तीन एकर भाजीपाला शेतीने उजळले आयुष्य

तीन एकर भाजीपाला शेतीने उजळले आयुष्य
तीन एकर भाजीपाला शेतीने उजळले आयुष्य

 पारंपरिक शेतीच्या चक्रात गुरफटून बसण्यापेक्षा आपल्या सिंचनाच्या मर्यादेतही भाजीपाल्याची उत्तम शेती करत विवरा (जि. अकोला) येथील किरण रमेश धोत्रे या तरुणाने दाखवून दिले आहे. हट्टाने एक एकर शेती कुटुंबीयाकडून मागून घेतलेला हा तरुण केवळ पाच वर्षांतच संपूर्ण १५ एकर शेतीचेही नियोजन उत्तमपणे करू लागला आहे. त्याने  प्लॅस्टिक मल्चिंग, भाजीपाला पिकांचे योग्य रोटेशन यातून संपूर्ण शेती फायदेशीर केली आहे. अकोला जिल्ह्यातील विवरा (ता. पातूर) येथील रमेश धोत्रे यांच्या एकत्रित कुटुंबाकडे १५ एकर शेती अाहे. पावसाचे प्रमाण व तसेच जमिनीतील पाणी कमी होत चालले अाहे. यामुळे सिंचनासाठी मर्यादा अाल्या. त्यातच आईच्या आजारपणामध्ये मोठा खर्च झाल्याने कुटुंबाची अार्थिक परिस्थिती दोलायमान झाली. या काळातच १२ वीला असणाऱ्या किरणचेही शिक्षणातून लक्ष उडाले. परिस्थितीवर मात करण्यासाठी आपणही शेतीमध्ये नवे काहीतरी करावे, असे तारुण्यसुलभ विचार त्याच्या मनात घोळू लागले. मात्र, एकत्र कुटुंबाची शेती वडील आणि चुलते मिळून पारंपरिक पद्धतीने पाहत. त्यांनाही किरणची लुडबूड फारशी आवडेना. अशा वेळी आपल्या मनाप्रमाणे शेती करण्यासाठी एक एकर वेगळी मिळावी, असा प्रस्ताव घरात ठेवल्यावर भूकंपच झाला. हे वर्ष होते २०१२. मात्र, शेती हातात आल्यानंतर उत्तम नियोजन आणि विक्रीमध्ये चांगला फायदा मिळाला. त्यामुळे उत्साह वाढलेल्या किरणला आणखी दोन एकर शेती भाजीपाला लागवडीसाठी मिळाली. या तीन एकरमधील यशामुळे २०१५ मध्ये एकत्रित कुटुंबाची संपूर्ण १५ एकर शेती किरणच्या ताब्यात दिली. आता तो आणि त्याचा चुलतभाऊ किशोर मिळून वडील आणि चुलत्यांच्या सल्लामसलतीने ही शेती पाहतात. वर्षनिहाय तपशील

  • २०१२ : एक एकर - भाजीपाला लागवड - उत्तम उत्पादन व स्वतः विक्री केल्यामुळे चांगला फायदा.
  • २०१३ ः आणखी दोन एकर शेती घेत एकूण तीन एकरचे नियोजन.
  • २०१४ ः भाजीपाला शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर करत होते.
  • २०१५ ः भाजीपाल्यामध्ये सेंद्रिय शेतीला सुरवात केली. घरातल्यांनी संपूर्ण शेती किरण यांच्या ताब्यात दिली.
  • असे असते १५ एकरचे नियोजन

  • भाजीपाला तीन एकर. वर्षभर.
  • कपाशी चार एकर. पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीला विश्रांती दिली जाते.
  • सोयाबीन अधिक तूर आठ एकर. सोयाबीन काढणीनंतर रब्बीमध्ये हरभरा दोन एकर.
  • तीन एकर भाजीपाल्याचे नियोजन ः

  • दीड एकर ः वेलवर्गीय भाज्या. यात बांबूच्या साह्याने मंडप केला असून, दोडका, कारले आणि काकडी ही पिके घेतली जातात. कालावधीनुसार दोन ते तीन वेळा रोटेशनने पिके घेतात.
  • एक एकर ः टोमॅटो आणि वांगे (यात भरीताचे आणि भाजीचे दोन्ही.) - वर्षभर.
  • अर्धा एकर ः कोबी आणि त्यात आंतरपीक म्हणून मेथी, कोथिंबीर, पालक, शेपू अशा पालेभाज्या घेतात.
  • वर्षभराचे हे चक्र फिरत राहते. काही पिकांची वर्षात तीनदा तर काही पिके दोन वेळा पेरली जातात.
  • ही तीन एकराची शेती आता मुख्य झाली असून, अन्य क्षेत्राइतकेच किंबहुना अधिक उत्पन्न यातून मिळवतात.
  • सिंचनाची स्थिती :

  • परिसरातील निर्गुणा नदीवरून उपसा सिंचन केले आहे. त्याचे पाणी जानेवारीपर्यंत मिळू शकते.
  • त्यानंतर एका विहिरीवर शेती अवलंबून असते. परिणामी केवळ तीन एकर भाजीपाला आणि दोन एकर हरभरा यावर लक्ष केंद्रित केले जाते.
  • पाणी बचतीसाठी संपूर्ण तीन एकर क्षेत्राला ठिबक सिंचन केले असून, प्लॅस्टिक मल्चिंगचा अवलंब करतात. मल्चिंगसाठी सुमारे ६० हजार रुपयांचा खर्च येतो.
  • भाजीपाला पिकांच्या उत्पन्नाचा गत वर्षीचा ताळेबंद

  • मशागत, शेणखत, मल्चिंग व अन्य किरकोळ खर्च (तीन एकर क्षेत्र) : सुमारे २ लाख रुपये. (बाहेरचे मजूर फारसे घेत नाहीत. त्यामुळे तो खर्च यात धरलेला नाही.)
  • दोडका ( वर्षात तीन पिके) - उत्पन्न १.५ लाख रुपये.
  • - कारले ( वर्षात तीन पिके) - उत्पन्न २.५ लाख रुपये.
  • काकडी ( दोन वेळा) पावसाळी - उत्पन्न १.५ लाख रुपये रब्बी - उत्पन्न ५० हजार रुपये.
  • टोमॅटो - ७० हजार रुपये.
  • वांगे - १.५ लाख रुपये.
  • कोबी अधिक आंतरपीक - एक लाख रुपये.
  • भाजीपाला शेतीला सुरवात : किरणने बारावी झाल्यानंतर शेतीमध्ये लक्ष घातले. एक एकर शेती घरातून मागून घेतली. याच वेळी दोन वर्षाच्या माळी ट्रेनिंग कोर्सला प्रवेश घेतला. पारंपरिक पिकाऐवजी वेलवर्गीय भाजीपाल्याचे प्रयोग चालू केले. प्रथम एकर क्षेत्रामध्ये कारली, दोडका अशी पिके होती. सोबतीला अांतरपीक म्हणून पालक, फूल-पत्ता कोबी घ्यायचा. काही क्षेत्रावर टोमॅटो, वांगी घेत होता. यातून नियमित आवक सुरू झाली. यातील यशामुळे धोत्रे कुटुंबाने गावाशेजारचे तीन एकर शेतही त्याच्या ताब्यात दिले. किरणच्या सोबतीला चुलतभाऊ किशोरसुद्धा अाला. पुढे संपूर्ण शेतीही या दोघांच्या ताब्यात दिली आहे. अाधुनिक तंत्राचा वापर :

  • केवळ एकाच पिकावर भर देण्याऐवजी अनेक पिकांचा शेतीमध्ये समावेश.
  • कारले, दोडके, काकडीसाठी प्लॅस्टिक मल्चिंग केले आहे. आंतरपीक म्हणून पालेभाज्यांचा समावेश करतात. परिणामी बाजारातील दराच्या चढउताराची झळ कमी बसते.
  • वर्षभर शेती करताना जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेणखताचा भरपूर वापर करतात. तसेच तीन वर्षांपासून रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर थांबवला आहे.
  • आवश्यकता भासल्यास जैविक घटकांचा वापर करतात. परिणामी उत्पादन खर्चात बचतीसोबतच विषमुक्त भाज्यांचे उत्पादन शक्य होत असल्याचे किरण सांगतात.
  • या शेतीत बहुतांश कामे कुटुंबातील सर्वजण करतात. शक्यतो मजूर सांगितले जात नाही. यामुळे मजुरीचा खर्च कमी होतो.
  • स्वतःच करतात विक्री :

  • शक्यतो धोत्रे कुटुंबीय गावातील बाजारासह पातूर, बाळापूर, अकोला या बाजारात बसून भाजीपाल्याची विक्री करतात. दर उत्तम मिळण्यासोबत मध्यस्थाचा वाटाही वाचतो.
  • भाजीपाला एकाच वेळी जास्त प्रमाणात भाजीपाला निघाला तरच अकोला, पातूर येथील व्यापाऱ्यांना देतात.
  • भाजीपाल्याची काढणी दुपारी चार वाजल्यानंतर केली जाते. काढणीनंतर भाज्या स्वच्छ करून प्रतवारी करतात. परिणामी इतरांपेक्षा अधिक दर मिळतो.
  • विवरा गावापासून बाजारांचे अंतर विवरा ते अकोला - ४२ किलोमीटर विवरा ते बाळापूर - ३० किलोमीटर विवरा ते पातूर - १५ किलोमीटर किरण धोत्रे, ९७६७१९२१९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com