कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरण

डोळा भरणे कलम पद्धत
डोळा भरणे कलम पद्धत

आंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली जाते. मोसंबीची अभिवृद्धी डोळा कलमाद्वारे केली जाते. चिकूची अभिवृद्धी भेट कलमाद्वारे करतात. नवीन कलमे शेडनेट हाऊसमध्ये किंवा सावलीत ठेवावीत. कलमांना नियमित पाणीपुरवठा करावा. कोय कलम कोकण विभागात आंब्याची अभिवृद्धी कोय कलमाद्वारे केली जाते. कोय कलम करण्यासाठी जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये (पावसाळी हंगामात) आंब्याची कोय स्वच्छ पाण्याने धुवून बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून गादी वाफ्यावर लावतात. या कोयीपासून तयार झालेले दोन महिने वयाचे निरोगी खुंट रोप कलमासाठी निवडावेत. कलम करण्यासाठी जातिवंत मातृवृक्षापासून निरोगी, पेन्सिलच्या जाडीची, १० ते १५ सें.मी. लांबीची डोळे फुगलेली कलम काडी काढावी. कलम काडीला पुढील बाजूने ४ ते ५ सें.मी. लांबीचा पाचरीसारखा काप घ्यावा. खुंट रोपावरती ‘व्ही’ आकाराचा तेवढ्याच लांबीचा काप घ्यावा. काप घेताना चाकू धारदार व तीक्ष्ण असावा. कलम काडी खुंट रोपावरती घट्ट बसवावी. पॉलिथीनच्या पट्टीने हा कलम जोड घट्ट बांधून घ्यावा. कलम जोड बांधल्यानंतर हे कलम शेणखत, माती मिश्रणाने भरलेल्या पिशवीत लावावे. कलमांना नियमित पाणीपुरवठा करावा. पाचर कलम कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात आंब्याची अभिवृद्धी पाचर कलमांद्वारे केली जाते. पाचर कलम करण्यासाठी ८ ते १२ महिने वाढीचे, पिशवीत तयार केलेले, निरोगी, तजेलदार, पेन्सिलच्या जाडीचे गावरान आंबा रोपे खुंट रोप म्हणून निवडावे. या खुंट रोपाच्या शेंड्यावरील भाग कलम चाकूने कापावा. त्यावरती ५ ते ६ सें.मी. लांबीचा ‘व्ही’ आकाराचा काप घ्यावा. कलम करण्यासाठी निरोगी जातिवंत मातृवृक्षाची १० ते १५ सें.मी. लांबीची शेंड्याकडील डोळा फुगलेली कलम काडी काढावी. त्यावर ५ ते ६ सें.मी. लांबीचा पाचरीसारखा काप घ्यावा. पाचरीसारखा काप घेतलेली कलम काडी खुंट रोपांच्या कापामध्ये बसवावी. पॉलिथीन पट्टीच्या साह्याने घट्ट बांधावी. कलम शेडनेट हाऊसमध्ये किंवा सावलीत ठेवावे. कलमांना नियमित पाणीपुरवठा करावा. २० ते ३० दिवसांत कलमावरील डोळे फुटण्यास सुरुवात होते.

भेट कलम चिकूची अभिवृद्धी भेट कलमाद्वारे करतात. त्यासाठी खिरणी या खुंट रोपाचा वापर करतात. प्रथम मडक्‍यात किंवा पॉलिथीन पिशवीत खिरणीच्या बियापासून ३० ते ४५ सें.मी. उंचीचे पेन्सिलच्या जाडीचे खुंट रोप करावे. जातिवंत चिकू मातृवृक्षाची १ वर्ष वयाची परिपक्व फांदी निवडावी. कलम फांदी व खुंट रोप यांची जाडी, वय सारखे असावे. कलम फांदी जमिनीपासून उंचावर असल्यास त्याखाली मांडव करुन खुंट रोप त्यावर ठेवावे. कलम फांदी व खुंट फांदीवर ५ सें.मी. लांबीचा काडीच्या एका बाजूने तीक्ष्ण, समान, उथळ काप घ्यावा. दोन्ही फांद्या जुळवून पॉलिथीन पट्टीने घट्ट बांधाव्यात. कलमांना नियमित पाणीपुरवठा करावा. ६० ते ९० दिवसात कलम जोड एकजीव होतो. कलम मातृवृक्षापासून अलग करून सावलीत ठेवावे. तीन महिन्यांनंतर लागवडीसाठी वापर करावा. डोळा भरणे मोसंबीची अभिवृद्धी डोळा कलमाद्वारे केली जाते. मोसंबी डोळा कलमासाठी जंबेरी किंवा रंगपूर लाईम या खुंट रोपाचा वापर करतात. निवडलेले खुंट रोप हे जोमदार वाढीचे, पेन्सिलच्या जाडीचे, किडरोग मुक्त असावे. एक वर्ष वयाचे खुंट रोप डोळे भरण्यासाठी निवडावे. डोळा काडी काढण्यासाठी निरोगी, जातिवंत, चांगले उत्पादन देणारा मातृवृक्ष निवडावा. विषाणूजन्य रोगापासून मुक्त असणारे मातृवृक्ष निवडावेत. या मातृवृक्षापासून पेन्सिलच्या जाडीचे सुप्त अवस्थेत; परंतु फुगलेले डोळे असलेली काडी काढावी. डोळे घेण्यापूर्वी कलम फांदीवरील पाने, देठ काढावे. मोसंबीचे शील्ड किंवा ‘टी’ पद्धतीने डोळा भरला जातो. डोळा भरण्यासाठी तीक्ष्ण चाकूने खुंट रोपावरती इंग्रजी ‘टी’ आकाराचा काप घ्यावा. कलम फांदीवरून ढालीच्या आकाराचा सालीसहीत डोळा काढावा.  तो या ‘टी’ आकाराच्या कापामध्ये घट्ट बसवावा. काप बसण्यासाठी ‘टी’ आकाराच्या छेदामध्ये चाकूच्या मागील टोक घालून साल सैल करावी. नंतर डोळा खालील बाजूस सरकवून तंतोतंत बसवावा. डोळ्याचा फुगीर भाग उघडा ठेवून वरील व खालचा भाग ३० सें.मी. लांब व २ सें.मी. रुंद पॉलिथीन पट्टीने घट्ट बांधावा. २० ते ३० दिवसांमध्ये डोळे फुटल्यानंतर पॉलिथीन पट्टी काढावी. खुंट रोपाचा वरचा भाग कापून टाकावा. डोळा भरताना खुंटावरती जमिनीपासून ५ ते २५ सें.मी. उंचीवरतीच डोळे भरावे.

संपर्क : अमोल क्षिरसागर,९८२२९९१४९५ (उद्यानविद्या विभाग महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी. )

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com