विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्‍यता

विदर्भ तसेच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आज, उद्या आणि मंगळवारी (ता. १७, १८, १९) पावसाची शक्‍यता आहे. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात बराच काळ पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे.
weekly weather
weekly weather

कोकण, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातून शुक्रवार (ता.१५) रोजी मॉन्सून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने जाहीर केले आहे. असे असले तरी विदर्भ तसेच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आज, उद्या आणि मंगळवारी (ता. १७, १८, १९) पावसाची शक्‍यता आहे. कोकण व पश्‍चिम महाराष्ट्रात बराच काळ पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. संपूर्ण हिंदी महासागरावर ढगांची दाटी आहे. बंगालच्या उपसागरावर, तसेच पश्‍चिम किनारपट्टीलगत अरबी समुद्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्‍यता आहे. गुरुवार (ता. २१) बंगालच्या उपसागरावरील व अरबी समुद्रावरील हवेचे दाब वाढण्याची शक्‍यता आहे. आज संपूर्ण भारतावर १००६ हेप्टापास्कल इतका समान हवेचा दाब राहील. तर उद्यापासून हवेच्या दाबात वाढ होण्याची शक्‍यता आहे. ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण कायम राहणे शक्‍य आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून तसेच वायव्येकडून असून, ला निनाचा प्रभाव कायम असल्याने आज, उद्या आणि मंगळवारी (ता.१७, १८, १९) विदर्भ व मराठवाड्यात पावसाची शक्‍यता आहे. ला निनाचा प्रभाव कायम राहिल्यास ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यांत काही वेळा अवेळी व अवकाळी पावसाची शक्‍यता राहील. उर्वरित महाराष्ट्रातून मॉन्सून परतला असून, यापुढे होणारे पाऊस हे मॉन्सूनोत्तर म्हणजेच अवेळी व अवकाळी असणार आहेत. कोकण  आज कोकणातील सर्वच जिल्ह्यांत, तर उद्या रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे. फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या ४ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३८ ते ५० टक्के राहील. उत्तर महाराष्ट्र  आज आणि उद्या नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. जळगाव जिल्ह्यात उद्या ८ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ५० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १९ ते २६ टक्के राहील. मराठवाडा  आज नांदेड जिल्ह्यात २४ मि.मी., परभणी जिल्ह्यात ४ मि.मी., हिंगोली जिल्ह्यात १० मि.मी., औरंगाबाद जिल्ह्यात १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तर उद्या लातूर जिल्ह्यात २१ मि.मी., नांदेड जिल्ह्यात ४० मि.मी., बीड जिल्ह्यात ५ मि.मी., परभणी जिल्ह्यात ३० मि.मी., हिंगोली जिल्ह्यात १४ मि.मी., जालना जिल्ह्यात २३ मि.मी. व औरंगाबाद जिल्ह्यात ३२ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. आज आणि उद्या उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून, तर उस्मानाबाद जिल्ह्यात आग्नेयेकडून आणि औरंगाबाद जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश, तर किमान तापमान २० ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के राहील. पश्‍चिम विदर्भ  आज बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ११ ते १४ मि.मी. तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १६ ते १९ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत १७ ते २० मि.मी. तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २७ ते ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ५ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ८५ टक्के, तर दुपारची ३२ ते ४० टक्के राहील. मध्य विदर्भ  आज वर्धा जिल्ह्यात १६ मि.मी., नागपूर जिल्ह्यात २० मि.मी., यवतमाळ जिल्ह्यात २७ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या वर्धा जिल्ह्यात १९ मि.मी., नागपूर जिल्ह्यात १९ मि.मी. व यवतमाळ जिल्ह्यात ३६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा यवतमाळ जिल्ह्यात वायव्येकडून, वर्धा जिल्ह्यात आग्नेयेकडून, तर नागपूर जिल्ह्यात ईशान्येकडून राहील. कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९३ टक्के, तर दुपारची ५० टक्के राहील. पूर्व विदर्भ  आज चंद्रपूर जिल्ह्यात २४ मि.मी., भंडारा व गडचिरोली जिल्ह्यांत ३१ ते ३६ मि.मी. तर गोंदिया जिल्ह्यात ५३ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. उद्या चंद्रपूर जिल्ह्यात २१ मि.मी., गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ४० ते ४२ मि.मी. तर भंडारा जिल्ह्यात २६ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्य व आग्नेयेकडून राहील. भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ती ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९७ टक्के व दुपारची ५८ ते ७६ टक्के राहील. दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र  आज कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत, तर उद्या सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. उद्या कोल्हापूर जिल्ह्यात ५ मि.मी. पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत २० अंश सेल्सिअस, तर सोलापूर व सांगली जिल्ह्यांत २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८४ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ५० ते ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ४५ टक्के राहील. कृषी सल्ला 

  • हरभरा आणि रब्बी बागायत ज्वारीची पेरणी वेळेवर करावी.
  • रब्बी हंगामात कांदा लागवडीसाठी एन-२-४-१ ही जात निवडावी. ही जात गरव्या प्रकारातील असून अधिक उत्पादन देते.
  • कोकणात हळव्या भात जातीची कापणी व मळणीची कामे उरकून घ्यावीत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com