रुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणी

ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा सरी पेरणी यंत्राने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची झालेली चांगली वाढ.
ट्रॅक्‍टरचलित रुंद वरंबा सरी पेरणी यंत्राने पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाची झालेली चांगली वाढ.

सोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे कमी पावसाच्या काळात मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या काळात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होते. पावसाचा दीर्घकालीन खंड किंवा अधिकच्या पावसामुळे साचून राहणारे पाणी यामुळे पीकवाढ व उत्पादनावर विपरीत परिणाम होतो, उत्पादनात घट येते. अशावेळी पडणा­ऱ्या पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरविणे, तसेच अधिक पावसात अतिरिक्त पाणी शेताबाहेर सुरक्षितपणे निचरा करणे, पीकवाढीसाठी अनुकूल जमीन तयार करण्यासाठी रुंद वरंबा सरी लागवड पद्धत फायदेशीर ठरते.

  • सोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सरी यामुळे एकीकडे कमी पावसाच्या काळात मूलस्थानी जलसंवर्धन आणि अधिक पावसाच्या हंगामात अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा होण्यास मदत होते. तसेच ओलावा जास्त काळ टिकून राहतो, उत्पादनात वाढ होते.
  • मराठवाड्यामध्ये मध्यम ते भारी जमिनीचे प्रमाण अधिक आहे. कमी पावसात ओलावा कमी होऊन भेगा पडणे किंवा कमी दिवसांत किंवा सर्वसाधारण अधिक पाऊस झाल्यामुळे अशा जमिनीमध्ये पाणी साचून पिकांचे नुकसान होते. अशा वेळी पावसाचे प्रमाण, तीव्रता आणि जमिनीचा प्रकार लक्षात घेऊन विविध पिकांची लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने (बीबीएफ पद्धत) करावी.
  • रुंद वरंबा सरी पद्धतीचे फायदे :

  • पावसाचे पाणी स­ऱ्यांमध्ये मुरते. मूलस्थानी जलसंवर्धन होऊन पिकास, तसेच पुढील हंगामातील पिकास लाभ होतो. विशेषत: पावसाच्या दीर्घकालीन खंड काळात फायदा होतो. त्याची तीव्रता कमी होते.
  • अधिक पाऊस झाल्यास किंवा अधिकचे पाणी योग्य पद्धतीने निचरा होण्यास बीबीएफ पद्धतीमधील रुंद वरंब्यासोबतच्या दोन्ही बाजूंकडील सऱ्यांमुळे मदत होते.
  • जमिनीची चांगली मशागत होऊन पेरण्यांसाठी चांगले वरंबे तयार होतात. गादी वाफे किंवा वरंब्यामध्ये हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. त्यामुळे बियाण्याची चांगली उगवण होते. पिकाची पुढील वाढ जोमदारपणे होते.
  • बीबीएफ यंत्राच्या साह्याने आवश्यक रुंदींचे वरंबे दोन्ही बाजूंनी स­ऱ्यांसह तयार करणे, पेरणी आणि खते देणे अशी विविध कामे एकाच वेळी होतात.
  • मजुरांची तसेच ऊर्जेची बचत होते. बीबीएफ यंत्राने पेरणी करण्याची क्षमता परिस्थितीनुसार सरासरी ५ ते ७ हेक्टर क्षेत्र प्रतिदिन अशी आहे.
  • बीबीएफ पद्धतीमुळे पारंपरिक पद्धतीच्या (सपाट वाफे पद्धत) तुलनेत सरासरी २० ते २५ टक्क्यांपर्यंत अधिक जलसंधारण होते. २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात वाढ मिळू शकते.
  • अांतरमशागत करणे शक्य होते. उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर केल्यास प्रभावी तणनियंत्रण होते.
  • रुंद वरंबा सरी तयार करण्याची पद्धत :

  • हैदराबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्राने विकसित केलेले बीबीएफ यंत्र ट्रॅक्टरचलित आहे.
  • रुंद वरंबा सरी यंत्रामध्ये  ३० ते ४५ सें. मी. अंतराच्या बदलासह चार फण आणि ३० ते ६० सें.मी. रुंदीच्या सरीच्या बदलासह १५० ते १८० सें.मी. अंतरावर कमी जास्त करता येणारे दोन सरींचे फाळ आहेत. या यंत्राद्वारे गरजेनुसार ६० सें.मी. ते १५० सें.मी. रुंदीचा रुंद वरंबा तयार करून त्यावर पिकाच्या ३० ते ४५ सें.मी. अंतरावर २ ते ४ ओळी घेता येतात.
  • तयार झालेल्या रुंद वरंब्यावर टोकणयंत्राने बियाणे व खते पेरणी करता येतात. यंत्रामध्ये पिकाच्या दोन ओळी व दोन रोपांमधील अंतर शिफारस केलेल्या अंतरानुसार कमी जास्त करता येते. हेक्टरी आवश्यक झाडांची संख्या ठेवता येते.
  • सोयाबीन पिकाच्या एका रुंद वरंब्यावर तीन ते चार ओळी आवश्यक अंतरानुसार घेता येतात.
  • आवश्यक रुंदीचे रुंद वरंबे तयार होण्यासाठी ठराविक अंतरावर खुणा करून (म्हणजेच दोन फाळांत आवश्यक अंतर ठेवावे) त्यावर ट्रॅक्टरला जोडलेले बीबीएफ यंत्र बाजूने चालवावे. या वेळी सरीच्या फाळांमुळे तयार होणा­ऱ्या दोन्ही बाजूंच्या स­ऱ्या (आवश्यकतेनुसार) ३० ते ४५ सें.मी. रुंदीच्या पडतात. त्या गरजेनुसार कमी जास्त रुंदीच्या ठेवता येतात.
  • प्रयोगाचे निष्कर्ष :

  • सोयाबीन पिकांची पारंपरिक सपाट वाफे, सरी वरंबा आणि रुंद वरंबा सरी पद्धत अशा तीन पद्धतींनी एकाच दिवशी पेरणी केली.
  • सपाट वाफे पद्धत व सरीवरंबा पद्धतीच्या तुलनेत रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सोयाबीनची सरासरी उगवण दोन दिवस अगोदर, तसेच जोमदार झाल्याचे दिसून आले.
  • पीक काढणीनंतर सपाट वाफे पद्धतीने घेतलेल्या सोयाबीनच्या १०० दाण्यांचे वजन ११.५ ग्रॅम, सरी वरंबा पद्धतीध्ये ११.९ ग्रॅम आणि रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये १२.३ ग्रॅम आढळून आले. अशा प्रकारे सोयाबीन १०० दाण्याचे वजन रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सपाट वाफे पद्धतीपेक्षा ७.६ टक्के अधिक तर सरी वरंबा पद्धतीपेक्षा ३.६ टक्के अधिक मिळाले.
  • सोयाबीनचे हेक्टरी उत्पादन सपाट वाफे पद्धतीमध्ये ९९७ किलो/हे., सरी वरंबा पद्धतीमध्ये ११७४ किलो/हे. आणि रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सर्वाधिक १३१२ किलो/हे. मिळाले.
  • रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये सपाट वाफे पद्धतीपेक्षा ३१ टक्के अधिक आणि सरी वरंबा पद्धतीपेक्षा ११ टक्के अधिक उत्पादन मिळाले.
  • रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये घेतलेल्या सोयाबीन पिकापासून सर्वाधिक एकूण आर्थिक उत्पन्न हेक्टरी रुपये ३९,७७६ मिळाले, तर सर्वाधिक निव्वळ उत्पन्न हेक्टरी रुपये १५,१७१ मिळाले. त्या खालोखाल एकूण आर्थिक उत्पन्न हेक्टरी रुपये ३५,६०२, तर निव्वळ उत्पन्न हेक्टरी रुपये ८,९१२ सरी वरंबा पद्धतीने घेतलेल्या सोयाबीनमध्ये मिळाले. तर सर्वांत कमी एकूण आर्थिक उत्पन्न हेक्टरी रुपये ३०,४४९, तर निव्वळ हेक्टरी उत्पन्न रुपये ५,९२६ सपाट वाफे पद्धतीमध्ये आढळून आले.
  • रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये घेतलेल्या सोयाबीन पिकामध्ये सर्वाधिक पावसाच्या पाण्याची वापर कार्यक्षमता मिळाली.
  • बीबीएफ पद्धतीमुळे बियाण्यात २० टक्के बचत झाली. त्याच वेळी हेक्टरी झाडांची संख्या २० टक्क्यांनी कमी झाली. परंतु रुंद वरंब्यामुळे वरंब्याच्या दोन्ही बाजूंच्या ओळींतील झाडांना मिळालेला फायदा तसेच सर्वसाधारणपणे पिकांची चांगली उगवण, जोमदार वाढ, जलसंधारण, हवा खेळती राहणे, कीड व रोगांचा कमी प्रादूर्भाव,अधिक पावसाच्या दिवसांत पाण्याचा निचरा यामुळे जवळपास ३१ टक्के अधिक उत्पादन वाढ दिसून आली.
  • संपर्क : डॉ.भगवान आसेवार, ९४२००३७३५९ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com