मुंग्यांच्या वारुळातून मिळवली औषधी संयुगे !

मुंग्यांच्या वारुळातून मिळवली औषधी संयुगे
मुंग्यांच्या वारुळातून मिळवली औषधी संयुगे

ब्राझील आणि अमेरिकेतील संशोधकांनी प्रतिजैविकांना प्रतिकारकता विकसित केलेल्या बुरशींना मारण्याची क्षमता असलेले संयुग मुंग्यांच्या वारुळामध्ये सहजिवी पद्धतीने राहणाऱ्या जिवाणूंपासून वेगळे केले आहे. त्यामुळे विविध रोगांसाठी कारणीभूत बुरशींपासून संरक्षणासाठी योग्य ती औषधे विकसित करणे शक्य होणार आहे. अनेक जिवाणूंनी सूक्ष्मजीवविरोधी आणि बुरशी विरोधी प्रतिकारकता विकसित केली आहे. पूर्वी ज्या औषधांसाठी ते संवेदनशील होते, त्या विरोधात प्रतिकारकता विकसित केल्यामुळे जगभरातील सार्वजनिक आरोग्यांच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. अशा वेळी नव्या औषधांचा शोध घेण्याच्या उद्देशाने लहान कीटकांच्या शरीरातील सूक्ष्मजीवांचा अभ्यास करण्यात येत आहे. त्या संदर्भात २०१४ पासून ब्राझील आणि अमेरिका येथील संशोधकांद्वारे एक संशोधन प्रकल्प राबवला जात असून, त्याचे निष्कर्ष जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ सावो पावलोअंतर्गत रिबेईरावो प्रेटा स्कूल ऑफ फार्मास्युटीकल सायन्सेस येथील मोनिका टॅल्लारिको पुपो आणि अमेरिकेतील हार्वर्डे मेडिकल स्कूल येथील प्रो. जॉन क्लार्डी यांच्या नेतृत्त्वाखालील प्रकल्पामध्ये सिम्फोमायसीन वेगळे करण्यात आले आहे. त्याच्या मानवामध्ये विविध रोगांसाठी कारणीभूत असलेल्या व सध्याच्या औषधांसाठी प्रतिकारकता विकसित केलेल्या बुरशींवर प्रयोगशाळेत आणि प्रत्यक्षामध्ये चाचण्या घेण्यात आल्या. या औषधांच्या पेटंटसाठी अर्ज करण्याइतकी प्रगती झाल्याची माहिती पुपो यांनी दिली. या अभ्यासामध्ये पानांचे तुकडे करून त्यावर आपली बुरशींची शेती करणाऱ्या मुंग्यांच्या वारुळामध्ये सहजीवी पद्धतीने राहणाऱ्या जिवाणूंना वेगळे करून त्यापासून नैसर्गिक संयुगे मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनेक प्रतिजैविके हे मातीतील जिवाणूंपासून (विशेषतः स्ट्रेप्टोमायसीस गणातील) मिळवलेल्या संयुगातून तयार करण्यात येतात. संशोधकांनी या अभ्यासासामध्ये याच गटातील मात्र कीटकांच्या शरीरावर वाढणाऱ्या जिवाणूंवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांच्या गृहीकांनुसार हे जिवाणू कीटकांना अन्य सूक्ष्मजीवांपासून संरक्षणामध्ये मदत करतात. त्यामुळे ते माणसांनाही विविध रोगांपासून संरक्षणासाठी मदत करू शकतील. कीटकांवर वाढणाऱ्या जिवाणूंवर सातत्याने होत असलेल्या उत्क्रांती प्रचंड रेटा असल्याने त्यांची कार्यक्षमता अधिक असल्याचे गृहीतक मांडण्यात आले होते. असे झाले प्रयोग

  • अमेरिका, कोस्टा रिका आणि पनामा येथून विविध कीटकांतील जिवाणूंचे नमुने घेण्यात आले. या कीटकांमध्ये पानांचे तुकडे करणाऱ्या मुंग्या, फुलपाखरे, गांधीलमाश्या, मधमाश्या आणि पतंग अशा एकूण १४०० कीटकांचा समावेश होता. पुपा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये केरार्डो परिसर अटलांटिक वर्षावन आणि ॲमेझॉन बाईम्स येथील ३०० पेक्षा अधिक मुंग्यांच्या वसाहतीतून नमुने घेण्यात आले. विद्यापीठाच्या कॅम्पसमधील सिम्फोमायर्मेक्स प्रजातीतील मुंग्यांतून सिम्फोमायसिन वेगळे करण्यात आले.
  • कीटकांच्या शरीरावरील जिवाणू वेगळे करून त्याची शुद्ध स्वरूपामध्ये प्रयोगशाळेत वाढ करण्यात आली. त्याच्या प्रयोगशाळेतच माणसांमध्ये रोगकारक अशा सूक्ष्मजीवांविरोधात चाचण्या करण्यात आल्या. त्यातून कार्यक्षम प्रजाती ओळखून त्यांच्या चयापचयाचे विश्लेषण केले गेले.
  • या जिवाणूंद्वारे संयुगांचे विश्लेषण केमोमेट्रिक्स आणि लिक्विड क्रोमॅटोग्राफी या तंत्रासह मास स्पेक्ट्रोमेट्रीद्वारे करण्यात आले. त्यातून मातीतील जिवाणूंपेक्षा वेगळी संयुगे तयार करणाऱ्या कीटकांच्या शरीरावरील स्ट्रेप्टोमायसीस प्रजाती वेगळ्या करण्यात आल्या.
  • त्यांच्या पुन्हा प्रयोगशाळेत चाचण्या घेतल्या गेल्या. त्यातून सिम्फोमायसीन हे जिवाणूंच्या विरोधामध्ये तितकेसे उपयुक्त नसले तरी अॅस्परजिलस फुमिगॅटससारख्या बुरशीविरोधी चांगल्या प्रकारे काम करत असल्याचे आढळले. ही बुरशी रुग्णालयांमध्ये विविध प्रादुर्भावासाठी कारणीभूत मानली जाते. बुरशींनी प्रतिकारकता विकसित केल्यामुळे औषधोपचारानंतपही या रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूचा दर ८५ टक्क्यांइतका मोठा आहे.
  • प्रयोगशाळेतील प्राण्यांवर केलेल्या प्रयोगांमध्ये सिम्फोमायसीन हे कॅन्डीडा ग्लॅब्राटा आणि कॅन्डीडा ऑरिससारख्या बुरशींच्या प्रादुर्भावाविरुद्धही चांगले काम करत असल्याचे आढळले. माणसांमध्येही आढळणाऱ्या या रोगकारक बुरशींमुळे कॅन्डीडिओसिस हा रोग होतो. या बुरशी सध्याच्या अनेक औषधांना प्रतिकारक झाल्या आहेत.
  • या प्रकल्पामध्ये अन्य काही संयुगे वेगळी करण्यात आली असली तरी, त्याविषयी अद्याप या टप्प्यावर भाष्य करण्यात आलेले नाही.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com