रेशीम उद्योगातून मिळवले शाश्‍वत उत्पन्न

पुणे जिल्ह्यातील काळूस (ता. राजगुरुनगर) येथील नामदेव नवनाथ जाधव यांनी तीन एकरांपैकी एक एकरांत तुती लागवडीसह सुरू केलेला रेशीम व्यवसाय या वर्षी दोन एकरांपर्यंत विस्तारला आहे. उत्कृष्ट व्यवस्थापनातून रेशीम कोषांचे उल्लेखनीय उत्पादन घेत आहेत. या पूरक व्यवसायातून बऱ्यापैकी शाश्‍वत उत्पन्न हाती येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे.
रेशीम उद्योगातून मिळवले शाश्‍वत उत्पन्न
रेशीम उद्योगातून मिळवले शाश्‍वत उत्पन्न

पुणे जिल्‍ह्यातील काळूस (ता. राजगुरुनगर) येथील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला जोड किंवा पर्याय म्हणून रेशीम व्यवसाय सुरू केला आहे. गावातील अशा सुमारे ३५ शेतकऱ्यांपैकी एक असलेले नामदेव जाधव हे स्वतः एम. ए. (अर्थशास्त्र) शिक्षित शेतकरी आहेत. त्यांच्याकडे तीन एकर शेती असून, प्रामुख्याने कांदा, बटाटा, ऊस अशी पिके घेत. उत्पन्नामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने रेशीम शेती हा पर्याय निवडला. त्यासाठी त्यांना गावातील पूर्वीपासून रेशीम शेती करणारे शेतकरी विठ्ठल सुकाळे यांनी प्रेरणा दिली. त्यांच्याकडून व्यवसायाचे स्वरूप व अर्थकारण समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाचा अनुभव तीन महिने घेतला. या प्रत्यक्ष अनुभवामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. व्यवसायाची उभारणी जिल्हा रेशीम उद्योग केंद्राच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करण्याची तयारी केली. सन २०१६ मध्ये सुरुवातीला तुतीची एक एकरामध्ये लागवड केली. शेताजवळच ६० बाय २५ फूट आकाराचे शेड उभारले. यासाठी सुमारे साडे तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे. सहा महिन्यांनंतर पाला उपलब्ध होऊ लागल्यानंतर २०० अंडीपुंजाची पहिली बॅच घेतली. त्यानंतर चॉकी व पुढील सर्व अवस्थांचे व्यवस्थापन चॉकी केंद्राच्या मार्गदर्शनानुसार केले. योग्य अवस्थेत रेशीम अळ्या मोठ्या पाल्यांद्वारे रॅकवर शिफ्ट केल्या. साधारणपणे २२ ते २५ दिवसांनंतर कोष तयार होण्यास सुरुवात झाल्यानंतर अळ्यांवर चंद्रिका जाळी टाकली. त्यानंतर जाळीवरील कोष काढणी सुरू होते. त्यासाठी रोजंदारीवर पाच महिलांची मदत घेतली जाते. किफायतशीर अर्थकारण : नामदेव जाधव सांगतात, की प्रति १०० अंडीपुंजापासून ८० ते ९० किलो रेशीम कोषाचे उत्पादन मिळते. सध्या किलोला सरासरी ६०० ते ७०० रुपयांपर्यत दर मिळतो. एका बॅचमधून ४८ हजार ते ७८ हजार रुपये इतके उत्पन्न मिळते. प्रति बॅच किमान १० ते १५ हजार रुपये खर्च येतो. या व्यवसायातून शाश्‍वत व समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. त्यातून वाढलेल्या आत्मविश्‍वासाच्या बळावर यंदा आणखी एक एकरावर तुती लागवडीचे नियोजन केले आहे. त्यातून अंडीपुंजाची संख्या वाढवणे शक्य होईल. रेशीम कोषांची जागेवरच विक्री : सुरुवातीला पुण्यातील काही व्यापारी रेशीम कोषांची खरेदी करून बंगळूरला पाठवत. मात्र मागील दोन वर्षांपूर्वी बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रेशीम खरेदी सुविधा सुरू झाली आहे. जिल्ह्यातील रेशीम उत्पादकांची सोय झाली आहे. या बाजार समितीत सोलापूरसह, बंगळूर येथील व्यापारीही खरेदीसाठी येतात. मागील काही महिन्यांपासून काही व्यापारी रेशीम कोषांची जागेवरच खरेदी करू लागले आहे. आश्‍वासक उत्पादन व उत्पन्न : चोख व्यवस्थापनाच्या आधारे जाधव यांना २०० अंडीपुंजाच्या पहिल्या बॅचमधून १८० किलो रेशीम कोषांचे उत्पादन मिळाले. त्यास प्रतिकिलो सरासरी ३३० रुपये दर मिळाला. सुमारे ५९,४०० रुपयांचे उत्पन्न मिळाले. अंडी शासनाकडून मिळाल्यामुळे खर्च केवळ ४ हजार रुपये झाला. आता त्यांचे वर्षाला सुमारे सहा बॅचेस घेण्याचे नियोजन असते. अगदीच अडचणी आल्या तरी पाच बॅचेस हमखास होतात. जवळच भीमा व भामा नद्यांचा संगम असल्याने सिंचनासाठी पाण्याची कमतरता फारशी भासत नाही. या व्यवसायात शेड, उपकरणांचे निर्जंतुकीकरण, स्वच्छता यांची काळजी घ्यावी लागते. अन्यथा, अळ्यांना संसर्ग होऊ शकतो. सर्वांत मोठा धोका पाल, सरडे आणि मुंग्यांपासून असतो. अळ्यांच्या प्रत्येक अवस्थेत पुरेसे ‘स्पेसिंग’ ठेवावे लागते. उत्पादनवाढीसाठी या बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. परिसरातील चॉकी सेंटरचा होतोय फायदा ः काळूस परिसरातील रेशीम उत्पादक पूर्वी अंडीपुंजांपासून व्यवसायाची सुरुवात करीत. यात चॉकी अवस्थेतील संगोपन काळजीपूर्वक व कुशलतेने करावे लागते. थोड्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते. तीन वर्षांपूर्वी काळूस गावालगत वाकी बुद्रुक येथील विजय गारगोटे यांनी चॉकी सेंटर उभारले आहे. पुणे जिल्हा रेशीम कार्यालयाच्या सूचनेनुसार त्यांनी म्हैसूर येथे तीन महिन्यांचे चॉकी संगोपनाचे प्रशिक्षण घेतले आहे. सध्या ते पुण्यातील राजगुरुनगर, शिरूर, दौंड, बारामती, आंबेगाव, जुन्नर, पुरंदर या तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील जवळच्या भागामध्ये चॉकी पुरवठा करतात. १०० अंडीपुंजांमागे दीड हजार रुपये शुल्क आकारले जाते. प्रत्येकी सात दिवसांची एक बॅच या प्रमाणे प्रतिमाह तीन बॅचेस घेतात. प्रतिबॅच दहा हजार चॉकी निर्मितीची क्षमता असली तरी सध्या मागणी प्रमाणे फक्त तीन हजार चॉकी उत्पादन घेत आहेत. जाधव हेही याच चॉकी सेंटरमधून चॉकी खरेदी करून रेशीम उद्योग करत आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या खर्चात, वेळेत बचत झाली आहे. १०० अंडीपुंजांमागे साधारणपणे २० किलो उत्पादन वाढत असल्याचा अनुभव आहे. आर्थिक ताळेबंद ः (रुपयांमध्ये) एकूण क्षेत्र ः ३ एकर १) गतवर्षी असलेली पिके ऊस, कांदा, बटाटा, तुती, कोथिंबीर.

पीक क्षेत्र एकरी उत्पादन एकरी उत्पादन खर्च एकरी निव्वळ उत्पन्न (खर्च वजा जाता)
ऊस १ एकर ७० ते ७५ टन ३० ते ४० हजार १ ते १.६० लाख.
कांदा, बटाटा प्रत्येकी अर्धा एकर पीकनिहाय वेगळा ४० ते ५० हजार २५ हजार.
कोथिंबीर एक एकर तुतीमध्ये आंतरपीक -- ६ हजार २० हजार.

२) या वर्षी ऊस एक एकर, तुती दोन एकर अशी शेतीतील पीक पद्धती आहे. ३) वार्षिक खर्च (रुपये) ः मजुरी, खते, कीटकनाशके, बियाणे - १.५० लाख कौटुंबिक खर्च - १ लाख आरोग्यासाठी वेगळी तरतूद ः घरामध्ये पाच व्यक्ती आहेत. आई गऊबाई, वडील नवनाथ, पत्नी तनुजा यांच्या शेती व रेशीम व्यवसायात मदत होते. मुलगी हिंदवी सध्या एक वर्षाची आहे. सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहून कुटुंबीयांचा आरोग्य विमा काढला आहे. त्यासाठी दरवर्षी ५० हजार रुपये इतका खर्च होतो. मात्र कुटुंबात अचानक उद्भवणाऱ्या आजारांची व त्यावरील वैद्यकीय उपचारांची फारशी चिंता राहत नाही. चांगले उपचार मिळू शकतात. मार्गदर्शन व सहकार्य ः पुणे जिल्हा रेशीम कार्यालयाचे विभागीय रेशीम विकास अधिकारी डॉ. कविता देशपांडे आणि प्रमोद शिरसाट यांच्याकडून मार्गदर्शन मिळते. ‘अॅग्रोवन’चे नियमित वाचक असून, वेळोवेळी प्रसिद्ध होणाऱ्या रेशीम लेखातून उत्तम तांत्रिक मार्गदर्शन मिळते. अंकातील विविध विषयांची स्वतंत्र कात्रणे काढून त्याचा संग्रह केला आहे. कृषी विभाग, आत्मा विभाग, केव्हीके यांच्याद्वारे आयोजित प्रशिक्षण व अभ्यास दौऱ्यामध्ये सहभागी असतात. नामदेव जाधव, ९९६०५५४२३९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com