युरोपियन जैवनियंत्रण प्रयोगशाळेची शताब्दी साजरी

युरोपियन जैवनियंत्रण प्रयोगशाळेची शताब्दी साजरी
युरोपियन जैवनियंत्रण प्रयोगशाळेची शताब्दी साजरी

फ्रान्स येथील मॉन्टेपेल्लियर येथील युरोपियन जैवनियंत्रण प्रयोगशाळेला ५ एप्रिल रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. पिकावरील किडी व शेतीमध्ये येणाऱ्या तणांच्या नैसर्गिक शत्रूंची मदत नियंत्रणासाठी घेण्याच्या पद्धतींच्या शास्त्रीय अभ्यासाला त्यामुळे सुरवात झाल्याचे मानले जाते. १९१९ मध्ये फ्रान्स येथील आऊच येथे युरोप, युरेशिया आणि आफ्रिकेतील पिकांवर येणाऱ्या किडींच्या नैसर्गिक शत्रूंचा शोध घेण्यासाठी प्रयोगशाळेचे उभारणी करण्यात आली. १९५९ मध्ये या प्रयोगशाळेच्या उद्दिष्टांमध्ये हानिकारक ठरणाऱ्या तणांचाही समावेश करण्यात आला. खास तणांवर अभ्यास करण्यासाठी रोम, इटली येथे उपकेंद्र उभारण्यात आले. पुढे काळाच्या ओघामध्ये प्रयोगशाळेचे स्थलांतर आऊच ते हायारेस आणि पुढे पॅरीसच्या परसिरातील विविध ठिकाणी करावे लागले. १९९१ मध्ये दक्षिण फ्रान्स येथील किनाऱ्यावरील प्रदेशातील मॉन्टेपेल्लियर येथे आणण्यात आले. १९१९ मध्ये मका व अन्य पिकांवर त्रासदायक ठरणाऱ्या युरोपियन कॉर्न बोअरर किडीच्या जैविक नियंत्रणासाठी प्रयत्न करण्यात आले. पुढे या यादीमध्ये विविध किडींचा समावेश झाला. फ्रेंच ब्रुम, यलो स्टार थिसल, वेन्टेनाटा, मेडूसा हेड आणि जायंट रिड यांसारख्या तणांच्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू झाले. याविषयी माहिती देताना अमेरिकी कृषी संशोधन सेवेतील प्रशासक चावोन्डा जॅकोब्स- यंग यांनी सांगितले, की जागतिकीकरणामुळे व्यापार आणि वाहतूक वाढत गेल्याने किडींचाही प्रसार वेगाने वाढत गेला. वेगवेगळ्या देशामध्ये किडींचा अंतर्भाव झाला असला तरी त्यांच्यावर उपजीविका करणाऱ्या नैसर्गिक शत्रू नसल्याने नव्या देशांमध्ये वाढ वेगाने झाली. त्याचा फटका स्थानिक पिकांना आणि प्राण्यांनाही बसला. शंभर वर्षांपूर्वी जैविक कीडनियंत्रणाचे महत्त्व जाणून शास्त्रीय अभ्यासाला सुरवात करणाऱ्या युरोपियन जैवनियंत्रण प्रयोगशाळेची आठवण ठेवणे आवश्यक आहे. ते स्वतः स्टिव्हन काप्पेस, सिमॉन हान्सिन्सन यांच्यासह मॉन्टेपेल्लियर येथील कार्यक्रमांसाठी हजर होते. सध्या सुरू असलेले प्रकल्प व त्याचे फायदे ः

  • ही प्रयोगशाळा दोन हेक्टर क्षेत्रामध्ये १९३७५ वर्गफूट बांधकामासह पसरलेली आहे. हा भाग अॅग्रोपोलिस इंटरनॅशनल यांच्या अंतर्गत येत असून, कृषी संशोधन आणि प्रशिक्षणांचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते. प्रयोगशाळेच्या संशोधकांमध्ये अमेरिका, फ्रान्स, ग्रीस येथील संशोधकांचा समावेश असून, विविध प्रकल्पांमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांची मदत घेण्यात येते.
  • परोपजिवी गांधीलमाशी (ॲनागायरस कमाली यासारख्या वास्प) सोडल्यामुळे जास्वंदांवरील पिठ्या ढेकणांचे जैविक नियंत्रण शक्य झाले. त्यातून अमेरिकेतील पिकांचे वार्षिक ७०० दशलक्ष डॉलर नुकसान टाळणे शक्य झाले. दुसरी गांधीलमाशी सेयूडोकोक्की प्रसारित केल्यामुळे कॅलिफोर्निया येथील वेलीवरील पिठ्या ढेकणांच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांच्या वापराचे प्रमाण १५ टक्क्याने कमी राखणे शक्य झाले.
  • १९८० मध्ये परजिवी आणि भक्ष्यक कीटक सोडल्यामुळे अल्फाअल्फा भुंगेऱ्यांचे जैवनियंत्रण शक्य झाले. या किडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांचे प्रमाणे ९५ टक्क्याने कमी झाले असून, प्रतिवर्ष सुमारे १०० दशलक्ष पेक्षा अधिक बचत झाली आहे.
  • २००९ मध्ये गांधीलमाश्या, पाने पोखरणाऱ्या मिशमाशी आणि खवले किडींचे टेक्सास परिसरामध्ये प्रसारण करण्यात आले होते, त्यामुळे पाण्यामध्ये वाढणाऱ्या जायंट रिड या तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली.
  • जागतिकीकरणामध्ये किडी आणि तणांसाठी कोणतेही अडथळे राहिलेले नाहीत. एकेकाळी स्थानिक असलेल्या किडी आता अन्य देशांमध्ये उग्र रूप धारण करत आहेत. अशा वेळी सामूहिक पातळीवर संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. त्यात जैविक कीडनियंत्रणासारख्या शाश्वत पद्धती अत्यंत मोलाच्या ठरणार असल्याचे मत प्रयोगशाळेचे संचालक डॉन गुंडरसन- रिन्डाल यांनी व्यक्त केले.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com