हवामान बदलामुळे वाढतोय केळीतील सिगाटोकाचा धोका

हवामान बदलामुळे वाढतोय केळीतील सिगाटोकाचा धोका
हवामान बदलामुळे वाढतोय केळीतील सिगाटोकाचा धोका

हवामानातील बदलामुळे केळी पिकामध्ये बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका वाढत असल्याचे एक्स्टर विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनामध्ये पुढे आले आहे. विसाव्या शतकाच्या अंतिम चरणामुळे आशियातील ब्लॅक सिगाटोका रोगांचा प्रादुर्भाव वाढत गेला. पुढे त्याचा प्रादुर्भाव लॅटीन अमेरिका आणि कॅरिबेयन बेटांवरील केळी उत्पादक पट्ट्यामध्ये झाला. या रोगामुळे उत्पादनामध्ये मोठी घट येत आहे. एक्स्टर विद्यापीठामध्ये केलेल्या अभ्यासामध्ये हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वातावरणातील आर्द्रता आणि तापमानाच्या स्थितीमध्ये बदल होत असून, १९६० च्या दशकाच्या तुलनेमध्ये सध्या या विभागात ब्लॅक सिगाटोका रोगांच्या प्रादुर्भावाचा धोका ४४ टक्क्यांपेक्षा अधिक वाढला असल्याचे दिसून आले. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि वाढलेल्या केळी उत्पादनामुळे ब्लॅक सिगाटोका रोगाचा प्रसार वेगाने वाढत गेला. त्याचा फटका उत्पादनाला बसून उत्पादनामध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट आली. त्याविषयी माहिती देताना एक्स्टर विद्यापीठातील डॉ. डॅनियल बेब्बर यांनी सांगितले, की ब्लॅक सिगाटोका हा रोग स्युडोसर्कोस्पोरा फिजिन्सिस या बुरशीमुळे होतो. या बुरशीची जीवनसाखळी ही वातावरणातील घटकांद्वारे नियंत्रित होत असते. गेल्या काही वर्षांतील हवामानातील बदलांच्या स्थितीमध्ये तापमान बुरशीच्या बिजाणूंच्या अंकुरण आणि वाढीसाठी अनुकूल होत आहे. पिकाच्या कॅनोपी ओलसर राहण्यामुळे लॅटीन अमेरिकेतील केळी उत्पादक पट्ट्यामध्ये ब्लॅक सिगाटोका रोगाच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. सर्वसामान्यपणे रोगाचा धोका वाढल्याची स्थिती असली तरी मेक्सिको आणि मध्य अमेरिकेतील काही भागांमध्ये कोरड्या वातावरणामध्ये वाढ झाली असून, येथे रोगाचा धोका कमी होणार आहे.

  • या अभ्यासामध्ये गेल्या ६० वर्षांतील हवामानाच्या माहितीसाठ्यासोबत ब्लॅक सिगाटोका रोगाच्या प्रादुर्भावाची माहिती जोडण्यात आली. ब्लॅक सिगाटोका रोगाचा प्रथम प्रादुर्भाव १९७२ मध्ये होंडूरास येथे आढळला होता. त्यानंतर तो पसरत हानिकारक पातळीवर पोचला आहे. पुढे १९९८ मध्ये त्याचा प्रसार ब्राझीलमध्ये झाला. २००० च्या उत्तरार्धामध्ये कॅरीबियन बेटांपैकी मार्टीनिक, सेंट. ल्युसिया आण सेंट विन्सेट आणि ह्रेनाडियन्स येथे झाला. सध्या हा रोग उत्तरेमध्ये फ्लोरीडापर्यंत आढळत आहे.
  • डॉ. बेब्बर यांनी सांगितले, की होंडुरासमध्ये हा बुरशीजन्य रोग आशियातून पैदाशीसाठी आयात केलेल्या रोपांसोबत आला असावा. आमच्या हवामान बदलाच्या प्रारूपानुसार गेल्या ६० वर्षांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आणि तीव्रता वाढत गेली आहे.
  • स्युडोसर्कोस्पोरा फिजिन्सिस या बुरशीचे बिजाणू हवेद्वारे पसरतात. त्याचा प्रादुर्भाव केळीच्या पानांवर होऊन चट्टे पडतात. बुरशी प्रकाशामध्ये येताच विषारी घटकांचे उत्सर्जन करत असल्याने पेशी मृत होऊन चट्टे पडतात.
  • या अभ्यासामध्ये भविष्यातील हवामान बदलाचे संभाव्य परिणाम मिळवण्यात आले नाहीत. मात्र, अन्य अनेक अभ्यासामध्ये तापमानातील वाढीमुळे कोरड्या होत गेलेल्या वातावरणामुळे रोगाचा धोका कमी होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. मात्र, अशा स्थितीमध्ये केळीच्या लागवड व वाढीसाठी आवश्यक पाणी कितपत उपलब्ध होईल, याचाही विचार करावा लागणार आहे.
  • या संशोधनासाठी युके ग्लोबल फूड सिक्युरीटी प्रोग्रॅम आणि युरोपियन कमिशनच्या होरायझन २०२० कार्यक्रमातून अर्थसाह्य मिळाले आहे. या संशोधाचे निष्कर्ष फिलॉसॉफिकल ट्रॅन्सॅक्शन्स ऑफ दी रॉयल सोसायटी बी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com