वातावरणाशी सुसंगत सफरचंदाच्या रंगीत जातींची वाढली लागवड

बदलत्या वातावरणाशी सुसंगत सफरचंदाच्या रंगीत जातींची वाढली लागवड
बदलत्या वातावरणाशी सुसंगत सफरचंदाच्या रंगीत जातींची वाढली लागवड

हिमाचल प्रदेशामध्ये पारंपरिक डेलिशियस जातींच्या सफरचंद बागेमध्ये जाणवणाऱ्या वातावरणातील बदलाशी संबंधित समस्यांवर मात करण्यासाठी अधिक उत्पादनक्षम अशा नव्या व रंगीत जातींची निवड करण्यात आली. रोहरू येथील कृषी विज्ञान केंद्राने फळबागशास्त्र आणि वनशास्त्र विद्यापीठाच्या सहकार्याने २००५ पासून राबवलेल्या या प्रकल्पामुळे पारंपरिक जातीच्या तुलनेमध्ये फळ उत्पादनात १५१ टक्क्यांनी वाढ झाली, तर निव्वळ उत्पन्नामध्ये ४७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या नव्या जातींकडे २५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र (९५०० हेक्टर) वळले आहे सफरचंद हे हिमाचल प्रदेशातील महत्त्वाचे फळपीक आहे. या पिकाखाली सुमारे ३८ हजार हेक्टर क्षेत्र असून, एकट्या सिमला जिल्ह्यातील उत्पादन ४९९४२२ टन आहे. पारंपरिक पद्धतीने डिलिशियस ही जात लागवडीखाली आहे. या जातीची उत्पादकता कमी आहे. दर दुसऱ्या बहाराला फळांचे प्रमाण कमी येणे, फळांचा दर्जा योग्य नसणे अशा समस्यांचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे कमी उंचीच्या ठिकाणी फळांना योग्य रंग न येणे, तर अधिक उंचीच्या ठिकाणी पक्वतेला उशीर लागणे, अशा समस्याही होत्या. वातावरणातील बदलांच्या स्थितीमध्ये उत्पादकता कमी होत असून, नफ्याचे प्रमाण कमी होत आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी अन्य जातींची निवड करणे गरजेचे होते. त्यातही स्वयंपरागीकरण, स्वतः फळे धरणे, स्परचा प्रकार आणि अन्य रंगांच्या जातीबरोबर अधिक उत्पादकतेला प्राधान्य देण्याचे ठरले. हिमाचल प्रदेशातील मध्यम उंचीच्या प्रदेशाचा विचार करताना रोहरू (जि. सिमला) येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रशासकीय अधिक डॉ. वाय. एस. परमार आणि सोलन येथील फळबागशास्त्र आणि वनशास्त्र विद्यापीठ यांनी सफरचंदाच्या डेलिशियस जातीला पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. २००५ ते २००९ या प्राथमिक टप्प्यामध्ये नव्या रंगीत आणि स्पर प्रकाराचा जाती मिळवून, त्याची लागवड केली. त्याचे चांगले निष्कर्ष मिळताच, २०१० ते २०१८ या काळात शंभर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांच्या प्रात्यक्षिक चाचण्या घेण्यात आल्या. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमांची आखणी केली. त्यातून ४ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची प्रशिक्षणे घेण्यात आली. दरम्यानच्या काळामध्ये प्रात्यक्षिक प्रक्षेत्रामध्ये येणाऱ्या समस्या, अडचणी सोडवण्याकडेही केव्हीकेचे लक्ष होते. त्याच प्रमाणे योग्य त्या जातींचे मातृवृक्ष बागांचा विकास करण्यासाठीही मदत केली. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत

  • शेवटच्या टप्प्यामध्ये केव्हीकेने गाले गाला, स्कार्लेट स्पर, रेड चिफ या नव्या जातींचे ५० हजारांपेक्षा अधिक लागवड साहित्याचा पुरवठा केला.
  • पूर्वीच्या डेलिशियस जातींची झाडांची घनता ही ३०० झाडे प्रतिहेक्टर इतकी होती. तर, कॅनोपी कमी असल्याने नव्या स्पर जातींची घनता ६०० झाडे प्रतिहेक्टर सुचवण्यात आली. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये शास्त्रीय पद्धतीने बागांची उभारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना लागवड साहित्यांसह मदत करण्यात आली. उताराच्या जमिनीवर समतल कंटून पद्धतीने लागवड केली, तर दरी भागामध्ये शेतकऱ्यांना चौरस, आयताकृती किंवा षटकोनी पद्धती सुचवण्यात आली.
  • मोठ्या क्षेत्रावर लागवडीसाठी या नव्या रंगीत जातींची बड वूड बॅंक केव्हीकेने विकसित केली. त्यामुळे स्वस्तामध्ये लागवड साहित्य उपलब्ध होण्यास मदत झाली. त्याचप्रमाणे केव्हीकेने रंगीत सफरचंद जातींचे ४० हजार सायन काड्यांचा पुरवठा केला.
  • नियमित बहार येणाऱ्या आणि कमी थंडी आवश्यक असलेल्या जातींची हिमाचल प्रदेशातील मध्यम उंचीच्या प्रदेशात ओळख करून देण्यात आली. त्यामुळे नव्या जातींची लागवड वाढली.
  • पूर्वीच्या डेलिशियस जातीचे हेक्टरी सरासरी उत्पादन ७.७ टन होते. हेक्टरी उत्पन्न केवळ १.५९ लाख रुपये होते. नव्या जातीमुळे उत्पादन हेक्टरी १९.४ टनांपर्यंत पोचले आहे. नवीन स्पर प्रकारच्या जातीचे सरासरी निव्वळ उत्पन्न हेक्टरी ९.१६ लाख रुपये झाले.
  • स्पर प्रकाराचे नफा खर्च गुणोत्तर हे ३.९४ ते ५.४ पर्यंत राहिले.
  • शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या केंद्र शासनाच्या उद्दिष्टाला हिमाचल प्रदेशामशध्ये या नव्या रंगीत व स्पर जातीमुळे चालना मिळाली आहे.
  • परिणाम

  • सध्या नव्या जातींकडे २५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्र (९५०० हेक्टर) वळले आहे. परिणामी, पारंपरिक जातीच्या तुलनेमध्ये फळ उत्पादनात १५१ टक्क्यांनी वाढ झाली असून, निव्वळ उत्पन्नामध्ये ४७४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शेतकऱ्यांच्या जीवनशैली सुधारण्यासाठी याचा फायदा झाला आहे.
  • वाढलेल्या उत्पादनामुळे काढणी, प्रतवारी व अन्य कामांसाठी मजुरांची आवश्यकता वाढली. परिणामी, मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली आहे. शेतकरी, मजुरांचे व ग्रामीण भागातील युवकांचे स्थलांतर कमी होण्यात मदत झाली आहे.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com