कॅलिफोर्नियातील नत्रप्रदूषण रोखण्यासाठी काटेकोर शेतीची गरज

कॅलिफोर्नियातील नत्रप्रदूषण रोखण्यासाठी काटेकोर शेतीची गरज
कॅलिफोर्नियातील नत्रप्रदूषण रोखण्यासाठी काटेकोर शेतीची गरज

कॅलिफोर्नियामधील एकूण नत्र ऑक्साईडच्या उत्सर्जनापैकी सुमारे ४० टक्के नत्रउत्सर्जनाचा नेमका स्रोत माहित नव्हता. मात्र, कॅलिफोर्निया - डेव्हिस विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासामध्ये मध्य खोऱ्यातील शेतीतील खतयुक्त माती हा स्रोत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अधिक काटेकोर शेती व्यवस्थापनाची गरज त्यातून पुढे आली आहे. हे संशोधन ‘जर्नल सायन्स अॅडव्हान्सेस’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. आजवर वाहनातून खनिज तेलाच्या ज्वलनातून होणाऱ्या उत्सर्जनाला नत्रप्रदूषणाचे मुख्य कारण मानले जात होते. मात्र, अलीकडे आलेल्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनातून होणारे उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यामध्ये यश येत आहे. कॅलिफोर्नियातील मध्य खोरे हे उच्च कृषी उत्पादनाचा परिसर म्हणून ओळखला जाते. येथील अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्रामध्ये फळबागा आहेत. त्यातही बदाम, वॉलनट, बेदाणे, अॅव्हाकॅडो आणि टोमॅटो उत्पादनाचे प्रमाण मोठे आहे. उत्पादकता वाढीसाठी सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांमध्ये शाश्वततेला महत्त्व देण्याची आवश्यकता निर्माण होत असल्याचे संशोधिका माया अल्मॅरेझ यांनी सांगितले. त्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्रो. बेन होल्टन यांच्या प्रयोगशाळेमध्ये संशोधन करतात. कॅलिफोर्निया येथील सॅन जोअक्विन व्हॅलीमधील माहितीचे संगणकीय प्रारुपाच्या साह्याने तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले. प्रत्यक्ष नमुन्यातून आणि प्रारूपाद्वारे मिळवलेल्या नत्र ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण २५ ते ४१ टक्क्यांच्या दरम्यान होते. हा भाग बागायती आणि नत्रयुक्त खतांच्या अधिक वापर करणारा मानला जातो. येथील ग्रामीण भागामध्येही धुरक्यांचा (स्मॉग) प्रसार वेगाने वाढत आहे. त्यामध्येही प्रामुख्याने नायट्रोजन ऑक्साईडचा समावेश असतो. ते जमिनीलगत पसरणाऱ्या ओझोनच्या थरामध्ये मिसळून आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. प्रामुख्याने हृदयरोग, अस्थमा आणि अन्य श्वासाशी संबंधित आजारांमध्ये वाढ होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार नायट्रोजन ऑक्साईड हा हवेतील प्रदूषणाचा प्राथमिक घटक असून, जागतिक पातळीवर होणाऱ्या ८ पैकी एक मृत्यूसाठी कारणीभूत ठरतो. संभाव्य उपाययोजना ः या अभ्यासामध्ये मातीतून होणाऱ्या नत्रउत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या आहेत. त्यामध्ये मुख्यतः खतांचे योग्य व्यवस्थापनाचा समावेश आहे. कारण पिकांच्या वाढीसाठी वापरल्या जाणाऱ्या नत्रापैकी अर्ध्यापेक्षा अधिक नत्र हे हवेमध्ये उडून जाते. त्यासाठी सावकाश मिळू शकणारी नत्र खते वापरण्याची आवश्यकता आहे.

  • मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी विशेषतः मातीमध्ये कार्बन साठवला जाण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
  • कृषी क्षेत्रामध्ये पाणी आणि खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी काटेकोर शेतीतंत्रांचा वापर वाढवण्याची गरज आहे.
  • नत्र वायूंचे माती आणि अन्य स्वरूपामध्ये स्थिरीकरण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी संशोधनात्मक पातळीवर योग्य ते ‘कॅटॅलिटिक कन्व्हर्टर’ तयार करणे आवश्यक असल्याचे प्रो. होल्टन यांनी सांगितले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com