agricultural stories in Marathi, Agromoney, arthkatha, Anup More yashkatha | Agrowon

नगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते आर्थिक स्थैर्य

कृष्णा जोमेगावकर
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड) येथील मोरे कुटुंबीयांनी नावलौकिक मिळवला आहे. नव्या प्रयोगातून लागवड खर्च कमी करतानाच सोयाबीन, हळद, केळी, हरभरा पिकात उत्पादनातही वाढ मिळवली. ‘आधी केले, मग सांगितले’ हाच बाणा फायदेशीर ठरत असल्याचे ते सांगतात.

आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड) येथील मोरे कुटुंबीयांनी नावलौकिक मिळवला आहे. कुटुंबातील तिसरी पिढी अनुप मोरे कृषी शिक्षणानंतर कृषी विभागात नोकरी करतानाच विस्ताराचेही काम चोख करतात. नव्या प्रयोगातून लागवड खर्च कमी करतानाच सोयाबीन, हळद, केळी, हरभरा पिकात उत्पादनातही वाढ मिळवली. ‘आधी केले, मग सांगितले’ हाच बाणा फायदेशीर ठरत असल्याचे ते सांगतात.

मुदखेड येथील खासगी शिक्षण संस्थेत वरिष्ठ लिपिक असलेले भगवानराव मोरे, जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक गोविंदराव मोरे आणि नांदेड येथे डेप्युटी इंजिनिअर अनंतराव मोरे अशा तिघा बंधूंना वडील स्व. संभाजीराव यांच्याकडून प्रगतिशील शेतीचा वारसा लाभला. त्यांची वडिलोपार्जित एकत्रित तीस एकर शेती. आजवर नोकरी सांभाळत शेती करणाऱ्या या भावंडांना घरच्या किमान एक व्यक्तीने शेतात लक्ष दिले पाहिजे, असे वाटे. त्यातूनच भगवानराव यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनुप यांनी एम. एस्सी. (कृषी) केले. त्यानंतर शेतीकडे लक्ष देण्याच्या उद्देशाने कृषी विभागात कृषी सहायक म्हणून काम सुरू केले. कृषी विस्ताराचे काम करताना ‘आधी केले आणि मग सांगितले’ यावर भर ठेवला. उसामध्ये आंतरपीक म्हणून टोकण पद्धतीने हरभरा लागवड करून विक्रमी उत्पादन घेतले. मागील वर्षापासून गादीवाफ्यावर सोयाबीनची टोकण केली. हे तंत्र उत्पादन खर्चात बचत करणारे असल्याचे अनुप सांगतात.

हरभरा उत्पादनातून प्रेरणा
दोन विंधन विहिरी आणि दोन विहिरी अशी बारमाही पाण्याची व्यवस्था आहे. पट्टा पद्धतीने चार फूट अंतरावर उसाची लागवड करतानाच प्रथम २०१६ मध्ये तीन एकरमध्ये हरभऱ्याची टोकण केली. टोकण पद्धतीमुळे एकरी बियाणे कमी लागले. लागवड खर्चात बचत साधतानाच २९ क्विंटल हरभरा उत्पादन मिळाले. चांगले परिणामामुळे हरभरा व सोयाबीन अशा दोन्ही पिकांमध्ये गादीवाफे आणि टोकण पद्धतीवर भर देत असल्याचे अनुप सांगतात. मागील वर्षी अर्धा एकरमध्ये चार फूट अंतरावर बेड करून त्यावर सहा इंच या आकारावर टोकण पद्धतीने सोयाबीनची लागवड केली. केवळ पाच किलो बियाणे लागवडीतून नऊ क्विंटल उत्पादन मिळाले. यंदाही अडीच एकर क्षेत्रामध्ये बेडवर टोकण पद्धतीने बीजप्रक्रियेनंतर लागवड केली आहे. एकरी केवळ दहा किलो बियाणे लागले. लागवडीनंतर तणनाशकाची फवारणी आणि मजुरांच्या साह्याने निंदणी करून पीक तणविरहीत ठेवले. पिकाची परिस्थिती पाहता चांगले (एकरी वीस क्विंटलपर्यंत) उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.

निर्यातक्षम केळीचे उत्पादन
केळी लागवडीचा निर्णय घेतल्यानंतर लागवडीपूर्वी बोरू या हिरवळीच्या खताची पेरणी करून ४५ ते ५० दिवसांनी जमिनीत गाडला. त्यानंतर पाच पोते सिंगल सुपर फॉस्फेट पसरून दिले. सप्टेंबर २०२० मध्ये जमीन वाफशावर येताच सहा फूट अंतरावर सरी मारून पाच फुटांवर चार हजार केळी रोपांची लागवड केली. एक वर्षे केळी रोपे, दुसऱ्या वर्षी कंदापासून लागवड असे नियोजन बसविल्यामुळे कंदाच्या लागवडीत प्रति रोप ११ रुपयांची बचत होते. शिफारशीनुसार रासायनिक खतांसोबत जैविक खतांचाही वापर केल्यामुळे केळीचा दर्जा सुधारला. अकरा महिन्यांत सुमारे साडेतीन हजार झाडांची काढणी झाली. घडाचे वजन ४५ ते ४५ किलोपर्यंत (सरासरी ३१.२८ किलो) रास मिळाली. दर चांगले मिळण्यासाठी चंडीगड बाजारपेठेत केळी पाठवली. सरासरी सातशे रुपये क्विंटल दराप्रमाणे साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. पीक व्यवस्थापनासाठी अडीच लाख रुपये खर्च आल्याचे अनुप मोरे यांनी सांगितले. मागील वर्षी आखाती देशामध्ये संपूर्ण केळी निर्यात झाल्याचे ते सांगतात.

हळदीचे एकरी ४३ क्विंटल उत्पादन
मागील वर्षी ११ व १२ जून रोजी दोन एकर क्षेत्रामध्ये हळदीची लागवड केली. खोल नांगरटीनंतर पाच ट्रॉली शेणखत मिसळून साडेचार फूट अंतरावर बेड बनवले. त्यावर सूक्ष्म अन्नद्रव्यांसह बेसल डोस दिला. लागवडीआधी १५ दिवस बेडवर ठिबकद्वारे रोज दोन तास पाणी दिले. वातावरण थंड झाल्यावर बेणे प्रक्रिया करून मजुरांच्या साह्याने हळद लागवड केली. एकरी आठ क्विंटल बेणे लागले. हळद काढणी पूर्वी १५ ते २० दिवस अगोदर ठिबक संच बंद केला. त्यानंतर पाला कापून सरीमध्येच दाबून घेतला. यानंतर ट्रॅक्टरने हळदीची काढणी केली. एकरी ४३.२८ क्विंटल उत्पादन मिळाले. सरासरी दर चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल या प्रमाणे ३ लाख ६५ हजार रुपयांचे उत्पन्न झाले. उत्पादन खर्च एकरी सरासरी ६० ते ७० हजार रुपये होता. खर्च वजा जाता दोन एकरांमध्ये दोन लाख रुपये निव्वळ नफा राहिल्याचे त्यांनी सांगितले.

बागायती पिकासह हंगामी पिके
संपूर्ण शेताला पुरेल एवढे पाणी असल्यामुळे दरवर्षी शेतात केळीसह ऊस, हळद ही नगदी पिके असतात. उसाचे एकरी सरासरी ६० टन उत्पादन येते. या नगदी पिकांना जोड म्हणून सोयाबीन, तूर, हरभरा अशा हंगामी पिकाची लागवड करतात. आज त्यांच्या शेतीत ऊस पाच एकर, सोयाबीन १५ एकर, तूर दीड एकर, हळद ४.५ एकर, केळी सहा एकर (१० हजार रोपे), आंबा बाग (५५ वर्षे जुनी) एक एकर, भाजीपाला एक एकर अशी पीक रचना आहे.

प्रगतिशील शेतीचा वारसा जपतोय...
वडिलोपार्जित शेतीमधून आजोबांनी तीनही भावडांच्या एकत्रित कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवली. ‘ही काळ्या आईचीच देण’ असल्याचे मोरे कुटुंबीय आवर्जून सांगतात. त्यांचे आजोबा स्वर्गीय संभाजी पाटील मोरे हे देश स्वतंत्र झाला तेव्हा शासकीय सेवेत रुजू झाले. मात्र सात महिन्यातच नोकरीचा राजीनामा देत शेतीकडे वळले. त्यांनी कायम उत्कृष्ट उत्पादन काढण्यावर भर ठेवला. आज मोरे यांची तिसरी पिढीही शेतीत उतरली आहे. एक बंधू अनंतराव नोकरीनिमित्त नांदेड येथे राहत असले तरी दोघा भावंडाची कुटुंबे एकत्र राहतात. मोरे कुटुंबीयांतील बहुसंख्य नोकरदार असले तरी मुळात उत्कृष्ट शेती करणारे म्हणूनच ओळखले जातात. शेतीमध्ये नावीन्यपूर्ण वेगवेगळे तंत्रज्ञान वापरण्याकडे त्यांचा कल असतो. शेतीतील उत्पन्नावरच आणखी १२ एकर क्षेत्र खरेदी केले आहे. यासोबत त्यांनी शेतीकामासाठी २ ट्रॅक्टर, आवश्यक ती अवजारे, सर्व शेतात डबल पाइपलाइन, मुलांची शिक्षणे, मुलींचे लग्न, मुदखेड येथे मोठे घर, नांदेड येथे तीन हजार स्क्वेअर फुटाचे घर बांधकाम, विहिरीचे बांधकाम, ४ मोटर सायकल, २ चार चाकी वाहनाची खरेदी अशी सर्वदूर प्रगती साधली आहे.

विशेष काळजी
घरातील सर्वांचा आरोग्यविषयक विमा काढला आहे. यासाठी दरवर्षी सुमारे ३ लाख प्रामुख्याने नोकरीच्या उत्पन्नामधून बाजूला काढतो. मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड ठेवले आहे. त्यांच्या शाळेचे शुल्क, खासगी शिकवणी वर्ग यांचीही व्यवस्था प्रामुख्याने शेती उत्पन्नामधून केली जाते.

- अनुप मोरे, ८६६८८५३४९४


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
पावसाची उघडीप राहणारपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची...पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र...