मधमाश्यांवरील परजीवी व्हॅरोवा कोळ्याच्या खाद्यसवयीचा उलगडा

मधमाश्यांवरील परजीवी व्हॅरोवा कोळ्याच्या खाद्यसवयीचा उलगडा
मधमाश्यांवरील परजीवी व्हॅरोवा कोळ्याच्या खाद्यसवयीचा उलगडा

अमेरिकी कृषी संशोधन सेवा आणि मेरीलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी मधमाशीवरील परजीवी व्हॅरोवा कोळ्यांच्या प्रत्यक्ष कार्यरत असतानाच्या सूक्ष्मदर्शीय प्रतिमा मिळवल्या आहेत. व्हॅरोवा कोळी रक्ताऐवजी मधमाशीतील यकृताप्रमाणे कार्य करणाऱ्या स्नायूचा फडशा पाडत असल्याचे स्पष्ट दिसते. हे संशोधन ‘प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’मध्ये नुकतेच प्रकाशित केले आहे. मधमाश्यांच्या वसाहती नष्ट होण्यासाठी कारणीभूत असलेल्या घटकांमध्ये परजीवी व्हॅरोवा कोळ्याचा वरचा क्रमांक आहे. या एकट्या परजीवीने अमेरिकेमध्ये १५ अब्ज डॉलरपेक्षाही अधिक नुकसान केले आहे. त्याचप्रमाणे मधमाश्यांच्या घटत्या संख्येने कृषी उत्पादन आणि दर्जामध्येही मोठी घट येत आहे. अशा वेळी व्हॅरोवा कोळ्यांच्या नियंत्रणासाठी नवीन संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे. हे संशोधन मेरीलॅंड विद्यापीठातील सॅम्युएल डी. रॅमसे यांनी कृषी संशोधन सेवेतील गॅरी बौचॅन, कॉनर गुलब्रौन्सन, जोसेफ मौवरी आणि रोनाल्ड ओचोआ यांच्या सहकार्याने केले आहे. पीएच.डी.साठीच्या या संशोधनामध्ये संयुक्त आणि कॉनफोकल सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने मधमाश्यांवरील व्हॅरोवा कोळ्याचे निरीक्षण केले असून, त्याच्या प्रतिमा मिळवल्या आहेत. मधमाशीच्या स्नायूंचा फडशा पाडतानाच्या या प्रतिमा अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. संशोधनाचे महत्त्व ः

  • आतापर्यंत व्हॅरोवा कोळी हे मधमाश्यांतील (एपीस मेलिफेरा) रक्तावर (हेमोलिम्फ) जगत असल्याचे मानले जात होते. १९७० पर्यंतच्या काळामध्ये जुन्या तंत्रज्ञानाच्या साह्याने झालेल्या अभ्यासावर आधारित हे मत होते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने नुकत्याच झालेल्या अभ्यासामध्ये या कोळ्याच्या खऱ्या खाद्य सवयीचा उलगडा झाला आहे.
  • संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली मधमाशीच्या शरीरावर कोळ्यामुळे झालेल्या जखमेमध्ये कोळ्याचे प्रत्यक्ष निरीक्षण केले आहे. हा कोळी मधमाशीच्या यकृताप्रमाणे कार्य करणाऱ्या मेदयुक्त स्नायूमध्ये आढळला आहे.
  • व्हॅरोवा कोळी केवळ अळ्या आणि कोषावर जगतो असे नाही, तर प्रौढ मधमाश्यांच्या शरीरातील स्नायूंचा फडशा पाडतानाचे प्रत्यक्ष पुरावे उपलब्ध झाले आहेत.
  • मेरीलॅंड विद्यापीठातील व्हॅरोवा कोळ्यांच्या खाद्य सवयीच्या या अभ्यासातून नवी तथ्ये पुढे आली आहेत. अशा प्रकारे स्नायूंवर जगणाऱ्या कोळ्यांचे आयुष्य अधिक आढळले. ते सामान्य रक्तावर (हेमोलिम्फ) जगणाऱ्या कोळ्यांच्या तुलनेमध्ये अधिक अंडीही घालत असल्याचे दिसून आले. उलट जे कोळी केवळ हेमोलिम्फवर जगतात, ते तुलनेने कुपोषित असल्याप्रमाणे दिसतात.
  • व्हॅरोवा कोळी हे मधमाश्यांमध्ये किमान पाच विषाणूंचा प्रसार करत असल्याचे ज्ञात आहे. एकूण व्हॅरोवा कोळ्यामुळे मधमाश्यांची प्रतिकारक्षमता कमी होते. तसेच, परागातील प्रथिनांची साठवण करणे अवघड होते. यातून मधमाश्यांना हिवाळ्यामध्ये तग धरणे अवघड होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com