जंगलांची निर्मिती हाच वातावरण बदलावरील उपाय

जंगलांची निर्मिती हाच वातावरण बदलावरील उपाय
जंगलांची निर्मिती हाच वातावरण बदलावरील उपाय

जगभरामध्ये जंगलांच्या लागवडीची प्रक्रिया सुरू करणे, हीच वातावरण बदलाशी लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची उपाययोजना ठरणार असल्याचे मत संशोधनातून पुढे आले आहे. जंगलाची पुन्हा निर्मितीसाठी सुमारे ०.९ अब्ज हेक्टर क्षेत्र योग्य असून, याद्वारे मानवनिर्मित सुमारे दोन तृतीयांश कार्बन उत्सर्जन शोषले जाऊ शकते. हे संशोधन जर्नल सायन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. वातावरणातील बदलांच्या समस्या भविष्यामध्ये वाढत जाणार आहेत. त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना शोधल्या जात आहेत. त्यामध्ये जंगलांची पुनर्निर्मिती ही नैसर्गिक उपाययोजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. त्याविषयी माहिती देताना जीन फ्रान्सिस बॅस्टिन यांनी सांगितले, की सध्याची शहरे आणि शेतीखालील क्षेत्र वगळता अन्य क्षेत्र वनक्षेत्रामध्ये परावर्तित केले असता त्याचा फायदा वातावरण बदलांची तीव्रता रोखण्यासाठी होऊ शकतो. सध्याच्या वातावरणातील स्थितीबरोबरच पृथ्वीवरील जमिनीच्या वापराचेही मोजमाप करण्यात आले. पृथ्वीवरील जमिनीपैकी ४.४ अब्ज हेक्टर जमीन ही सलग झाडांखाली असली पाहिजे. सध्या हे प्रमाण केवळ २.८ अब्ज हेक्टर आहे. या अधिकच्या १.६ अब्ज हेक्टर क्षेत्रापैकी ०.९ अब्ज हेक्टर क्षेत्र हे मानवी वापराचे निकष पूर्ण करत नाहीत. याचाच अर्थ अमेरिकेच्या क्षेत्रफळाएवढा भाग आपल्याला झाडांच्या लागवडीसाठी उपलब्ध होऊ शकतो. या ठिकाणी लावलेली झाडे पक्व झाल्यानंतर तयार झालेली नवी जंगले २०५ अब्ज टन कार्बन साठवू शकतील. हे प्रमाण मानवाकडून औद्योगिक क्रांतीनंतर आतापर्यंत उत्सर्जित झालेल्या ३०० अब्ज टनाच्या सुमारे दोन तृतीयांश आहे. या संशोधनातील अन्य संशोधक प्रो. थॉमस क्रोवथर म्हणाले की, वातावरण बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी झाडे लावून जंगलांची निर्मिती केली पाहिजे, हे सर्वांना ज्ञातच आहे. मात्र, झाडे लावण्याच्या उपक्रमांचा नेमका परिणाम किती होईल, याची कोणतीही आकडेवाडी उपलब्ध नव्हती. आमच्या अभ्यासातून जंगलाची निर्मितीसाठी उपलब्ध जमिनीची नेमकी आकडेवाडी उपलब्ध झाली आहे. मात्र, जंगले तयार होण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता मानवाला त्वरा करावी लागणार आहे. कारण ही झाडे पक्व होऊन पूर्ण क्षमतेने कर्ब साठवणीसाठी कार्यान्वित होण्यासाठी वेळ लागणार आहे. या अभ्यासातून जागतिक पातळीवर किती क्षेत्र उपलब्ध होऊ शकेल, याचा आढावा (क्षेत्र- दशलक्ष हेक्टरमध्ये) रशिया १५१, अमेरिका १०३, कॅनडा ७८.४, ऑस्ट्रेलिया ५८, ब्राझील ४९.७, चीन ४०.२ सध्याची वातावरणाची अनेक प्रारुपे वेगळेच चित्र रंगवत आहेत. त्यांच्याकडून वातावरणातील बदलानुसार जागतिक वृक्ष आच्छादन वाढत जाण्याचा दावा केला जातो. मात्र, हे केवळ सायबेरियातील बोरीयल जंगलांसारख्या ठिकाणी शक्य आहे. तेथील वृक्ष आच्छादनाखालील क्षेत्र सरासरी केवळ ३० ते ४० टक्के इतकेच राहणार आहे. हा लाभ अन्य ठिकाणी घनदाट जंगलांच्या होणाऱ्या नुकसानीच्या तुलनेमध्ये अत्यल्प असणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com