भाजीपाला रोपवाटिका तयार करताना...

भाजीपाला रोपनिर्मितीसाठी निचरा होणारी जमीन निवडावी.रोपवाटिकेत लहान अवस्थेतील रोपांना झारीने सिंचन करावे.
भाजीपाला रोपनिर्मितीसाठी निचरा होणारी जमीन निवडावी.रोपवाटिकेत लहान अवस्थेतील रोपांना झारीने सिंचन करावे.

रोपवाटिकानिर्मिती करताना जागेची निवड खूप महत्त्वाची बाब आहे. जागा पृष्ठभागापासून उंचावर, पाण्याचा योग्य निचरा होणारी, उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी अंशतः सावली देणारी अशी असावी. सिंचन सुलभतेसाठी पाण्याच्या स्रोतापासून जवळ असणारी जागा निवडावी. भाजीपाला पिकांची रोपे लागवडीसाठी ३० ते ३५ दिवसांत तयार होतात. चांगल्या उत्पादनासाठी रोपवाटिकेत रोपांचे संगोपन ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

रोपे तयार करताना घ्यावयाची काळजी रोपवाटिकेत २ चौ.मीटर जागेला २० ग्रॅम नत्र, १०० ग्रॅम स्फुरद व १० ग्रॅम पालाश द्यावे. त्यापैकी संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि अर्धे नत्र बी पेरणीवेळी द्यावे. उर्वरित नत्र २०-२५ दिवसांनी द्यावे. गादी वाफ्यावर ८ तेे १० सें.मी. अंतरावर वाफ्याच्या रुंदीस समांतर ओळी तयार कराव्यात. त्यानंतर याच ओळींमध्ये २ सें.मी. खोलीवर बी पेरावे व त्यावर हलकासा मातीचा थर द्यावा. वाफ्याला बी उगवेपर्यंत रोज सकाळी संध्याकाळी झारीने पाणी द्यावे. रोपे लागवडीसाठी ४० ते ४५ दिवसांत तयार होतात. एक हेक्टर क्षेत्राच्या लागवडीकरीता मिरचीचे १ ते १.२५० किलो बियाणे पुरेसे होते. तसेच टोमॅटो आणि वांगी लागवडीसाठी अनुक्रमे ४०० ते ६०० ग्रॅम आणि ५०० ते ६०० ग्रॅम बियाणे पुरेसे होते.

उन्हापासून रोपाचे संगोपन तापमान जास्त झाले की रोपवाटिकेतील लहान रोपे दुपारच्या वेळेस कोमेजून जातात तसेच जमिनीलगत भाजून जातात. परिणामी रोपांच्या वाढीवर परिणाम होतो. रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ताट्यांचा वापर करावा. बियाणे उगवण्यापूर्वी ताट्या वाफ्यावर ठेवाव्यात. उगवल्यानंतर वाफ्याच्या ४ कोपऱ्यांवर खुंट्या लावून जमिनीपासून ३० ते ४५ सें.मी. उंच कराव्यात. त्यामुळे प्रखर उन्हापासुन रोपांचे संरक्षण होते. तसेच उपलब्ध तुरीचे किंवा बोरूचे घेर किंवा ज्वारीच्या पेंडीचा वापर करून रोपांना सरळ उन्हाचा त्रास होणार नाही या पद्धतीने सावली करावी. ओलित व्यवस्थापन बियांची उगवण झाल्यानंतर, जमिनीचा मगदूर पाहून ओलित व्यवस्थापन करावे. वाफ्यामधील पाण्याचा निचरा व्यवस्थित नसल्यास रोपांवर मुळकूज व रोप कोलमडणे अशा रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने होतो. रोपांच्या वाढीवरही अनिष्ट परिणाम दिसून येतो. म्हणून ओलित करताना वाफ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सिंचनासाठी सूक्ष्म तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास रोपांची वाढ चांगली होते व कमी पाण्यात जास्त जागेतील रोपसंगोपन होते. आंतरमशागत रोपांच्या जोमदार वाढीसाठी रोपवाटिकेची आंतरमशागत करणे, रोपवाटिका तणविरहित ठेवणे जरुरीचे ठरते. तण नियंत्रणासाठी रोपवाटिकेची आठवड्यातून १ ते २ वेळा कोळपणी करावी. कोळपणी किंवा आंतरमशागत करत असताना रोपांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. वरखते रोपवाटिकेतील दोन चौरस मीटर वाफ्यास २० ग्रॅम नत्र, १० ग्रॅम स्फुरद व १० ग्रॅम पालाश द्यावे. यापैकी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश बियाणे पेरणीसोबत द्यावे. उर्वरित नत्र बियाणे उगवणीनंतर २० ते २५ दिवसांनी दोन ओळींत टाकून द्यावे. भाजीपाला रोपांचे स्थलांतर व लागवड  

  • मिरची, वांगी, टोमॅटो आणि लवकर येणाऱ्या फ्लॉवरच्या जातीच्या ४-५ आठवड्यांची किंवा १५ ते २० सें.मी. उंचीची रोपांची मुख्य शेतात पुनर्लागवड करावी.   
  • जमीन कडक असल्यास पुनर्लागवडीसाठी रोपे काढताना मुळांना इजा हाेते. त्यामुळे रोपांच्या स्थलांतरापुर्वी रोपवाटिकेत आदल्या दिवशी पाणी द्यावे.
  • रोपांची पुनर्लागवड ढगाळ वातावरण किंवा पावसाची भुरभुर सुरू असताना केल्यास रोपे लवकर जमिनीत रुजतात. रोपवाटिकेतून रोप काढल्यानंतर त्यांचे उन्हापासून संरक्षणासाठी रोपे सावलीत झाकून ठेवावीत.
  • लागवडीपूर्वी मिरचीच्या रोपांचा शेंडे व पाने असणारा भाग १.५ मि.लि. क्विनाॅलफॉस अधिक विद्राव्य गंधक (८० टक्के) ३ ग्रॅम अधिक मॅंकोझेब २.५ ग्रॅम किंवा थायरम २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात बनविलेल्या द्रावणात बुडवून लावावीत.  
  • सपाट वाफ्यात लागवड करावी. मिरची तसेच टोमॅटोची लागवड ६० x ४५ सें.मी. किंवा ६० x ६० सें.मी.अंतरावर तर वांगी लागवड ७५ x ६० किंवा ७५ x ७५ सें.मी. अंतरावर करावी. फुलकोबीची लागवड ४५ x ४५ सें.मी. अंतरावर करावी. रोपे लावताना एका ठिकाणी एक रोप त्याची मुळे सरळ राहतील अशा पद्धतीने लावावीत. लागवडीनंतर भोवतालची माती चांगली दाबून घ्यावी. आवश्‍यकता असल्यास झारीने पाणी द्यावे.
  • रोपे चांगली रुजली म्हणजे वरखताची मात्रा द्यावी.
  • पीकसंरक्षण रोपवाटिकेत मावा, तुडतुडे आदी रस शोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो. रसशोषक किडी रोपांच्या पानांतून रस शोषण करतात. तसेच रोप कुरतडणाऱ्या अळ्या लहान रोपांचे शेंडे कुरतडून टाकतात. त्याशिवाय रोपांवर मूळकूज, रोप कोलमडणे आदी बुरशीजन्य रोगांचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यांच्या नियंत्रणासाठी उपायोजना राबवाव्यात. रसशोषक किडींचे नियंत्रण : फवारणी प्रतिलिटर पाणी क्विनाॅलफाॅस (२५ टक्के प्रवाही) १ मि.लि. किंवा अॅझाडिरॅक्टिन (१०,००० पीपीएम) १ मि.लि. रोपांची मूळकूज, रोप कोलमडणे रोग नियंत्रण : प्रमाण प्रतिलिटर काॅपर आॅक्झिक्लोराईड २.५  ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १ ग्रॅम सूचना : वरीलप्रमाणे मिश्रण करून आळवणी करावी.

    डाॅ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com