फुलशेतीला फुलवणारा ‘क्रॉप डॉक्टर’!
फुलशेतीला फुलवणारा ‘क्रॉप डॉक्टर’!

फुलशेतीला फुलवणारा ‘क्रॉप डॉक्टर’ !

कोणत्याही अडचणीमध्ये माणूस सामान्यतः एकटाच असतो. त्यातही तो शेतकरी असला तर बोलायला नको. कारण शेतीमध्ये येणाऱ्या अडचणीही प्रचंड आहेत. त्यांना सामोरे जाताना शेतकऱ्याला आपल्या पारंपरिक अनुभवावरच अवलंबून राहावे लागते. समज, उमज आणि शहाणपणा यांच्या जोरावर केलेले प्रयत्न अनेक वेळा तोकडे पडतात. कारण त्याचा शास्त्रीय पाया अनेक वेळा कच्चा असतो. असा शास्त्रीय पाया जर मिळू शकला, तर कर्नाटकातील डिंका शेट्टीहल्ली या गावातील फुलांप्रमाणे फुलणारे ग्रामस्थांचे हसरे चेहरे नक्कीच पाहायला मिळतील, यात शंका नाही. वास्तविक कर्नाटकांतील मांड्य हा जिल्हा तसा अवर्षणग्रस्त. या भागामध्ये वाळलेली पिके आणि शेतकऱ्यांचे हताश चेहरे हे तसे कायमचे दृश्य; मात्र या जिल्ह्यातील डिंका शेट्टीहल्ली या गावात पोचल्यानंतर चित्र बदलल्याची न बोलताच जाणीव होते. गावात प्रवेश करतानाच शेवंतीच्या फुललेल्या मळ्यांनी आपले स्वागत होते. एखादे सामान्य गावामध्ये बदल होण्यासाठी कारणीभूत असामीही तशीच असावी लागते. येथे ती ‘कृषी ज्ञान विज्ञान वेदिके’ या संस्थेच्या आणि डॉ. वसंथकुमार थिमाकापुरा यांच्या रूपाने भेटली आहे. वनस्पतीशास्त्रातील पीएचडी मिळवलेला हा डॉक्टर आपल्या संस्थेद्वारे शेतकऱ्यांना सल्ला सेवेतून साह्य करतो. शेतीतील विविध अडचणीमध्ये हा सल्ला मोलाचा ठरतो. या प्रदेशामध्ये आल्यानंतर वसंथकुमार यांना मुळकुज रोग आणि त्यासाठी अतोनात प्रमाणात होणारा बुरशीनाशकांचा वापर सर्वांत प्रथम लक्षात आला. मुळकुज रोगामुळे पिकांचे नुकसान ही नेहमीचीच बाब झाली होती. रोगग्रस्त रोपे आपल्या म्हैसूर येथील प्रयोगशाळेत आणून, त्यावर प्रयोग सुरू झाले. त्यातून खास द्रावण तयार केले. हे शेतकऱ्यांना देऊन, प्रत्यक्ष शेतामध्ये घेतलेल्या चाचण्याही यशस्वी झाल्या. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे शेतकरी काही या प्रयोगाकडे वळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामागील कारण जाणण्याचे प्रयत्न केले. गरिबी हेच मुख्य कारण होते. कारण समस्या माहीत होती, त्यावरचे उत्तरही समजले; मात्र ते द्रावण खरेदी करण्यासाठी म्हैसूरपर्यंत जाण्याइतकेही पैसे नसल्याचे दिसून आले. मग त्यांना गावामध्येच प्रशिक्षण केंद्राची उभारणी केली. अल्पभूधारक शेतकऱ्यांची आर्थिक क्षमताही अत्यंत कमी आहे. त्यातच पीक संरक्षणासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या अर्धवट सल्ल्यावर अवलंबून राहावे लागते. परिणामी खर्चातील वाढीसोबतच पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागे. त्याविषयी माहिती देताना दिलीप (शेतकरी) म्हणाले, ‘‘२००९ मध्ये मुळकुज या रोगामुळे आमचे संपूर्ण पीक नष्ट झाले. या रोगावर कोणताही उपाय नसल्याचे स्थानिक विक्रेत्याकडून समजले. त्यानंतर २०१० मध्ये वसंथकुमार यांची भेट झाली. बाकी सारे आपल्यासमोर आहे.’’ कृषी ज्ञान आणि माहितीतील हा फरक कमी करण्याच्या उद्देशाने वसंथकुमार यांनी कामाला सुरवात केली. वसंथकुमार म्हणाले, की काही वर्षांपूर्वी या भागातील शेतकरी भाज्या आणि फळपिके घेत असत; मात्र अलीकडे ते शेवंती हे फुल पीक घेत आहेत. अन्य पिकांच्या तुलनेमध्ये फुलपिकांमध्ये अधिक लक्ष द्यावे लागते आणि कष्टही अधिक आहेत. अर्थात त्यातून मिळणारे ताजे व भरपूर उत्पन्न यामुळे हे शेतकरी या पिकांकडे आकर्षित झाले आहेत. बिलेकहल्ली येथील शेतकरी धनैय्या म्हणाले, ‘‘पूर्वी शेतीमध्ये आम्ही ४० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक केल्यानंतर कसेबसे १० ते २० हजार रुपये मिळत; मात्र आता योग्य सल्ल्यामुळे तेवढ्या गुंतवणुकीमध्ये दीड ते दोन लाख रुपये उत्पन्न मिळत आहे.’’ गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये शेतकरी या संस्थेतून मिळणाऱ्या सल्ल्याप्रमाणे पिकांचे नियोजन करत आहेत. उत्पादन खर्चामध्ये बचत होत असून, उत्पादनामध्ये चांगली वाढ मिळत असल्याने शेतकरी खूश आहेत. एका गावातील प्रयोगाला मिळालेल्या यशामुळे प्रोत्साहित होत वसंथ यांनी आणखी २० गावांमध्ये काम सुरू केले. प्रत्येक गावामध्ये हुशार शेतकऱ्यांमधून एक क्रॉप डॉक्टर तयार करण्यात येत आहेत. सध्या शंभर शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होत आहे. डॉ. वसंथकुमार थिमाकापुरा यांना नुकताच राज्योत्सवा पुरस्कार मिळाला आहे. थोडक्यात परिचय... डॉ. वसंथकुमार थिमकपुरा यांनी १९७५ मध्ये वनस्पतीशास्त्रातील पदवी घेतल्यानंतर म्हैसूर विद्यापीठातून एम. एस्सी, एम. फिल (बीज रोगशास्त्र) आणि पीएचडी (उपयोजित वनस्पतीशास्त्र) या उच्च पदव्या मिळवल्या. १९८४ ते १९८८ पर्यंत म्हैसूर विद्यापीठामध्ये लेक्चरर म्हणून काम केले. त्यानंतर बीजोत्पादनातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये १५ वर्षे काम केले. एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्याशी भेट झाल्यानंतर प्रत्यक्ष शेतकऱ्यांसोबत काम करण्याची प्रेरणा मिळाली. २०११ मध्ये नोकरी सोडून स्वतःची स्वयंसेवी संस्था स्थापन करत शेतकरी आणि पिकांच्या समस्यांवर काम सुरू केले. पुढे त्यांच्या पत्नी वासंथी (एम.एस्सी, एम. फिल) याही आपली सरकारी नोकरी सोडून संस्थेमध्ये कार्य करू लागल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com