मानवी आरोग्यासाठी मातीच्या आरोग्याकडे हवे लक्ष

जमिनीची सुपीकता
जमिनीची सुपीकता

मे महिन्याचा दुसरा रविवार हा जागतिक मातृदिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या मातेच्या आठवणीसोबतच ज्या मातीवर आपला पिंड पोसला जातो, त्या मातीच्या आरोग्याच्या रक्षणाचा संकल्प करण्याची खरी गरज आहे. जमिनीच्या खालावलेल्या आरोग्यामुळे मानव आणि पशूच्या आरोग्यांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मृद विज्ञान संघटनेमार्फत (आय. यू. एस. एस.) २०१५-२०२४ हे दशक मृदा आरोग्य दशक म्हणून घोषित केले असून, याच पार्श्‍वभूमीवर ॲग्रोवनने सन २०१८ हे वर्ष जमीन सुपीकता वर्ष म्हणून घोषित केले आहे. जमीन ही नैसर्गिक देणगी असून, जमिनीच्या पृष्ठभागावर मातीचा एक इंच थर नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी ३०० ते ५०० वर्षे कालावधी लागतो. जमिनीचे आरोग्य म्हणजे सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान, क्षारांचे प्रमाण १ टक्‍क्‍यापेक्षा कमी, सेंद्रिय कर्ब १ टक्‍क्‍यापेक्षा, चुनखडीचे प्रमाण ५ टक्‍क्‍यापेक्षा कमी, १ चौ.मी. जमिनीमध्ये कमीत कमी १ गांडूळ, पाण्याचा योग्य निचरा, पाणी व हवेचे योग्य प्रमाण यामुळे होत असलेला सर्व अन्नद्रव्यांचा समतोल पुरवठा सातत्याने वाढत असलेल्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध होण्यासाठी प्रति वर्ष ६० लाख हेक्‍टर नवीन जमीन शेत लागवडीखाली आणावी लागण्याचा अंदाज जागतिक अन्नधान्य संघटनेने दिला आहे. भविष्यात पुरेसे व दर्जेदार अन्न निर्मिती मुख्य आव्हान ठरणार असून, यासाठी मातीची सुपीकता व आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे.

जमिनीच्या आरोग्यविषयक मुख्य समस्या : जमिनीची धूप, अशास्त्रीय सिंचन पद्धती, एकल पीक पद्धती, सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण, समस्यायुक्‍त (क्षारयुक्‍त, चोपण, पाणथळ) जमिनीचे नियोजन व व्यवस्थापन, अन्नद्रव्यांचा ऱ्हास व असमतोल, जमिनीचा अल्कधर्मी सामू, मशागतीस कठीण भारी काळ्या जमिनी, चुनखडीयुक्‍त जमिनीचे व्यवस्थापन आणि वृक्ष तोडीमुळे होणारा जमिनीचा ऱ्हास व मानवी हव्यासापोटी लागवडीयोग्य शेतजमिनीचा इतर गोष्टींसाठी वापर.

थोडक्यात उपाययोजना : मातीची सुपीकता जपण्यासाठी जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी पूर्व मशागत व आंतर मशागत योग्य प्रकारे करून भर खतांचा, हिरवळीच्या खतांचा, कंपोष्ट खतांचा वापर प्रत्येक प्रकारच्या जमिनीसाठी आवश्‍यक आहे. पिकांची फेरपालट आणि फेरपालटीमध्ये द्विदल पिकांचा समावेश असावा. शेतातील पिकांच्या अवशेषांचा जमिनीच्या व्यवस्थापनामध्ये वापर वाढवावा लागेल. जमिनीचा ऱ्हास रोखण्याठी योग्य भू सुधारकांचा वापर करावा लागेल. खतांचा व सिंचनाचा कार्यक्षम वापर करावा. जमिनीचे आरोग्य संवर्धनासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक शेती पद्धती, शेतीची पशुधनाशी सांगड या गोष्टींचा अवलंब करावा. तसेच मृद व जलसंधारण करून जमिनीची धूप टाळावी. शेतकऱ्यांनी माती व पाणी परीक्षण करूनच अहवालाच्या आधारे शिफारशींचा वापर करावा. जमिनीला जिवंतपणा आणण्यासाठी जिवाणू/जैविक खतांचा नियमित वापर करावा.

जमिनीच्या आरोग्याबाबतचे विविध अहवाल

  • सन २०११ मध्ये अन्न व कृषी संघटना (एफ. ए. ओ.)ने जागतिक स्तरावर २५ टक्‍के जमिनीचे आरोग्य बिघडले असल्याचे नमूद केले. त्यातच भारतात लागवडीखालील ४२ टक्‍के जमिनी नापीक झाल्याचा उल्लेख आहे.
  • सन २०१४-१५ मध्ये पर्यावरण मंत्रालयाने जमिनीचा ऱ्हास व दुष्काळ यामुळे जीडीपीमध्ये २.५४ टक्‍क्याने घट होत असल्याचे सांगितले.
  • जागतिक स्तरावर दर मिनिटाला २३ हेक्‍टर जमिनीचा अनेकविध कारणामुळे ऱ्हास होत असून, त्यामुळे उत्पादनामध्ये २० दशलक्ष टन अन्नधान्याइतके नुकसान सोसावे लागत आहे.
  • सन २०१७ मध्ये हैद्राबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्थेने देशात अन्न पदार्थातील पोषक घटकांचे प्रमाण कमी होत आहे. यासाठी जमिनीतील पोषक अन्नद्रव्यांच्या कमतरता हे कारण असल्याचे सांगितले. पीक उत्पादनासोबतच मानवी आरोग्यांची काळजी घेण्यासाठी जमिनीच्या आरोग्याबाबत काळजी घेणे काळाची गरजेचे आहे. जागतिक मातृदिनानिमित्त मातीचे ऋण फेडण्याचा संपकल्प करू.
  • संपर्क : डॉ. हरिहर कौसडीकर, ७५८८०८२०४९ (संचालक (संशोधन), महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com