शेडनेट, पॉलिहाउसने घडविला नवा अध्याय

चिंचणी (जि. पालघर) ः येथील रामचंद्र सावे यांनी कोकणासारख्या भागात विस्तीर्ण क्षेत्रात संरक्षित शेती तंत्रज्ञान यशस्वी केले आहे.
चिंचणी (जि. पालघर) ः येथील रामचंद्र सावे यांनी कोकणासारख्या भागात विस्तीर्ण क्षेत्रात संरक्षित शेती तंत्रज्ञान यशस्वी केले आहे.

अॅग्रोवन कोकणचा स्मार्ट शेतकरी अॅवॉर्ड    रामचंद्र रघुनाथ सावे, चिंचणी, ता. डहाणू, जि. पालघर ----------------------------------------------------------- पालघर जिल्ह्यातील चिंचणी (ता. डहाणू) येथील रामचंद्र रघुनाथ सावे यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून राज्यात आपली अोळख तयार केली आहे. कोकणासारख्या अति पावसाच्या प्रदेशात स्वतःच्या सुमारे १५ एकरांत तर उर्वरित भाडेतत्त्वावरील शेतात असे एकूण ७९ क्षेत्रावर बांबूचे शेडनेट तर एक एकरांत पॉलिहाउसमधील मिरचीचे प्रयोग त्यांनी केले आहेत. त्यांच्या अन्य विविध प्रयोगांसाठी पंचक्रोशीबरोबरच राज्यातील शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे.

पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील रामचंद्र सावे यांनी प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी म्हणून अोळख तयार केली आहे. त्यांचे वडील रघुनाथ व आई रुक्मिणी शेतीच करायचे. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रामचंद्र यांना उच्च शिक्षणापासून वंचित राहावे लागले व शेतीकडेच लक्ष द्यावे लागले. कुटुंबाच्या वाट्याला एक एकर शेतीच आली होती. आई-वडील पावसाळ्यात भातशेती व रब्बी हंगामात भाजीपाला पिके घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत.

संघर्षमय खडतर वाटचाल रामचंद्र यांना पाच भाऊ आणि चार बहिणी. पैकी थोरली बहीण शाळेत शिक्षिका म्हणून काम करून वडिलांना आर्थिक मदत करीत होती. थोरले बंधू भानुदासदेखील रामचंद्र यांच्यासोबत शेतीच करीत होते. प्रवास खडतर होता. बँकांकडून कर्ज मिळणे कठीण होते. परंतु सन १९८२ च्या दरम्यान हितचिंतक व नातेवाइकांच्या मदतीने चिंचणी (केतखाडी) येथे थोडी जमीन खरेदी करणे शक्य झाले. त्यातून कारले पिकाची लागवड केली. हळूहळू सावे कुटुंबाने शेतीत सुधारणा करीत प्रगती करण्यास सुरवात केली. बाजारपेठेत आपल्या मालाचा ठसा उमटवला.

ढोबळी मिरचीचा भागात पहिला प्रयोग पाण्याची टंचाई असल्याने मोठ्या प्रमाणात जमीन लागवडीखाली आणणे अशक्य होते. दरम्यान १९८५ च्या सुमारास पाच एकर जमिनीवर ठिबक सिंचनाचा वापर केला. ठाणे जिल्ह्यात सर्वांत प्रथम ढोबळी मिरचीची लागवड त्यांनीच केली असावी. उत्तम प्रतीचा माल बाजारात पाठवल्याने दरही चांगले मिळवले. उत्साह वाढला तरी जमीन खरेदी करून व्यवसाय वाढविण्याइतकी ऐपत नव्हती.

करार पद्धतीने शेती या भागात भात हे पारंपरिक पीक होते. मात्र आपल्या भागासाठी व्यावसायिक पिके आणण्याचा प्रयत्न सावे यांनी केला. परिसरात करार शेती करण्याची कल्पना थोरले बंधू भानुदास यांच्या डोक्यात आली. रामचंद्र यांनी त्याअंतर्गत वाणगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील सुमारे दहा एकर जमीन ठिबक सिंचनाखाली आणून ढोबळी मिरची व टोमेटो यांची लागवड केली. यासाठी तारापूर येथील शेतकरी विष्णू सावे यांची मोलाची मदत झाली.

इतरांनी केले अनुकरण सावे यांनी ठिबक, ढोबळी मिरची आदींचे केलेले प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या रांगा लागू लागल्या. वाणगाव येथील गवत व्यापारी दिनेश रामचंद्र कोरे, दिगंबर भट, विकास पाटील, राजेंद्र चुरी, प्रकाश राऊत आदी तरुण शेतकऱ्यांसाठी ही शेती अनुकरणीय झाली. प्रयोगशीलता अंगात ठासून भरली असल्याने विविध प्रयोगांना वाव मिळाला. शेती व मार्केटिंग अशा जबाबदाऱ्या सावे बंधूंनी वाटून घेतल्या. शेतीचा विकास करताना कुटुंबातील सर्वच सदस्य शेतीत हिरिरीने सहभागी झाले.

रामचंद्र यांची प्रयोगशीलता

  • उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने पाण्याची बचत करून अधिक क्षेत्र लागवडीखाली कसे आणता येईल याचा ध्यास रामचंंद्र यांनी घेतला.
  • शेतीविषयक विविध प्रदर्शनांना भेटी देण्यासह राज्यात तसेच इस्राईलसारख्या देशात दौरे केले.
  • एकाच पिकावर अवलंबून चालणार नाही हे अोळखून बाजारपेठेतील मागणीप्रमाणे पीक घेण्यास सुरवात केली. त्यादृष्टीने वेलवर्गीय भाज्यांची पिके घेतली.
  • संकरित बियाणे वापरल्यास अनेक बाबी शक्य होतील हे अोळखून बियाणे क्षेत्रातील कंपन्यांशी थेट करार करून बीजोत्पादनाचा यशस्वी प्रयोग केला. त्यादृष्टीने एका बहुराष्ट्रीय कंपनीने त्यासंबंधीच्या प्रशिक्षणासाठी त्यांना परदेशीही पाठवले.
  • सावे यांच्यापासून प्रेरणा घेत वाणगाव परिसरातील तरुण शेतकऱ्यांचा गटही सुधारित तंत्राने शेती करू लागला.
  • लिली, झेंडू, गुलाब, अॅस्टर आदींचीही यशस्वी फुलशेती सावे यांनी केली. पंधरा एकरांवर केळीची प्रयोग केला.
  •  शेडनेट, पाॅलिहाउस तंत्राचा वापर

  • आपल्या भागातील पर्जन्यमान, हवामान, किडी-रोग या बाबी अोळखून संरक्षित शेती म्हणजेच पाॅलिहाउस, शेडनेटमधील शेती सुरू केली. सुरवातीला दोन एकरांत प्रयोग यशस्वी झाल्यावर हळूहळू क्षेत्र वाढवले.
  • आजचे क्षेत्र- सुमारे ७९ एकरांवर बांबूचे शेडनेट. एकेठिकाणी ३० एकर. दुसऱ्या ठिकाणी ५० एकर. पैकी त्यातील १४ एकर स्वतःचे. उर्वरित भाडेतत्त्वावर. एक एकर पॉलिहाउस.
  • मिरचीचे घेत असलेले प्रकार- ढोबळी, साधी मिरची व गुजरात भागात मागणी असलेली आचारी नावाने अोळखली जाणारी मिरची  
  • मिरची उत्पादकता- एकरी ४० टनांपर्यंत
  • बांबू शेडनेटमधील प्रयोगाची यशकथा काही वर्षांपूर्वी ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांना सावे यांनी या प्रयोगाविषयी मार्गदर्शन केले. पंचक्रोशीतील अनेक तरुण शेतकरीही सावे यांच्या शेतीचे अनुकरण करू लागले. उदरनिर्वाहासाठी कंपन्यांमधून मर्यादीत उत्पन्नावर नोकरी करणारी ही मुले आज संरक्षित शेतीतून चांगले उत्पन्न मिळवू लागली आहेत.
  • स्वयंचलित व संगणकीय ठिबक सिंचन यंत्रणा बसविणारे सावे पालघर जिल्ह्यातील पहिलेच शेतकरी असावेत. ही यंत्रणा थोडी महाग असल्याने त्यात काही बदल करून सावे यांनी कमी किमतीचे सुमारे वीस तत्सम संच शेतकऱ्यांकडे बसवून देण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
  • ग्राफ्टिंगचा नवा प्रयोग

    मिरचीची रोपे मर रोगाला बळी पडतात. यावर उपाय म्हणून ग्राफ्टिंगचे तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी सावे यांनी रायपूर भागात जाऊन अभ्यास केला. तेथील ज्ञानाचा आधार घेत पाच गुंठ्यांवर नियंत्रित तापमानाचे हरितगृह उभारले आहे. सुमारे चार लाख रोपांचे ग्राफ्टिंग करून त्यांची लागवड केली आहे. मिरचीसह टोमॅटो, कलिंगड, दुधी, कारली आदी पिकांमध्येही असे ग्राफ्टिंग करता येते. आज सावे यांची शेती अनेक शेतकऱ्यांसाठी प्रयोगशाळाच झाली आहे. सावे यांना पत्नी सौ. उल्का यांचे मोलाचे सहकार्य मिळते. त्यांची मुलगी श्रुती एमडी (गायनॅक) आहे. याचा सावे दांपत्यास मोठा अभिमान आहे.

    (शब्दांकन ः अच्युत पाटील)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com