agricultural stories in Marathi, Aanand shala | Agrowon

जीविधेची जाणीव करून देणारी आनंदशाळा

बसवंत विठाबाई बाबाराव
गुरुवार, 13 जून 2019

शिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये जैव-सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व स्वीकारणे गरजेचे आहे. शाळांमधील शिकण्या-शिकविण्याची प्रक्रिया समृद्ध करण्यात आनंदशाळांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

शिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये जैव-सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व स्वीकारणे गरजेचे आहे. शाळांमधील शिकण्या-शिकविण्याची प्रक्रिया समृद्ध करण्यात आनंदशाळांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १९९९ व २०१० च्या निर्देशांनुसार शिक्षणाच्या सर्व इयत्तांमध्ये पर्यावरण शिक्षणाचा अनिवार्य घटक म्हणून समावेश करण्यात आला. मात्र गुणवत्तापूर्ण शिक्षक प्रशिक्षणाच्या अभावामुळे पर्यावरण शिक्षण हे निव्वळ नावापुरतेच शाळेत पोचल्याचे जाणवते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जनुक कोष (मजको) प्रकल्पाशी जोडलेल्या स्थानिक समुदाय व संस्था त्यांच्या परिसरातल्या शाळांमध्ये जैवविविधता शिक्षणाचे प्रयोग करत आहेत. प्रत्येक संस्थेतील एका ‘पर्यावरण शिक्षण मित्र’ची क्षमता बांधणी व समन्वयाचे काम पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे यांच्यातर्फे केले जाते.

असा आहे प्रकल्प

 • प्रकल्पाच्या पहिल्या वर्षी संस्थांनी निवडलेल्या संवर्धन विषयाला (जसे- पीकविविधता, जंगल, तलाव, इ.) सुसंगत शैक्षणिक साहित्य विकसित करण्यात आले. त्यामध्ये शिक्षक-विद्यार्थ्यांसाठीचे ‘जैवविविधता संच’ हे महत्त्वपूर्ण साहित्य आहे.
 • दुसऱ्या वर्षीपासून संस्थांच्या परिसरातील शाळांच्या शिक्षक व विद्यार्थ्यांची आनंदशाळा शिबिरे घेण्यात आली. त्यात १७९ शाळांमधील शिक्षक, विद्यार्थी तसेच संस्था प्रतिनिधी मिळून एकूण ५६२ लोकांनी आनंदशाळा शिबिरात सहभाग घेतला. शिवारफेरीच्या माध्यमातून सुरू होणारी ही शिक्षणाची प्रक्रिया वर्गाच्या चार भिंतींतून बाहेर पडून गावाची सीमारेषा, गावातील टापू, गावाचा इतिहास ह्यांचा आढावा घेत आहे.
 • आनंदशाळांमध्ये मेंढा (लेखा)तील गोंडी बोलणाऱ्या चिमुकल्यांपासून, औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांपर्यंत, जव्हार भागातील कोकणा, वारली, मेळघाटातील कोरकू, गवळी अकोले, संगमनेर व धुळे भागातील ठाकर व महादेव कोळी, नंदुरबारच्या शहादा व धडगाव तालुक्यांतील पावरा, भिल्ल, भंडारा गोंदिया मधील धीवर, कातकरी आणि गोंड, हिंगोली भागातील आंध अशा वेगवेगळ्या समुदायातील मुले-मुली यांनी आनंदशाळा शिबिरात सहभाग घेतला.
 • आनंद शाळा शिबिरातील सत्रांची ओळख
 • परिचय : परिसर अभ्यासाच्या प्रश्नोत्तराच्या चिठ्यातून जोडीदार शोधणे, त्यांचा परिचय करून घेणे व सर्वांना त्याची ओळख करून देणे.
 • आपले नियम आपण बनविणे ः  सर्व शिबिरार्थी एकत्रित पूर्ण शिबिराचे नियम बनवून चार्टपेपरवर नोंदवतात. शिबिर अर्थपूर्ण होण्यासाठी प्रत्येकाने कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात, आवर्जून करायला हव्यात हे नोंदवले जाते.
 • पक्षी बनून गाव बघूया ः गुगल अर्थ वापरून आपल्या भागातील ठिकाणे, घरे, शाळा, जंगल पाहणे. त्यांचे एकमेकांपासूनचे अंतर मोजणे, जंगल किंवा तलाव असेल तर त्याचे क्षेत्रफळ काढणे याबद्दलची प्राथमिक माहिती या सत्रातून दिली जाते. दुसऱ्या दिवशी शिवारफेरीला जाण्यासाठीची जागा निश्चित केली असेल तर ती जागा गुगल अर्थच्या माध्यमातून दाखविली जाते. पॉइंट, लाईन, पॉलिगॉन या टूलचे प्राथमिक ओळख या सत्रातून होते.
 • माझ्या ताटात काय काय आहे? ः रोजच्या जेवणात व विशेष प्रसंगाच्या जेवणामध्ये आपण गेल्या वर्षभरात काय काय खाल्ले याची यादी कागदी पत्रावळीवर केली जाते. आहारातील विविध प्रकारच्या भाकरी, भाजी, लोणचे, चटणी, पेय, रानभाज्या इत्यादी घटकांची लेखी मांडणी करून त्यावर चर्चा केली जाते. चर्चेत आपल्या शिवारातील पिके आणि आपले जेवणातील घटक यांचे सहसंबंध तपासून पहिले जाते.
 • शिवारफेरी ः  शिबिरार्थींचे गट करून जैविविधतेचे निरीक्षण, किडी व पीक यांचे सहसंबंध, शिवारातील दगडमाती यांचा अभ्यास केला जातो. शिवारफेरीत बिंदू, रेषा, चौरसपद्धती यांची ओळख, निरीक्षण नोंदीबद्दल काही प्रचलित पद्धती यांची ओळख होते.
 • गाव-इतिहासाच्या गोष्टी ः या सत्रात सहभागी आपापल्या गावचा इतिहास लिहितात. आठवणीतील महत्त्वपूर्ण घटना, गोष्ट, एखादा प्रसंग यात लिहिले जातात. गावात पडलेला दुष्काळ व त्यावर लोकांनी काय उपाययोजना केली? गावाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवला? गावात एखादे जुने झाड असेल तर त्या संबंधीच्या आठवणी नोंदवून घेतात.  
 • शाळा जैवविविधता नोंदवही ः शिबिरात सहभागी शाळेला जैवविविधा नोंद वही दिली जाते. यामध्ये शाळा परिसर, गावशिवारात दिसलेल्या जैवविविधता घटक, त्याचे गुणविशेष, त्यामधील बदल, इतर घटकांशी असणारे सहसंबंध याच्या याद्या नोंदी जातात.
 • खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम ः गावपरिसरात प्रचलित असलेली शेती, तळे, जंगल इ. घटकांशी संबंधित गाणी, विशेष सण-उत्सव प्रसंगी म्हटली जाणारी गाणी सादर होतात. त्या-त्या भागातील विशेष सामूहिक नृत्यप्रकार केला जातो. म्हणी, भेंडी, कोडी यातून निसर्गनिरीक्षण मांडले जाते.
 • वार्षिक नियोजन ः पुढील वर्षभर शाळेत परत गेल्यानंतर शिक्षक व विद्यार्थी मिळून कोण-कोणते उपक्रम करणार, त्याचे सांगड पाठ्यपुस्तकासोबत कसे घालायचे याचे नियोजन या सत्रात करतात.
 • शाळा-पाठ्यपुस्तके आणि शिकणाऱ्याचे जीवन व परिसर यांच्यामधलं तुटलेपण हे गुणवत्तापूर्ण शिक्षणापुढचं मोठं आव्हान आहे. पाठ्यपुस्तक केंद्री शिक्षणामुळे स्थानिक परिसर, झाडं, वेली, प्राणी, पक्षी, किडे याबद्दलचं पारंपरिक आणि वर्तमानातलं अनुभवाधारित ज्ञान हळूहळू लोप पावत आहे. त्याचा जैवविविधतेच्या आणि उपजीविकांच्या होणाऱ्या ऱ्हासाशी संबंध आहे. ज्याचा दृश्य परिणाम बहुसंख्य मुलांच्या भाषा, गणित, विज्ञान अशा विषयांच्या क्षमता संपादनाचा स्तर खालावण्यात दिसून येतो. अनेक शासकीय आणि अशासकीय सर्वेक्षणांमध्ये हे वास्तव वारंवार दिसत आहे.

   शिक्षण गुणवत्तापूर्ण बनण्यासाठी शिक्षण प्रक्रियेमध्ये जैव-सांस्कृतिक विविधतेचे महत्त्व स्वीकारणे गरजेचे आहे. यासाठी शिक्षण व्यवस्थेतील प्रशासक, पाठ्यपुस्तक निर्माते आणि शिक्षक याबाबत संवेदनशील आणि सक्षम बनणे आणि शाळा पातळीवर जैवविविधता शिक्षणाचे अनुभवी आणि साधने निर्माण होणे गरजेचे आहे. सक्षम आणि संवेदनशील शिक्षक घडविण्यासाठी शिक्षकांची प्रशिक्षणे खूप मोलाची आहेत. ती निव्वळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी म्हणून नसावीत. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी शिक्षकांना सक्ती करावे लागणे ही प्रशिक्षणाच्या निकृष्ट गुणवत्तेचे द्योतक आहे. शिक्षक प्रशिक्षणाच्या बाबतीत अजून तरी महाराष्ट्रात मोठी पोकळी जाणवते. आनंदशाळा शिबिरे ही काही प्रमाणात ही पोकळी भरण्याचे काम करीत आहेत. शाळांमधील शिकण्या-शिकविण्याची प्रक्रिया समृद्ध करण्यात आनंदशाळांची भूमिका अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

काय असते ही आनंदशाळा?
आनंदशाळेत विद्यार्थी व शिक्षक एकत्र बसून एकमेकांकडून शिकतात. कार्यशाळेचं सर्वात महत्त्वाचं तत्त्व म्हणजे- प्रत्येक बाब ही आनंददायी व्हायला हवी! ‘शिबिर घेणारे कुणीतरी ज्ञानी आहेत व आपण फक्त ज्ञान ग्रहण करायला आलो आहोत’ असे त्यांना वाटू नये, याची काळजी घेऊन शिबिरातील प्रत्येक सत्राची आखणी करण्यात आली. याची सुरवात सर्वसहभागाच्या दृष्टीने योग्य बैठक व्यवस्था यापासून होते. आनंदशाळेत दुसरी, तिसरीच्या चिमुकल्यापासून बारावीपर्यंतचे विद्यार्थी व त्याचे शिक्षक सहभागी होतात. लोकांसोबत संवर्धन करणाऱ्या संस्थांना ज्या विषयक्षमतांची आवश्यकता असते- (जसे नोंदी घेणे, अंदाज बांधणे, नकाशा काढणे, बदल शोधणे, इ.) त्या क्षमतांचा विकासही या कार्यशाळेतून साधला जातो.

लेखमाला संपादन ः  ओजस सु. वि.   (लेखक पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे येथे कार्यरत आहेत)         : baswant.dhumane@ceeindia.org,     : ojas.sv@students.iiserpune.ac.in

 


इतर ग्रामविकास
सावित्रीच्या लेकींचा जागर करीत घराच्या...नाशिक : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
महिला बचत गटातून पूरक उद्योगांना गतीगेल्या वर्षी मी लोकनियुक्त सरपंच झाले....
‘सोशल नेटवर्किंग' मधून ग्राम,आरोग्य अन्...नाशिक शहरातील प्रमोद गायकवाड यांनी विविध...
लोकसहभागातून ग्रामविकासाला दिशासप्टेंबर २०१५ मध्ये मी गावाच्या सरपंचपदाचा...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
रेशीम शेतीतून देवठाणाच्या अर्थकारणास गतीपरभणी जिल्ह्यातील देवठाणा (ता. पूर्णा) येथील...
शेततळ्यांतील मत्स्यशेतीचे ‘बेडग मॉडेल’जिथं एका एका पाण्याच्या थेंबासाठी वणवण हिंडावे...
वडनेरभैरव ग्रामपालिका उचलणार मुलींच्या...नाशिक : सुरक्षेचा प्रश्न किंवा आर्थिक परिस्थिती...
लोकसहभागातून पुणतांब्याची  विकासाकडे...नगर जिल्ह्यामधील पुणतांबा (ता. राहाता) हे पौराणिक...
ग्रामपंचायत कायद्यात ‘दुरुस्ती’ करतानाच...पुणे : पंचायतराज सक्षमीकरणासाठी राज्यघटनेत ७३ वी...
‘अफार्म’ची जलनियोजनातून कृषिविकासाची...महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांची मध्यवर्ती शिखर...
शेती, ग्रामविकास अन् स्वच्छतेचा जागरअकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जागर फाउंडेशनच्या...
शेती, ग्रामविकासात नांगनूर अग्रेसरमहाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील नांगनूर (ता....
फळबागांच्या माध्यमातून प्रगतिपथावर वडकी पुणे शहरापासून जवळ असलेले वडकी हे दुष्काळी गाव...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
पर्यावरण, जलसंवर्धन, व्यावसायिक शेतीचा...वऱ्हा (ता. तिवसा, जि. नागपूर) येथील गावकऱ्यांनी...
लोकसहभागातून शेती, शिक्षणाला दिशा...निरंतर लोकसंवाद, महिला ग्रामसभा, प्रभावी कष्टकरी...
भरताच्या वांग्यासह दादर ज्वारीसाठी...खानदेशकन्या तथा आपल्या कवितेतून शेतीचे...