वनस्पतिजन्य तैलघटकांमधील रोगविरोधक गुणधर्मांचा घेतला शोध

वनस्पतिजन्य तैलघटकांमधील रोगविरोधक गुणधर्मांचा घेतला शोध
वनस्पतिजन्य तैलघटकांमधील रोगविरोधक गुणधर्मांचा घेतला शोध

वनस्पतीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मांच्या अस्थिर अशा घटकांची ओळख बेल्जियम येथील व्हीआयबी- कू लिवेन सूक्ष्मजीवशास्त्र केंद्रातील संशोधकांनी पटवली आहे. त्यासाठी त्यांनी १७५ अत्यावश्यक तेले आणि ३७ तैलसंयुगांच्या कार्यपद्धतीच्या चाचण्या घेतल्या आहेत. त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक संयुगे ही कॅंडीडासारख्या विविध औषधांसाठी प्रतिकारक असलेल्या सूक्ष्मजीवांवरही चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये रोगकारक जिवाणू अधिक ताकदवान होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रतिजैविकांचा वापर वेगाने वाढत चालला आहे. ही प्रतिजैविकांची रोगनिवारण क्षमता जिवाणूंच्या वाढलेल्या प्रतिकारकतेमुळे कमी होत आहे. अशीच काहीशी स्थिती पिकांच्या बाबतीत आढळून येत आहे. मानव आणि पिके यामध्ये येणाऱ्या रोगांच्या नियंत्रणासाठी अधिक नैसर्गिक घटकांच्या वापरासाठी जागतिक पातळीवर संशोधकांचे प्रयत्न चालू आहेत. वनस्पतीमध्ये स्वसंरक्षणासाठी अनेक संयुगे तयार होत असतात. कीडी व रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी किंवा नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. अशा वनस्पतिजन्य १७५ आवश्यक तैलघटक (essential oil) आणि ३७ संयुगांच्या चाचण्या व्हीआयबी - कू लिवेन सूक्ष्मजीवशास्त्र केंद्रामधील संशोधक प्रो. पॅट्रिक व्हॅन डजिक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतल्या आहेत. त्यासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण प्रक्रियेचा वापर केला. आवश्यक तेले आणि त्यांच्या संयुगांचा शोध संस्थेतील अॅडम फेयार्ड यांनी एक हजारपेक्षा अधिक मूलद्रव्यांच्या अभ्यास व चाचण्यातून १७५ वेगवेगळी आवश्यक तेले मिळवली आहेत. वनस्पतिजन्य घटकांपासून स्टीम डिस्टिलेशन किंवा कोल्ड प्रेस पद्धतीने ही तेले मिळवली जातात. त्यातील जैविक कार्यरत घटकांची ओळख पटवून, त्यांच्या विविध मिश्रणांचे बुरशी व जिवाणूंवर होणारे परिणाम तपासले जात आहेत. त्याविषयी माहिती देताना प्रो. पॅट्रिक व्हॅन डजिक यांनी सांगितले, की मानवामध्ये रोगकारक ठरणाऱ्या दोन बुरशी कॅंडीडा अल्बिकन्स आणि कॅंडीडा ग्लाब्रेटा यांना लक्ष्य करू शकणाऱ्या औषधांच्या शोधात आम्ही आहोत. त्यातील कॅंडीडा ग्लाब्रेटा ही औषधांना अधिक प्रतिकारकता विकसित केलेली प्रजाती आहे. कॅंडीडा जिवाणूंच्या नियंत्रणासाठी जगभरामध्ये वापरल्या जाणाऱ्या फ्लुकोनॅझोल या औषधाचा परिणाम कमी होत आहे. हे जिवाणू त्यासाठी सहनशील होत आहेत. जिवाणूंवरील उपचारांमध्ये वनस्पतिजन्य आवश्यक तेले उपयुक्त ठरू शकत असल्याचे दिसून आले. हे संशोधन सायंटिफिक रिपोर्टसमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. अनेक संभाव्य उपयोग

  • संशोधन प्राथमिक पातळीवर यशस्वी ठरले असले, तरी त्याच्या वैद्यकीय चाचण्या होणे बाकी आहे. मात्र, वनस्पतिजन्य घटकांची अस्थिर तेले किंवा संयुगांची ओळख पटली आहे.
  • हॉस्पिटल्समधील स्वच्छतेसाठीही अशी संयुगे अत्यंत उपयुक्त ठरतील.
  • श्वसनाच्या समस्या असलेल्या रुग्णांच्या उपचारामध्ये वनस्पतिजन्य व नैसर्गिक संयुगे महत्त्वाची ठरतील.
  • शेतीमध्ये प्रामुख्याने काढणीपश्चात येणाऱ्या किडी व रोगांच्या नियंत्रणासाठी नैसर्गिक संयुगे उपयुक्त राहतील. कारण या टप्प्यामध्ये रासायनिक कीडनाशकांचे पर्याय अत्यंत कमी होत जातात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com