पखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’

पखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’
पखाले बंधूंनी केले पोल्ट्रीचे ‘अाॅटोमायझेशन’

मालेगाव (ता. जि. वाशीम) येथील विनोद पखाले व बंधूंनी काळानुरूप पारंपरिक पोल्ट्री व्यवसायाला अाधुनिक रूप दिले आहे. वातानुकूलनासह स्वयंचलित असलेल्या पोल्ट्री फार्ममधून अनेक फायदे होत आहेत. कोणत्याही कर्जाविना उभारलेल्या कृषिपूरक उद्योगाचे उदाहरण निर्माण झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील विनोद दिनकर पखाले यांच्याकडे आपल्या दोन बंधूंसह एकत्रित अडीच एकर वडिलोपार्जित शेती आहे. केवळ शेतीवर तीन कुटुंबांची उपजीविका शक्य नसल्याने विनोद यांनी २००८ मध्ये पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. मालेगाव हे महामार्गावरील एक उभरती बाजारपेठ असल्याने साहजिकच हॉटेल्स, धाबे यांचे प्रमाण अधिक आहे. परिणामी पोल्ट्री उद्योगाला चांगला वाव आहे. अवघ्या पाचशे मांसल (ब्रॉयलर) कोंबड्यांपासून सुरू झालेल्या पोल्ट्रीमध्ये आता १५ हजार पक्ष्यांचे संगोपन केले जाते. गेली अाठ नऊ वर्षे पारंपरिक पद्धतीने पोल्ट्री सांभाळत असलेल्या पखाले बंधूंना त्यातील सर्व समस्या ज्ञात झाल्या. त्यावर मात करण्यासाठी त्यांनी हळूहळू पावले उचलली आहेत. उभा केला वातानुकूलित फार्म

  • पोल्ट्री वाढवत असताना त्यातील विदर्भातील उष्ण हवामानात पक्षी जपणे अवघड होते. त्यावर मार्ग काढण्यासाठी विनोद यांनी खासगी कंपनीसोबत करार करीत वऱ्हाडातील पहिला वातानुकूलित पोल्ट्री फार्म सुरू केला. यामधून पहिली बॅच निघाली असून, दुसरी बॅच तयार होत अाहे.
  • ७५०० वर्ग फूट आकाराच्या सलग हॉलमध्ये वातानुकूलनासह पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी निप्पल ड्रिंकर सिस्टिम, खाद्याचा स्वयंचलित पद्धतीने पुरवठा, हॉलमधील तापमानाचे स्वयंचलित नियंत्रण प्रणाली बसवली आहे. त्यात एक्झॉस्ट फॅन, कुलिंग पॅडचा समावेश आहे.
  • विजेच्या सातत्याने होत असलेल्या भारनियमनावर मात करण्यासाठी दोन जनरेटर सेटही घेतले आहेत.
  • वातानुकूलनासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यासाठी पखाले यांनी तीन बोअर खोदले असून, एक विहीर केली अाहे. यातून वर्षभर उद्योगाला लागणारे पाणी मिळेल, अशी व्यवस्था केली अाहे.
  • असे होतात फायदे

  • कालावधी कमी झाला ः पारंपरिक पद्धतीने कोंबड्यांचे पालन करताना बॅच निघण्यासाठी सरासरी ४० दिवसांपेक्षा अधिक काळ लागतो. या वातानुकूलनामुळे बॅच सरासरी ३३ दिवसांत निघते. पक्ष्यांच्या संगोपनाचा कालावधी एक आठवड्याने कमी झाल्याने वर्षातील बॅचची संख्या वाढणार आहे. तसेच खाद्यासह अन्य उत्पादन खर्चात बचत होते.
  • पक्ष्यांची संख्या वाढली ः पारंपरिक संगोपनात १०० पक्ष्यांच्या जागेमध्ये आता वातानुकूलनामुळे १५० पक्षी ठेवता येत असल्याचे विनोद पखाले यांनी सांगितले. शिवाय विषाणूजन्य अाजारांचे प्रमाण कमी करण्यात यश आले.
  • पक्ष्यांची एकसमान वाढ ः स्वयंचलित पद्धतीने एका जागेवरील ड्रममधील खाद्य शेवटपर्यंत समसमान जाते. आवश्यकतेनुसार पाणी मिळते. त्यामुळे पक्ष्यांची वाढ एकसमान होते.
  • मजुरी खर्चात बचत ः या सर्व प्रक्रियेसाठी आवश्यक मजुरांच्या संख्येत घट झाली आहे.
  • काहीही अडचण अाल्यास मिळतो मेसेज ः

  • पक्ष्यांच्या आवश्यकतेनुसार हॉलमधील वातानुकूलन आपोआप नियंत्रण होते. कुठे यंत्रणा बंद पडली, खाद्य संपले, पाणी संपले, कुठले यंत्र बंद झाले किंवा कुठलाही तांत्रिक पेच तयार झाला की सेंकदात त्याचा मेसेज विनोद यांच्या मोबाईल स्क्रीनवर येऊन झळकतो. त्यानुसार तातडीने व्यवस्थापन, फेरबदल करता येतो.
  • सर्व प्रक्रिया स्वयंचलितपणे होत असल्या तरी दिवसातून दोन वेळा तरी संपूर्ण पोल्ट्रीमध्ये विनोद स्वतः फिरतात. पण एकूणच श्रम कमी झाल्याचे विनोद सांगतात.
  • कंपनीसोबत करार पद्धतीने मांसल कोंबडीपालन केले जात असल्याने मार्केटिंगची फारशी चिंता नाही.
  • आम्ही बंधू शेती कमी असल्याने पोल्ट्रीकडे वळलो. गेल्या सात-अाठ वर्षांत अनेक अडीअडचणी आल्या, तरी संपूर्ण कुटुंबीयांच्या श्रमातून व व्यवसायातून जमवलेल्या रकमेतून इथपर्यंत पोचलो. कुठलेही कर्ज काढले नाही. -विनोद पखाले, ९९२२६९२६८७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com