‘ई-नाम’द्वारे शेतमालाचे ‘आॅनलाइन’ लिलाव

‘ई-नाम’द्वारे शेतमालाचे ‘आॅनलाइन’ लिलाव
‘ई-नाम’द्वारे शेतमालाचे ‘आॅनलाइन’ लिलाव

बाजार समित्यांमधील शेतमाल खरेदी-विक्रीच्या पारंपरिक पद्धतीतील फसवणूक राेखण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पातळीवर आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार अर्थात ‘ई-नाम उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांचा समावेश केला आहे. त्यानुसार विविध बाजार समित्यांंमध्ये आॅनलाइन लिलाव सुरू झाले आहेत. दाैंड (जि. पुणे) बाजार समितीतील ‘आॅनलाइन लिलाव विक्रीचा हा प्रातिनिधिक वृत्तांत...  

बाजार समित्यांमधील शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या पारंपरिक पद्धतींमध्ये हाेणारी फसवणूक राेखण्यासाठी केंद्र सरकारने शेतमाल खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय पातळीवर ‘इलेक्ट्राॅनिक प्लॅटफॉर्म तयार केला आहे. त्यास आॅनलाइन राष्ट्रीय कृषी बाजार (ई-नाम) असे संबाेधण्यात येत अाहे. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ३० बाजार समित्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील दाैंड बाजार समितीचा समावेश आहे.या अनुषंगाने बोलताना दाैंड बाजार समितीचे सभापती रामचंद्र चाैधरी म्हणाले की, आमच्या बाजार समितीमध्ये प्रामुख्याने गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी आदींची आवक होते. आम्ही ‘ई-नाम’च्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कक्ष उघडला आहे. आॅनलाइन लिलावाच्या प्रक्रियेचे अडते आणि खरेदीदारांना प्रशिक्षण दिले आहे.

‘ई-नाम’अंतर्गत दौंड बाजार समिती : ठळक बाबी

  • सध्या १४ अडत्यांकडून ऑनलाईन खरेदी-विक्री
  • सध्या केवळ गहू, हरभरा यांचे आॅनलाइन लिलाव
  • या प्रक्रियेत चार हजार शेतकऱ्यांची नाेंदणी
  • गव्हाचा हंगाम दिवाळीनंतर जाेमात सुरू हाेईल.
  • या हंगामात आतापर्यंत एक हजार ९५८ क्विंटल धान्याची आवक
  • शंभर टक्के ‘अाॅनलाइन’ लिलाव
  • संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रणासाठी केंद्र शासनाच्या
  • सूचनेनुसार ‘बाजारपेठ विश्लेषक’ म्हणून तांत्रिक अधिकारी
  • आॅनलाइन’ लिलावासाठी अपेक्षित सुविधा  :

  • माेठ्या प्रमाणात आवक मालाच्या लिलावासाठी माेठ्या प्रमाणात संगणक आणि सर्व्हरची गरज
  • नाशवंत शेतमालासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारायला हवी  लिलावात सुसूत्रता आणण्यासाठी शेतमालनिहाय स्वतंत्र विभाग हवा
  • लिलावाची बाेली शेतकऱ्यांच्या माेबाईलवर दिसण्याची सुविधा हवी.
  • शेतमालाचे दर पाडण्यासाठी व्यापाऱ्यांची साखळी हाेऊ नये म्हणून यंत्रणा हवी  
  • केवळ बाजार समितीमधील अडते खरेदीदारच लिलावात सहभागी हाेतात. मात्र राज्य आणि देशाच्या पातळीवर यंत्रणा व्यापक हाेण्याची गरज
  • आॅनलाइन’ची प्रक्रिया :

  • बाजार समिती परवानाधार आडते, व्यापारी, खरेदीदारांना ‘लॉगईन पासवर्ड
  • बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच शेतमालाच्या दर्जानुसार लॉट करून त्याच्या वजनाची संगणकीय प्रणालीत नाेंद. त्यानंतर शेतकऱ्याचे, अडत्याचे नाव, वाहन क्रमांक, माेबाईल क्रमांकासह शेतमालाच्या नाेंदीची पावती दिली जाते.
  • नाेंद शेतमाल अडत्याच्या गाळ्यावर ठेवला जाताे.
  • विविध आडते एकमेकांच्या गाळ्यावर जाऊन मालाचा दर्जा पाहून माेबाईलवर बाेली बाेलतात.
  • दुपारी दाेन वाजता आॅनलाइन प्रक्रिया थांबते. यावेळी झालेल्या बाेलींमध्ये सर्वाधिक बाेली अंतिम लिलाव संपल्यानंतर बाजार समिती कार्यालयात ताबडताेब हिशेब पट्टी हाेऊन एक तासात शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर पैसे जमा
  • लिलाव नाकारण्याचा अधिकार शेतकऱ्यांना  राज्यातील विविध बाजार समित्यांमधील आवकेची प्रवेशद्वारावर हाेणारी संगणकीय नाेंद आणि आॅनलाइन लिलावाचे प्रमाण 
  • १ सप्टेंबर ते ५ आॅक्टाेबरदरम्यानची आकडेवारी (प्रातिनिधिक)
    बाजार समिती        संगणकीय नाेंद (क्विंटल)    आॅनलाइन लिलाव (क्विं.)     टक्केवारी
    वर्धा     ६१९५.९५     ४८६८.५६    ७८.५८
    नंदुरबार     १३,३६६      ४६०५.६४ ३४.४६
    अकाेला      ५३,१९८   ३३१९.४७ ६.२४
    दाैंड     १९५८     १९५८  १००
    नगर    १३,४४८.२०   १७५७.१०     १३.०७
    नागपूर     ११७२८१.२१    १७२२.६४     १.४७
    मालेगाव     २८६५.४५   ५१७.३०  १८.०५
    परभणी    १८.४९ ३३०.१४ १७.८५
    सांगली   २८९.२९   २२१.६६   ७६.६२
    लाेणंद    १११९.१०    १८५.७९   १६.६०
    नेवासा   ८७     ७६   ८७.३६
    येवला    २४८६      ७२.३५    २.९१

    ३० पैकी १२ बाजार समित्यांमध्ये अद्याप आॅनलाइन लिलाव झाले नाहीत.

    तीस बाजार समित्यांमधील मुख्य आकडेवारी
    नाेंदणीकृत शेतकरी     १ लाख ७ हजार २९०
    आडते      ५ हजार ८५३
    व्यापारी   ५ हजार ८४२
    झालेली खरेदी-विक्री   ४९ हजार १४५ क्विंटल
    झालेली उलाढाल    १२ कोटी २० लाख ५५ हजार रुपये

    प्रतिक्रिया :  खरेदीदारांच्या दबावाखाली बाेली लावू शकत नव्हते. आॅनलाइन खरेदीमुळे काेण किती बाेली बाेलताे हे न कळता केवळ बाेली केलेले दर दिसतात. यामुळे स्पर्धा वाढत अाहे. शेतकऱ्यांना एक ते दाेन टक्के जास्त दर मिळत आहे. राजेंद्र मुनाेत, खरेदीदार, ९२२६७५२९९९

    ‘मी १८ पाेती गहू विक्रीसाठी आणला. गेटवर सर्व पाेत्यांचे वजन आणि दर्जासह नाेंदणी हाेऊन पावती दिली. दुपारी सव्वा दाेन वाजता अंतिम बाेलीवर १६५२ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. अडत्यांनी ‘आॅनलाइन’ पेमेंट केले. आॅनलाइन लिलाव प्रक्रिया चांगली वाटली. मात्र लिलावाच्या बाेलीचे आकडे आम्हाला माेबाईलवर दिसले पाहिजेत. तुकाराम अवचर, गहू उत्पादक, ९४२३०७७८६३

    ‘ई-नाम’ उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात प्रत्येकी बाजार समितीला ३० लाखांचा निधी देण्यात आला आहे. पुढील टप्प्यातील ३० बाजार समित्यांचा निधी लवकरच प्राप्त हाेईल. आॅनलाइन लिलाव पद्धती प्रभावीपणे राबविणाऱ्या बाजार समित्यांना पणन मंडळाच्या वतीने ५, ३, २ लाख रुपये आणि उत्तेजनार्थ एक लाखाचे दाेन पुरस्कार देऊन गाैरविण्यात येणार आहे. सुनील पवार, कार्यकारी संचालक, पणन मंडळ, पुणे

    संपर्क : रामचंद्र चाैधरी, सभापती, दाैंड बाजार समिती, ९९२३०१०९४०, संपर्क :  तात्यासाहेब टुले, सचिव, दाैंड बाजार समिती, ९९२२३५९२९२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com