्या असंतुलित मात्रेमुळे उद्‌भवणाऱ्या समस्या 
  • पाणी कमी झाल्यास 

  • गरजेपेक्षा कमी पाण्यामुळे (उच्च तापमान व पाण्याच्या ताणामुळे) झाडाच्या पानाखाली पर्णछिद्राचे (स्टोमेटा) तोंड बंद होते. प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रिया मंदावल्यामुळे कर्बोदकांचा पुरवठा कमी होतो. परिणामी फळांच्या देठाला पेशीक्षय होऊन फळगळ होते. झाडांचे आरोग्य बिघडते.
  • तंतुमय कार्यक्षम मुळे कमी येतात. झाडांची वाढ खुंटते.
  • मुळ्यांची कार्यक्षमता कमी होऊन अन्नपुरवठा प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम होतो.
  • पाने निस्तेज होतात, पिवळी पडतात आणि त्यांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते.
  • फळांसोबत पानगळ होते. एका फळाची पूर्ण वाढ होण्यासाठी किमान ४० पाने असावी लागतात.
  • सल वाढते, झाड कमकुवत बनते, झाडाची रोग प्रतिकारक्षमता कमी होऊन वाळण्याचे प्रमाण वाढते.
  • पाणी जास्त झाल्यास 

  • गरजेपेक्षा जास्त पाण्यामुळे झाडाच्या मुळांना प्राणवायू मिळत नाही. झाडांची मुळकुज, बुडकुज होण्यास सुरुवात होते. याशिवाय अन्नद्रव्ये कमी प्रमाणात शोषली जातात. माती, पाणी आणि हवा याचे योग्य संतुलन नसेल तर झाडातील कर्बोदके व संजीवक यांचे असंतुलन होते. पाने पिवळी पडतात, फळगळ अधिक होते.
  • झाडांची उत्पादन क्षमता कमी होते. फळांची प्रत निकृष्ट होते.
  • झाडे मुळकुज, डिंक्या व फायटोफ्थोरा यासारख्या बुरशीजन्य रोगास बळी पडतात. उत्पादनात घट येते. जमिनीचे आरोग्य बिघडते.
  • संतुलित पाणी मात्रा दिल्यास...

  • झाडास योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी पुरविले गेल्यास उत्पादनक्षमता दीर्घकाळपर्यंत टिकून राहते. सर्वसाधारणपणे प्रत्येक ओलितास हेक्टरी ९०,९२० लिटर पाणी लागते. 
  • संत्रा बागेचे पाणी देताना झाडाच्या बुंध्याशी पाण्याचा संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. ठिबक सिंचन नसेल तर दुहेरी आळे पद्धतीचा (बांगडी पद्धत) अवलंब करावा. यामुळे डिंक्या रोगाचा धोका कमी होतो.
  • संत्रा फळबागांना ओलित केव्हा द्यायचे हे ठरविण्यासाठी झाडाची आणि मातीची सूचक चिन्हे जाणून घ्यावीत. 
  •  उदा. पानाचा बदलता रंग, पाने कोमजणे आणि नवीन फुटीवरील पाने चुरमुडणे या बाबी पाण्याची गरज दर्शवितात. दुपारच्या उन्हात पानाला स्पर्श केल्यास पान थंड लागल्यास ओलिताचे प्रमाण ठीक असल्याचे समजावे. पान उष्ण लागल्यास ओलिताची गरज असल्याचे समजावे. जमिनीच्या पृष्ठभागापासून १० ते १५ सें.मी. खोलीपर्यंत ओलावा पाहावा. हा थर कोरडा असल्यास व माती बोटांना चिकटत नसली किंवा मातीचा सहजपणे गोळा बनविता येत नसेल, तर अशा वेळी बागेस ओलिताची गरज असल्याचे समजावे. ओलावा ५० ते ७५ टक्के असलेल्या मातीचा गोळा होऊ शकतो. २५ ते ५० टक्के ओलावा असलेल्या मातीचा गोळा होऊ शकत नाही, माती ठिसूळ राहते.   बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादन   

  •   च्छादनाचा (मल्चिंग) वापर केल्याने मुळांच्या जारव्याचे क्षेत्रात ओलावा कायम ठेवण्यासोबतच मातीचे क्षरणही बऱ्याच प्रमाणात थांबविले जाऊ शकते. मल्चिंगमुळे आळ्यात गवत वाढत नाही. 
  • झाडाच्या जोमदार वाढीसाठी जमिनीत ३० सें.मी. पर्यंतच्या थराची आर्द्रता टिकवण्यामध्ये आच्छादन उपयुक्त ठरते. 
  • आच्छादन केलेल्या झाडांना ओलितासाठी कमी पाणी लागते. 
  •  मल्चिंगने झाकलेल्या भागावर हानिकारक जिवाणू इ. प्रादुर्भाव होत नाही. 
  • जमिनीत उपलब्ध ओलाव्याचे बाष्पोत्सर्जन थांबवते. तसेच जमिनीचा पोत यथास्थिती टिकवून ठेवते. 
  • आच्छादित झाडांच्या मुळांची वाढ चांगल्या प्रमाणात होते. 
  • काळ्या किंवा पांढऱ्या पॉलिथिन किंवा गवताच्या आच्छादनामुळे झाडास दिलेल्या पाण्याची बचत होते. उत्पादनात वाढ होते.
  • उन्हाळ्यात जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता ३ ते ५ सें.मी. जाडीचा गवताचा थर द्यावा. वाफा आच्छादित करावा. यामुळे बाष्पीभवन कमी होते. फळांची गळ थांबून रसाचे प्रमाण वाढते.
  • सिंचनाचे प्रमाण ठरवण्याची शास्त्रीय पद्धत

  • संत्रा व लिंबू फळबागांसाठी पाण्याची गरज काढताना दररोजचे बाष्पीभवन, बाष्पीभवन पात्र गुणांक, पीक गुणांक व भिजवायचे क्षेत्र यांचा विचार करतात.
  • बाष्पीभवन हे दररोज हवामानानुसार बदलत असते. सामान्यतः उन्हाळ्यात १० ते १२ मि.मी., पावसाळ्यात ५ ते ८ मि.मी., हिवाळ्यात ३ ते ५ मि.मी., सरासरी १२.८ मि.मी. प्रति दिवस बाष्पीभवन धरले जाते.
  • बाष्पीभवन मोजण्यासाठी बाष्पीभवन पात्राचा उपयोग करतात. मात्र पिकाजवळील तापमान व पात्राजवळील तापमान (लोखंडी असल्यामुळे) यांत फरक असतो. यामुळे बाष्पीभवन पात्र गुणांक ०.७ इतका घेतला जातो.
  • पीक गुणांक - पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पीक गुणांक विचारात घेऊन पाण्याची गरज काढतात. हा गुणांक ०.३ ते १.२५ असू शकतो. कारण तो वाढीनुसार व पिकानुसार बदलतो. संत्रा पिकासाठी, मध्यम झाडासाठी ०.७५ धरतात.
  • फळबागेमध्ये ठिबक सिंचन पद्धतीत सर्व क्षेत्रास पाणी देत नाही. तर झाडाच्या मुळांना म्हणजेच जमिनीच्या ४० ते ६० टक्के भाग भिजवतो म्हणून ओलित गुणांक हा ०.४ ते ०.६ इतका धरला जातो. (सरासरी ०.५).
  • दोन झाडांतील ओळीतील अंतर ६ मीटर बाय ६ मीटर  
  • फळ झाडास लागणारे पाणी (लिटर प्रति दिवस)  = अ × ब × क ×  ड  फळ झाडास लागणारे पाणी (लिटर/दिवस)    = अ × ब × क × ड         = (१२.८ × ०.७ × ०.७५) मीटर × ०.५ × ६ × ६         = ११०.६ (लिटर/दिवस/झाड) ठिबक चालवण्याची वेळ (तास)            झाडास द्यावयाचे पाणी (लिटर प्रति झाड प्रति दिवस)  = ----------------------------------------------------------------------------------------        एका तोटीतून येणारे सरासरी पाणी (लिटर प्रति तास) × तोट्याची संख्या ठिबक जलसिंचनाचे फायदे 

  • सूक्ष्म जल सिंचन पद्धतीने संत्रा व लिंबू फळपिकाच्या झाडाखालील उपमुळ्याच्या कार्यक्षेत्राच्या ५० ते ८० टक्के भागातच पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत ४० ते ६० टक्क्यांपर्यंत होते.
  • जमिनीत पाण्याचे व प्राणवायूचे प्रमाण योग्य साधले जाऊन संत्रा व लिंबू फळपिकाची वाढ उत्तम होते. २० ते २५ टक्क्यांपर्यंत पिकाचे उत्पादन वाढते.
  • सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने विविध कीड व रोगांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.
  • सूक्ष्म सिंचनामुळे फळांच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढते. चांगल्या प्रतीची फळे मिळतात.
  • सूक्ष्म जल सिंचन संचातून द्रवरूप अथवा पाण्यात विरघळणारी घनरूप खते देता येतात. खतांच्या मात्रेत २५ ते ३० टक्के बचत होते.
  • झाडांची चांगली वाढ होते. फळांचे उत्पादन १५-२० टक्के जास्त व चांगल्या गुणवत्तेचे मिळते.
  • - डॉ. अंबादास हुच्चे,  ०७५८८००६११८ (प्रमुख शास्त्रज्ञ (उद्यानविद्या), केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्था, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com