बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराट

सुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती. पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ते बीजोत्पादनाकडे वळले. बीजोत्पादनामध्ये मास्टरकी मिळवत त्यांनी कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य प्राप्त केले. शेडनेटमध्ये भेंडी बीजोत्पादनासह ते आता टरबूज बीजोत्पादनातूनही चांगला नफा मिळवत आहेत.
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराट
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराट

सुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती. पारंपरिक पिकातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ते बीजोत्पादनाकडे वळले. बीजोत्पादनामध्ये मास्टरकी मिळवत त्यांनी कुटुंबासाठी आर्थिक स्थैर्य प्राप्त केले. शेडनेटमध्ये भेंडी बीजोत्पादनासह ते आता टरबूज बीजोत्पादनातूनही चांगला नफा मिळवत आहेत.  बुलडाणा जिल्ह्यातील निमगाव वायाळ (ता. सिंदखेड राजा) येथील सुरेश हुसे हे २००३ मध्ये पदवीधर झाले तरी नोकरी लागली नाही. मग वडील लक्ष्मणरावांसह एकत्रित तीन एकर शेतीत काम करू लागले. पूर्वी एक एकरमध्ये डाळिंब, अर्धा एकर केळी आणि अर्धा एकर हंगामी पिके अशी त्यांची पीकपद्धती होती. २००७ मध्ये विभक्त झाल्यानंतर त्यांच्या वाट्याला दीड एकर शेती आली. डाळिंब, केळी या पिकामध्ये खर्च वाढत चालला होता. तुलनेने अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने नव्या पिकांच्या शोधात होते. सन २०११ च्या खरीप हंगामात धाडस करून डाळिंब व केळीचे पीक शेतातून काढून टाकत भारतीय कंपन्यांसाठी बीजोत्पादन प्लॉट घेण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम २० गुंठे क्षेत्रात भेंडी पिकाचे बीजोत्पादन घेतले. त्यातून दोन क्विंटल बियाणे उत्पादन मिळाले. भेंडी बियाण्याला ३२ हजार रुपये क्विंटल असा दर मिळाली. पहिल्याच प्रयत्नाला यश आल्याने उत्साह वाढला. वेगवेगळ्या बियाणे कंपन्यांसाठी ते बीजोत्पादन घेऊ लागले. मात्र, प्रत्येक कंपनीकडून मिळणाऱ्या दरात तफावत असल्याचे लक्षात आले तरी चार वर्षे भेंडी बीजोत्पादन घेतले. त्यातून चांगला पैसा मिळवत अर्धा एकर शेतजमीनही विकत घेतली. संधी आली चालून पाच ते सहा बियाणे कंपन्यांचे बीजोत्पादन करून देत असतानाच सुरेश यांच्याकडे २०१७ मध्ये एक आंतरराष्ट्रीय बियाणे कंपनी चालून आली. त्यांनी बियाण्याचा दर जास्त देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीने त्यांच्या बीजोत्पादन अनुभवाची खात्री केल्यानंतर केवळ १० गुंठ्यांचा बीजोत्पादन प्लॉट प्रायोगिक तत्त्वावर दिला. १० गुंठ्यांतून मे महिन्यात त्यांनी १ क्विंटल ३४ किलो बीज तयार केले. तेथून मग पुन्हा मागे पाहिलेच नाही. सतत तीन वर्षे भेंडीचा एक एकर क्षेत्रात बीजोत्पादन प्लॉट घेतला. दहा गुंठ्यात दीड- दोन क्विंटलपर्यंत उत्पादन काढण्यापर्यंतचा आत्मविश्‍वास आला. दरवर्षी भेंडी बीजोत्पादन घेत असल्याने यात ‘मास्टरकी’ निर्माण झाली. शेडनेटकडे वळले... हुसे यांची कामगिरी पाहून संबंधित कंपनीच्या विभागीय व्यवस्थापकांनी शेडनेटमध्ये भेंडी बीजोत्पादन घेण्याचा सल्ला दिला. २०२० मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक लाख रुपये खर्चून १० गुंठ्यांत शेडनेट उभारले. त्यात भेंडी लागवड केली. त्यातून एक क्विंटल ५५ किलो बियाणे तयार केले. या बियाण्याला ६५ हजार रुपये प्रतिक्विंटल दर होता. हळूहळू संबंधित कंपनीने हुसे यांना टोमॅटो, वांगी, टरबूज या पिकांचेही बीजोत्पादनाची संधी दिली. यामुळे आता वर्षभर बीजोत्पादनाच्या कामात व्यस्त राहतात. मे महिन्यात उन्हाळी भेंडी २० गुंठे क्षेत्रात लागवड असते. ते आणि पत्नी अरुणा हे दोघेच काम करतात. या काळात भेंडीमध्ये परपरागीकरणाचे काम महिनाभर चालते. १२ महिन्यांच्या कालावधीत चार प्लॉट बीजोत्पादनाचे असतात, असे त्यांनी सांगितले. ...असा असतो कालावधी मे महिन्यात लागवड ः २० गुंठ्यांत मे महिन्यात लागवड करतात. भेंडी लागवडीनंतर ४५ दिवसांनी परागीकरणाचे काम सुरू होते. हे परपरागीकरणाचे सर्व काम पत्नी अरुणा यांच्यासह सुरेशराव करतात. जुलै ते ऑगस्टमध्ये दोन क्विंटलपेक्षा अधिक बियाणे मिळते. सप्टेंबरमध्ये हे बियाणे कंपनीला सुपूर्द करतात. या काळात ४५ हजार रुपये प्रति क्विंटल असा दर असतो. उत्पादनखर्च ४ ते ५ हजार वजा जाता ८५ हजार रुपये मिळतात, असे सुरेश म्हणाले. या पिकात मल्चिंगचा खर्च कंपनीकडून मिळतो. जूनमध्ये लागवड ः या महिन्यातही २० गुंठ्यांत भेंडी बीजोत्पादन असते. उत्पादन दीड क्विंटलपर्यंत मिळते, तर दर साधारणपणे ३७ हजार रुपये प्रति क्‍विंटल असतो. खर्च वजा जाता ७० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न शिल्लक राहते. जानेवारीत टरबूज प्लॉट ः एक एकर क्षेत्रात टरबूज बीजोत्‍पादन. त्यापासून साधारणतः दीड क्विंटल बीजोत्पादन निघते. या बियाण्याचा दर एक लाख रुपये प्रति क्विंटल असतो. उत्पादन खर्च १० हजारांपर्यंत वजा जाता चार महिन्यांत एकरी किमान एक लाख ४० हजार रुपये मिळतात. शेडनेटमध्ये भेंडी लागवड ः जानेवारी महिन्यात १० गुंठे शेडनेटमध्ये भेंडी बीजोत्पादन घेतात. या बियाण्याचा दर ६५ हजार रुपये क्विंटल मिळतो. या क्षेत्रातून साधारणपणे एक क्विंटल ५० किलोपर्यंत उत्पादन होते. खर्च वजा जाता ६० हजारांपर्यंत निव्‍वळ नफा मिळत असल्याचे ते सांगतात. टोमॅटो ः जानेवारीमध्ये १० गुंठ्यांत लागवड केली होती. त्यातून ११ किलो बियाणे मिळाले. त्याला १५००० रुपये प्रति किलो प्रमाणे दर मिळाला. उत्पादन खर्च ५० हजार रुपये वजा जाता १ लाख १५ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. वांगी ः गेल्या नोव्हेंबरमध्ये १० गुंठे क्षेत्रावर वांगी लागवड केली. सध्या हा प्लॉट सुरू असून, उत्पादन हाती यायचे आहे. कंपनीकडून यासाठी दर १२,५०० रुपये प्रति किलो असा ठरलेला आहे. नियोजनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह बीजोत्पादनासाठी दीड एकर शेतीचा फेरपालट पद्धतीने वापर करतात. यामध्ये टाकलेल्या प्लॉटमधून किमान तीन लाख ९० हजारांचे सरासरी उत्पन्न ते घेत आहेत. उर्वरित क्षेत्रात कपाशीची लागवड करतात. सरासरी १० ते ११ क्विंटल उत्पादन मिळते. त्यातूनही ७० ते ८० हजारांचे उत्पन्न हाती येते. एक एकर भेंडी प्लॉटमध्ये गहू लागवड करतात. त्यातून कुटुंबासाठी वर्षभराचे धान्य मिळते. अशा नियोजनातून कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न त्यांनी उत्तम प्रकारे सोडवला आहे. काही ठळक बाबी

  •  भेंडी बीजोत्पादनाचा कालावधी चार महिन्यांचा तर टरबुजाचा पाच महिने कालावधी असतो
  •  बीजोत्पादनासाठी मल्चिंगचा वापर करीत असल्याने जमिनीत गवत होत नाही. परिणामी, निंदणाचा खर्च वाचतो
  •  भेंडी व टरबूज पिकासाठी मल्चिंग अंथरणे, रोपे लावणे, व अन्य कामे सुरेश व अरुणा उभयतांचा करण्याचा प्रयत्न असतो. मात्र मुलांना शेतातील काम लावत नाहीत.
  • सिंचनासाठी विहीर व दोन बोअरवेल आहेत. सर्व सिंचन ठिबक व तुषार पद्धतीने केले जाते.
  • बीजोत्पादन शेतीतून त्यांनी ९०० स्क्वेअर फूट क्षेत्रावर घराचे बांधकाम केले.
  • मुलगी शीतल  इंग्रजी माध्यमात शिकत आहे.
  • - सुरेश हुसे, ९६२३४१०७४४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com