पहिल्या सजीवाची निर्मिती समुद्रात नव्हे, तर तलावात!

पहिल्या सजीवाची निर्मिती समुद्रात नव्हे, तर तलावात!
पहिल्या सजीवाची निर्मिती समुद्रात नव्हे, तर तलावात!

पूर्वी ही सुरवात सागरामध्ये झाल्याचे मानले जात होते. मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील संशोधकांच्या अभ्यासामध्ये उथळ पाण्यामध्ये (सुमारे १० सेंमी खोल) सजीवांच्या निर्मितीसाठी महत्त्वाच्या पोषक घटकांची (नायट्रोजन) तीव्रता अधिक असल्याचे नोंदविले आहे. पृथ्वीवरील पहिल्या सजीवाची निर्मिती ही प्राथमिक तलावांमध्ये झाल्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे नव्या संशोधनात पुढे आले आहे. उथळ डबक्यांमध्ये ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये नायट्रोजनची उपलब्धता होती. याची अन्य घटकांबरोबर प्रक्रिया होण्याची संधी सर्वाधिक असून, त्यातून पहिल्या सजीवांच्या निर्मितीला चालना मिळाली. अधिक खोल समुद्रामध्ये नायट्रोजनच्या प्रक्रिया होण्यासाठी तितकी योग्य स्थिती उपलब्ध असण्याची शक्यता फारशी दिसत नसल्याचे मत संशोधकांनी मांडले आहे. एमआयटीचे संशोधक सुक्रित रंजन यांनी सांगितले, की जर अनेक संशोधक म्हणतात त्याप्रमाणे जीवनाच्या सुरवातीसाठी स्थिर स्वरूपातील नायट्रोजनची आवश्यकता असेल, तर जीवनाची निर्मिती सागरामध्ये होणे अत्यंत अवघड बाब आहे. त्याऐवजी एखाद्या उथळ तलावामध्ये होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. रंजन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले संशोधन जर्नल जियोकेमिस्ट्री, जियोफिजिक्स, जियोसिस्टिम्समध्ये प्रकाशित केले आहे. 

बंध तोडण्यासाठी विजा...

  •  नायट्रोजन आधारीत प्रक्रियांचा समावेश असलेल्या प्राथमिक जीवनाची सुरवात ही दोन प्रकारे झाल्याचे संशोधक मांडतात. पहिल्या गृहितकानुसार ही प्रक्रिया खोल समुद्रामध्ये नायट्रोजनस ऑक्साईड उपलब्ध असलेल्या ठिकाणी घडली. या घटकांची प्रक्रिया पाण्यामध्ये बुडबुड्याच्या स्वरूपामध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साईडशी होऊन जीवनांची पहिली मूलद्रव्ये तयार झाल्याचे मांडले जाते.
  •  दुसऱ्या गृहितकानुसार जीवनाच्या निर्मितीमध्ये आरएनए (रायबोन्युक्लिक अॅसिड) हे मूलद्रव्य मुक्त स्वरूपामध्ये होते. आज संपूर्ण जनुकीय माहितीसाठी आरएनए ओळखले जातात. त्याचा नायट्रोजनस ऑक्साईडशी संपर्क होऊन रासायनिक प्रक्रियेतून जीवनाची पहिली साखळी निर्माण झाल्याचे मानले जाते. आरएनए निर्मितीची ही प्रक्रिया एकतर समुद्रामध्ये किंवा उथळ तलाव, डबक्यामध्ये शक्य आहे.
  •  वातावरणातील नायट्रोजनमध्ये दोन अणू असून ते तिहेरी ताकदवान बंधाने बांधलेले असतात. हे बंध अतितीव्र स्वरुरूपाच्या ऊर्जेद्वारे (उदा. विजा चमकणे) तोडले जाऊ शकतात. त्यातून नायट्रोजनस ऑक्साईड्स तयार होऊन पावसासोबत पाण्यामध्ये मिसळते. संशोधकांच्या अंदाजानुसार सुरवातीच्या काळामध्ये वातावरणामध्ये अशा स्वरूपाच्या विजांचे प्रचंड थैमान सुरू असावे. त्यातून जीवनाच्या निर्मितीसाठी आवश्यक व तुलनात्मक स्थिर असा नायट्रोजनस ऑक्साईड तयार झाला. काही संशोधनामध्ये पाण्यातील नायट्रोजनस ऑक्साईडचे बंध सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे तुटले असावेत. सागरी दगडातून विरघळलेल्या लोहाचे मिश्रण त्यात झाले असावे. मात्र, या दोन्ही प्रकारातून तयार झालेला नायट्रोजनस ऑक्साईडचा मोठा भाग समुद्रामध्ये नष्ट झाला असावा, असे मत रंजन मांडतात.
  •  समुद्रामध्ये ही प्रक्रिया घडण्याएवढी तीव्रता तयार होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचेही त्यांचे मत आहे. ही प्रक्रिया घडणे १० ते १०० सेंमी खोली, १० वर्गमीटर व त्यापेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या उथळ तलाव किंवा डबक्यांमध्ये अधिक शक्य आहे. उदा. अंटार्क्टिकामधील डॉन ज्युआन पॉंड. याची खोली उन्हाळी हंगामामध्ये १० सेंटिमीटर इतकी असते. ३.९ अब्ज वर्षापूर्वी पहिल्या सजीवाच्या अवतरणापूर्वी पृथ्वीवर सर्वत्र ५०० वर्गकिलोमीटर क्षेत्राचे उथळ तलाव असावेत. आजच्या अल्प आकाराच्या तलावाशी सध्या तुलना करून चालणार नाही.
  •  सजीवाची निर्मिती सुमद्रामध्ये झाली की तलावामध्ये याविषयीचा वाद सुरूच राहणार असला तरी पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक सशक्त पुरावे उपलब्ध होऊ शकतात. त्यातील एक पुरावा आमच्या संशोधनामध्ये असल्याचा दावा रंजन करतात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com