पानवेल लागवडीसाठी जोमदार बेणे निवडा

आधारवृक्षाच्या बुंध्याशी वाफ्याच्या बाजूस खोल चर करावा. बेण्याचा शेंडा वर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त भाग चरात व्यवस्थित बसवून लागवड करावी.
आधारवृक्षाच्या बुंध्याशी वाफ्याच्या बाजूस खोल चर करावा. बेण्याचा शेंडा वर ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त भाग चरात व्यवस्थित बसवून लागवड करावी.

पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी, रेती मिश्रित गाळाची तांबडी माती निवडावी. लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर उत्पादन मिळते. लागवडीसाठी ३ ते ५ वर्षे वयाच्या रोगमुक्त वेलीच्या शेंड्याकडील ४५ सें.मी. लांबीचे (३ ते ५ कांडे) व ५ ते ६ पाने असलेले रसरशीत फांद्यांचे जोमदार बेणे निवडावे. पानवेलीसाठी थंड छाया, हवेत दमटपणा आणि जमिनीत सतत ओलसरपणा असावा लागतो. वार्षिक पर्जन्यमान ४० ते ७५ से.मी. इतके आवश्‍यक असते. पिकास कोरडे व उष्ण हवामान तसेच जोराचा वारा व अतिथंडी मानवत नाही. तापमान १० अंश सेल्सिअसच्या खाली आल्यास वेलीस इजा होण्याची शक्‍यता असते. परिणामी, तिची वाढ खुंटून पाने आकसतात. शेंड्यांची वाढ थांबते व काहीवेळा शेंडा मरतो. तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेल्यास वेल वाढीचा वेग मंदावतो, शेंडे व पानांची वाढ खुंटते. काही वेळा असे भाग जळण्याची शक्‍यता असते. चांगल्या वाढीसाठी पानमळ्यात उबदार हवामान तसेच आर्द्रता ६० ते ७० टक्केच्या दरम्यान असावी. जमीन या पिकास सुपीक, उत्तम निचरा होणारी, रेती मिश्रित गाळाची तांबडी माती तसेच साधारण चुनखडीयुक्त जमीन उपयुक्त आहे. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा. काळी माती असलेल्या जमिनीत किंवा पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत पानमळ्याची लागवड करू नये. उंच टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या जमिनीत पानमळा चांगला येतो. त्यामुळे अशा ठिकाणी पानमळा घेणे फायदेशीर ठरते. लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते. मंडप बांगला, मिठापान, मघई या जातीची लागवड बंदिस्त पद्धतीने करतात. याकरिता मांडव पद्धतीचा वापर केला जातो. मांडव तयार करण्यासाठी परंपरागत पद्धतीने बांबू, बल्ली व गवत यांचा उपयोग करतात. लोखंडी खांब व तार वापरून मांडव केल्यास त्यास वारंवार दुरुस्ती करावी लागत नाही. निवारा पानवेलीच्या ऊन, वारा व थंडीपासून संरक्षणासाठी पानमळ्याच्या चारी बाजूस ताट्या बांधून निवारा करावा. निवारा केल्याने वेलीच्या वाढीसाठी आर्द्रतायुक्त उबदार वातावरण निर्मिती होते. निवाऱ्यासाठी वाळलेले गवत,उसाचे पाचट इत्यादींचा उपयोग करावा. ताट्यांची उंची ७ फुटापर्यंत असावी. ताट्यांच्या आतील बाजूस तुतीचे छाट लावावेत. तसेच पांगाऱ्याच्या बिया प्रत्येक ठिकाणी टोकण करून घ्याव्यात. काही ठिकाणी ताटीच्या बाहेरील बाजूने यशवंत गवताचे ठोंब लावावेत. त्यामुळे ताट्यांना मजबुती येते तसेच त्या वाऱ्याने पडत नाहीत. त्याचप्रमाणे पानाच्या बांधणीसाठी केळीच्या सोपाची अत्यंत गरज असते. त्यामुळे पानमळ्यात केळी असणे महत्त्वाचे आहे. पानमळ्यास योग्य निवारा केल्याने चांगले उत्पादन मिळते. आंतरमशागत लागवडीनंतर वर्षातून दोनवेळा खुरपणी करून १-२ वेळा वाफ्यातील माती वेलीच्या बुंध्याला लावावी म्हणजे पाणी सारखे बसते. वेलीची बांधणी वेलीची वाढ होत जाईल तसतसे तिची आधारवृक्षाच्या खोडाला लव्हाळ्याने सैल बांधणी करावी. बांधणी कुशल मजुराकरवीच करून घ्यावी. वेळीच बांधणी न केल्यास वेल पडून वाकून मोडतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. वर्षातून साधारणतः ११ ते १२ बांधण्या कराव्या लागतात. सावली कमी करणे पानांची गुणवत्ता चांगली मिळवण्यासाठी शेवगा, पांगारा व शेवरी यांच्या फांद्या छाटणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात १०० टक्के, हिवाळ्यात ४० टक्के, पावसाळ्यात १५ ते २० टक्के सावली ठेवावी. मातीची भर   जमिनीचा पोत पाहून चांगल्या प्रतिची पाने मिळवण्यासाठी वर्षातून दोन वेळा माळरानाच्या तांबड्या मातीची मात्रा द्यावी. पहिला हप्ता हेक्‍टरी ४० टन इतका पावसाळा संपल्यावर व दुसरा हप्ता भरणीच्या अगोदर एक महिना वाफ्यात वापरावा. काळी किंवा नदी काठची पोयट्याची माती पानमळ्यात वापरु नये. डोंगराच्या पायथ्याशी असणारी माळरान जमिनीतील माती या कामी योग्य ठरते. खत व्यवस्थापन शक्‍यतो पानमळा लागवडीसाठी सेंद्रिय खतांचाच वापर करावा. रासायनिक खतांचाच वापर केल्यास रोगाचे प्रमाण वाढून पानमळ्याचे आयुष्य कमी होते. पाने साठवणुकीत फार काळ टिकत नाहीत. वेलीची चांगली वाढ, पानाचे भरपूर  उत्पादन मिळून पानाचा टिकाऊपणा वाढण्यासाठी २०० किलो नत्र शेणखतातून किंवा निंबोळी पेंडीतून वर्षांतून दोन वेळा द्यावे. पहिला १०० किलो नत्राचा हप्ता पावसाळ्याच्या सुरवातीस व उरलेला १०० किलो नत्राचा दुसरा हप्ता नोव्हेंबर महिन्यात वेलीच्या चुंबळीजवळ लहानसा चर काढून द्यावा.   पानाची काढणी वेलीवर नवीन पाने फुटल्यावर ३५ ते ४० दिवसांनी काढणीस तयार होतात. पण, ती तशीच पुढे ठेवून ६० ते ९० दिवसांनी काढणे चांगले. कारण, ती जास्त काळ टिकतात व त्यांना दरही चांगला मिळतो. पानांची काढणी दर १५ दिवसांनी करावी. योग्य आकाराची, जाडीची तसेच योग्य प्रमाणात देठ ठेऊन काढणी करावी. पानांच्या खुड्यानंतर आयुष्यमान वाढावे म्हणून डाग बांधण्यासाठी केळीच्या ओलसर पानांचा वापर करावा. ओलसर काढाच्या आच्छादनाचा वापर करून बनविलेल्या बांबूच्या करंड्यामध्ये पानांची बांधणी केल्यास पाने जास्त काळ टिकतात. पानवेलीच्या बेण्याची निवड व लागवड

  • पानवेलीची लागवड बेण्यापासून केली जाते. तसेच रोपे तयार करून किंवा संपूर्ण वेलीचे दोन दोन काड्याचे तुकडे करूनही काही भागात लागवड करतात. उत्तम लागवडीसाठी ३ ते ५ वर्षे वयाच्या रोगमुक्त वेलीच्या शेंड्याकडील ४५ सें.मी. लांबीचे (३ ते ५ कांडे) व ५ ते ६ पाने असलेले रसरशीत फांद्यांचे जोमदार बेणे निवडावे. लालसर व कमी कांडे किंवा फांद्या असलेले बेणे निवडू नये. त्यांना फांद्या व पाने कमी लागतात. बेणे हिरवे सफेदी असलेले व प्रत्येक कांड्यावर फांदी फुटलेली असावी.
  • एक एकर लागवडीसाठी १० ते १२ हजार बेणे लागते. शेवरीची उंची साधारणपणे ४० ते ५० सें.मी. झाल्यानंतर व पावसाची रिमझिम चालू असताना चालू असताना जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात वेलीची लागवड करावी. त्यासाठी शेवरीच्या बुंध्याशी वाफ्याच्या आतील बाजूस २५ ते ३० सें.मी. लांबीचा व ८ ते १० सें.मी . रुंदीचा व १० सें.मी. खोलीचा चर खुरपीच्या साहाय्याने घ्यावा. त्यात शेणखत व मातीमिश्रण थाेड्या प्रमाणात घालून बेण्याचा शेंडा वर करून अर्ध्यापेक्षा जास्त भाग त्यात व्यवस्थित बसवून वर पुन्हा माती भरून पायाने चांगले दाबून घ्यावे; जेणे करून तेथे हवेची पोकळी राहू नये, नाहीतर बेणे फुटण्यास वेळ लागतो.
  • दोन वेलीमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. वेल लावताना कांड्यावरील मुळे जमिनीकडील बाजूस येतील याची काळजी घ्यावी. वेल पायाने दाबत असताना कांड्यांवर वेल मोडणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • पाणी व्यवस्थापन वाफा पद्धत : या पद्धतीने जमिनीच्या मगदुराप्रमाणे पावसाळ्यात गरज भासल्यास, हिवाळ्यात १० दिवसांच्या अंतराने तर उन्हाळ्यात ५ ते ६ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. या पद्धतीत वाफ्यांना भरपूर पाणी दिले जाते. पुष्कळदा वेलीच्या गरजेपेक्षा ते जास्त होते. त्यामुळे पाणी तर वाया जातेच तसेच मुळ कुजव्या व इतर रोगांचे प्रमाण वाढते. परिणामी, चांगली पाने कमी प्रमाणात मिळतात. ठिबक सिंचन पद्धत : वेलीस पाणी देण्यासाठी ही पद्धत अत्यंत फायदेशीर आहे. यात पाण्याची ५० टक्के बचत होऊन उत्पादनात ४० टक्के वाढ होते. तसेच, पानाची गुणवत्ता चांगली मिळते व मुळ कुजव्या रोगाचे प्रमाण फारच कमी राहते. या पद्धतीने प्रतिमीटर क्षेत्रास सिंचन करावे.

    संपर्क : संदीप डिघुळे, ७७०९५४७३०७ (पानवेल संशोधन योजना, तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com