परदेशी मधमाश्यांमुळे बसेल स्थानिक मधमाश्या, वनस्पती प्रजातींना फटका

परदेशी मधमाश्यांमुळे बसेल स्थानिक मधमाश्या, वनस्पती प्रजातींना फटका

मधमाशीपालनासाठी अन्य देशांतून आयात केलेल्या मधमाश्या या स्थानिक मधमाश्या आणि परागवाहकांशी स्पर्धा करत असल्याने त्याचा विपरीत परिणाम काही स्थानिक प्रजातींच्या वनस्पतींवर होऊ शकतो. विशेषतः ज्या वनस्पती प्रजाती या परागीकरणासाठी स्थानिक परागवाहकांवर अवलंबून आहेत, त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न यातून निर्माण होऊ शकत असल्याचा इशारा अॅजेलिया रस्किन विद्यापीठातील संशोधकांनी दिला आहे. हे संशोधन ‘जर्नल डायव्हर्सिटी अॅण्ड डिस्ट्रिब्युशन्स’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. इंग्लंड येथील अँजेलिया रस्किन विद्यापीठातील संशोधिका डॉ. ऑलिव्हिया नोरफोल्क यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांच्या साह्याने पर्वतीय प्रदेशातील वनस्पती आणि त्यांच्या परागवाहकांतील संबंधाचा अभ्यास केला आहे. इजिप्त येथील दक्षिण सिनाई या पर्वतीय प्रदेशामध्ये विशिष्ट सिमेमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि त्यांचे परागवाहक यावर भर देण्यात आला. या दोन्ही घटकांवर मधमाशीपालनासाठी अन्य देशांतून आयात केलेल्या मधमाश्यांचा होणारा परिणाम तपासण्यात आला. या विभागातील पर्वत जंगली वनस्पती, परागवाहक, स्थलांतरीत पक्षा यांच्या जैवविविधतेने परिपूर्ण आहेत. येथील बेडोवन या स्थानिक रहिवाश्यांनी पारंपरिक शेतीसोबतच अतिरीक्त उत्पादनासाठी म्हणून मधमाशीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. या मधमाश्या मध मिळवण्यासाठी विविध फुलांना भेटी देत असल्या तरी त्यांच्या खाद्यसवयी वेगळ्या आहेत. त्या केवल उपलब्ध वनस्पती फुलोऱ्यातील केवळ ५५ टक्के प्रजातींना भेट देत असल्याचे अभ्यासात आढळले. त्यातील काही भेटी या विशिष्ट सिमेमध्ये वाढणाऱ्या वनस्पतींनाही देतात. त्यातून या सिमेमध्ये कार्यरत असलेल्या स्थानिक मधमाश्या व अन्य परागवाहक किटकांना स्पर्धा निर्माण होत आहे. येथील कोरड्या आणि मर्यादीत पर्यावरणामध्ये केवळ काही वनस्पती प्रजातींवर अवलंबून असलेले परागवाहक व स्थानिक मधमाश्या आहेत. त्यांच्यावर विशेषतः दुष्काळाच्या स्थितीमध्ये विपरीत परिणाम होतो. या पूर्वी कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या अभ्यासामध्ये अधिक प्रमाणात असलेल्या परकीय मधमाश्यांमुळे स्थानिक बंबल बी माश्यांचे संख्या घटल्याचे निदर्शनास आले होते. सर्व प्रकारच्या पर्यावरणामध्ये वाढणाऱ्या झाडांच्या तुलनेमध्ये स्थाननिहाय वनस्पती प्रजातींसाठी धोका वाढत असल्याचीच ही चिन्हे आहेत.

धोक्याची घंटा ः या परिसरामध्ये विविध धर्मदाय आणि स्वयंसेवी संस्थांनी स्थानिक रहिवाश्यांमध्ये मधमाशी पालनाचा प्रसार केला आहे. त्यातून काही वनस्पती प्रजातींना नक्की फायदा होणार असला तरी काही वनस्पती प्रजातींना नक्कीच फटका बसणार आहे. परदेशी मधमाशी पालनातून होणारा फायदा हा स्थानिक प्रजातींसाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.  

परदेशी मधमाश्यांशी परागांसाठी होणाऱ्या स्पर्धेमुळे स्थानिक मधमाश्यांचे विशिष्ट सिमेमध्ये वाढणाऱ्या वनस्पती प्रजातींना दिल्या जाणाऱ्या भेटींचे प्रमाण कमी होते. परिणामी वनस्पतींच्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत आहे. त्याचा फटका वनस्पती प्रजातींना बसणार आहे. - डॉ. ऑलिव्हिया नोरफोल्क, संशोधिका, प्राणी आणि पर्यावरण जीवशास्त्र, अँजेलिया रस्किन विद्यापीठ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com