चिकू पीक सल्ला

चिकू पीक सल्ला
चिकू पीक सल्ला

चिकू फळबागेत येत्या दीड महिन्याच्या कालावधीत फळातील बी पोखरणारी अळी, कळी पाेखरणारी अळी, पाने व कळ्या खाणारी अळी, खोड पोखरणारी अळी व फळमाशी या कीडींचा प्रादुर्भाव होतो. योग्य वेळीच या कीडींचे नियंत्रण न केल्यास उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. वरील कीडींमुळे पिकाचे होणारे नुकसान बहुतांश कीडींमध्ये सारखेच असते. त्यामुळे त्यांचा जीवनक्रम व नुकसानीच्या पद्धतीचा अभ्यास करून नियंत्रणाच्या अचूक उपाययोजना करता येतात.

कळी पोखरणारी अळी :   ओळख : किडीची अळी अवस्था ही नुकसानकारक आहे. मादी चिकूच्या फुलकळीवर अंडी घालते. अंडी पांढऱ्या रंगाची असतात;  उबवताना त्यांचा रंग पिवळसर तपकिरी बनतो. नुकसान : अंड्यातून ३-४ दिवसांत बाहेर पडलेली अळी कळी पोखरून खाते. वाढ पूर्ण होण्याच्या कालावधीत २ ते ३ कळ्यांचे नुकसान करते. पोखरलेल्या कळ्या कालांतराने पोकळ बनून सुकतात. त्यामुळे फळधारणा कमी प्रमाणात होऊन उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट येते. पूर्ण वाढलेली अळी गुलाबी रंगाची असून, तिची लांबी ९ ते ११ मि.मी. असते. पूर्ण वाढलेली अळी प्रादुर्भावग्रस्त कळ्यांवर कोषावस्थेत जाते. कोषातून बाहेर पडलेले पतंग लहान आकाराचे राखाडी रंगाचे असतात.

नियंत्रण :

  • पिकावर ५० टक्के फुले आल्यानंतर तसेच या कीडीचे पतंग जायबंद करण्यासाठी निळ्या रंगाचा प्रकाशसापळा (एकरी १) बागेत बसवावा.
  • किडीचा प्रादुर्भाव मे-जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात दिसून येतो. नियंत्रणासाठी कीटकनाशकांच्या तीन फवारण्या एक महिन्याच्या अंतराने मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कराव्यात.
  • फवारणी प्रतिलिटर पाणी :  डेल्टामेथ्रिन (२.८ ई.सी.) १ मिलि. किंवा लॅम्बडा-सायहॅलोथ्रिन १ मि.लि.
  • फळातील बी पोखरणारी अळी ओळख : किडीचे पतंग आकाराने लहान असून, त्याचे पुढील पंख पांढऱ्या रंगाचे असून, त्यावर तपकिरी रंगाची नक्षी असते.  कीडीची अळी अवस्था नुकसानकारक आहे. मादी नवीन कळ्या व फळांवर ८ ते १० अंडी घालते. तयार झालेल्या फळावर जास्तीत जास्त दोन अंडी घालते. तसेच पानाच्या मध्यशिरेवर अंडी घालते. अंडी अतिशय चपटी असतात. नुकतीच घातलेली अंडी पारदर्शक असून, अळी बाहेर पडण्याच्या स्थितीत फिकट तपकिरी होतात.

    नुकसान : अंडी उबवल्यानंतर त्यातून सूक्ष्म फिकट केशरी रंगाची अळी बाहेर पडते. तिचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असते. ती देठाकडून कळीच्या पाकळ्या खाऊन फळात प्रवेश करते. फळाच्या गरातून थेट बीमध्ये प्रवेश करते. अळी सूक्ष्म असल्याने तिने पाडलेले प्रवेश छिद्र फळाच्या वाढीबरोबर भरून निघते. त्यामुळे अशा फळावर बाहेरून कोणतेही लक्षण दिसून येत नाही. मात्र बीमध्ये शिरलेली अळी बीजदले खाऊन त्यावर उपजीविका करते. पूर्ण वाढलेली अळी गर्द गुलाबी रंगाची, ८ ते ९ मि.मी. लांब असते. अळीची संपूर्ण वाढ फळाच्या आतील बीमध्ये होते. पूर्ण वाढ झालेली अळी बीचे कठीण कवच पोखरून फळावर २-३ मि.मी. व्यासाचे छिद्र पाडून बाहेर येते. तोंडावाटे बाहेर टाकलेल्या चिकट धाग्याला लोंबकळत पानाची कडा दुमडून कोषावस्थेत जाते, किंवा जमिनीवर येऊन मातीत किंवा पालापाचोळ्यात शिरून कोषावस्थेत जाते. कोष गदड गुलाबी/तपकिरी असतात.

    व्यवस्थापन :

  • झाडांची योग्य छाटणी करून बाग विरळ ठेवावी. त्यामुळे बागेत भरपूर सूर्यप्रकाश व खेळती हवा राहते.
  • झाडांच्या बुंध्यालगतची जागा नांगरून उलटापालट करावी. म्हणजे सुप्तावस्थेतील किडीच्या अवस्था कडक उन्हात मारल्या जातात किंवा त्यांना पक्षी खातात.
  • प्रादुर्भावग्रस्त पालापाचोळा व चिकूचे अवशेष गोळा करून जागोजागी छोटे ढीग करून जाळून टाकावेत.
  • बागेमध्ये निळ्या रंगाच्या प्रकाश सापळ्याचा (प्रतिएकरी १) वापर करावा. त्यामुळे प्रौढ पतंगांचा बंदोबस्त होतो.
  • फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी  : डेल्टामेथ्रीन (२.८ ई.सी.) १ मिलि. किंवा लॅम्बडा-सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १ मिलि. किंवा इंडोक्झाकार्ब (१४.५ ई.सी.) ०.५ मिलि. किंवा बी.टी. (बॅसिलस थुरिंजनेसिस) १ मिलि.किंवा
  • सूचना : कीटकनाशकांची गरजेनुसार आलटून पालटून फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी तयार फळे काढावीत.

    पाने आणि कळ्या खाणारी अळी : नुकसान : अळी पानांची जाळी करून पानांवर उपजीविका करते. तसेच कळ्यांना छिद्र पाडून आतील भाग खाते.

  • क्विनाॅलफॉस (२५ ई.सी.) २ मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
  • अळीने फांद्यावर तयार केलेली पानांची जाळी आतील अळीसह काढून त्यांचा नाश करावा.
  • खोड पोखरणारी अळी : नुकसान : अळी खोडाच्या सालीखालील पेशीवर उपजीविका करते. खोडावरील छिद्रातून बाहेर पडणाऱ्या चोथ्यावरून या किडीचा उपद्रव आणि तिचे वास्तव्य लक्षात येते.

    नियंत्रण : अळीचा मार्ग शोधून लोखंडी तारेचा हूक वापरून अळीचा नायनाट करावा. कीडग्रस्त फांद्या काढून जाळून टाकाव्यात.

    फळमाशी : नुकसान :  मादी फळाच्या सालीखाली अंडी घालते. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळातील गरामध्ये शिरतात आणि गर पोखरून खातात. अळीची पूर्ण वाढ फळातील गरात होते. पूर्णवाढ झाल्यानंतर अळी फळातून बाहेर येऊन जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते. या किडीचा प्रादुर्भाव एप्रिल ते जुलै या महिन्यांमध्ये बागेत आढळतो.

  • रक्षक सापळा ४ प्रतिहेक्‍टरी याप्रमाणे वापर करावा. सापळ्यामध्ये मिथिल युजेनॉल अमिष वापरून फळमाशीचे नर आकर्षित होऊन जायबंद केले जातात.
  • फळमाशीमुळे प्रादुर्भावग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.
  • बागेत आंतरमशागतीची कामे करून माती मोकळी ठेवावी.
  • टीप : चिकू पिकांवरील कीड नियंत्रणासाठी सुचविलेली उपरोक्त कीटकनाशके लेबलक्‍लेम नाहीत.

    संपर्क : ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६ (कृषी संशोधन केंद्र, पालघर, जि. पालघर.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com