नायट्रस ऑक्साइड नष्ट करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंची यंत्रणा ओळखली

 नायट्रस ऑक्साइड नष्ट करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंची यंत्रणा ओळखली
नायट्रस ऑक्साइड नष्ट करणाऱ्या उपयुक्त जिवाणूंची यंत्रणा ओळखली

पूर्व अँगलिया विद्यापीठातील संशोधकांनी मातीतील जिवाणूंद्वारे विकसित होणारे नायट्रस ऑक्साइड नष्ट करणारे विकर व त्यातील यंत्रणेचा शोध घेतला आहे. सध्या नायट्रस ऑक्साइड हा जागतिक तापमानवाढीबरोबरच ओझोनच्या थरावर परिणाम करणारा वायू असून, त्याच्या नियंत्रणासाठी सातत्यपूर्ण संशोधन केले जात आहे. संशोधनाचे हे निष्कर्ष ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’च्या ‘जर्नल केमिकल सायन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. नायट्रस ऑक्साइड या हसवणाऱ्या वायूसोबत कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेनचे उत्सर्जन कमी करण्याकडे जागतिक समुदायाचे लक्ष आहे. त्यातही नायट्रस ऑक्साइडमध्ये तापमानवाढीची कार्बन डाय-ऑक्साइडच्या ३०० पट अधिक क्षमता असल्याचे मानले जाते. हा वायू वातावरणामध्ये सुमारे १२० वर्षांपर्यंत टिकून राहतो. त्याचे प्रमाण एकूण हरितगृह वायूच्या ९ टक्के भरते. हा वायू ओझोनचा थर नष्ट करण्यामध्ये नुकतीच बंदी आलेल्या क्लोरोफ्लोरोकार्बनइतकाच जहाल आहे. कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या नायट्रोजनयुक्त खतांच्या ऱ्हास आणि विघटनातून नायट्रस ऑक्साइडचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याविषयी माहिती देताना पूर्व अॅंगलिया विद्यापीठातील रसायनशास्त्र विद्यालयातील प्रो. निक ले ब्रुन यांनी सांगितले, की जेव्हा ऑक्सिजनची कमतरता असेल, त्या वेळी काही जिवाणू श्वसनासाठी नायट्रस ऑक्साइड वापरत असल्याचे ज्ञात आहे. या जिवाणूंची क्षमता ही पूर्णपणे नायट्रस ऑक्साइड रिडक्टोज या नावाच्या विकरामुळे असते. हे विकर वातावरण बदलासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वायूंच्या नियंत्रणासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते, त्यामुळे मातीतील जिवाणू नेमके कशा प्रकारे या विकराचा वापर करतात, याविषयी माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला.

  • या विकराचा जो भाग नायट्रस ऑक्साइडचा वापर करतो, त्याला कार्यक्षम विभाग असे जीवशास्त्रामध्ये समजले जाते. त्यामध्ये तांबे आणि सल्फरची गुंतागुंतीची रचना असते. आतापर्यंत जिवाणूंद्वारे हा विभाग कशा प्रकारे कार्यान्वित होतो, हे माहीत नव्हते. त्यामागील प्रथिन NosL शोधण्यात यश आले. या प्रथिनांच्या निर्मितीसाठी तांबे आणि सल्फाइड क्लस्टर आवश्यक असते.
  • ज्या जिवाणूमध्ये NosL हे प्रथिन नसते, तेही विकराची निर्मिती करत असले, तरी त्यामध्ये तांबे आणि सल्फाइड कार्यान्वित विभाग असत नाही. जेव्हा हाच जिवाणू तांब्याच्या कमतरतेच्या स्थितीमध्ये वाढवला असता, त्यातील हा कार्यान्वित विभाग संपूर्ण नसल्याचे दिसून आले.
  • NosL हा तांब्याला बांधून ठेवणारे प्रथिन असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. तसेच, त्याला तांबे घटकाचा पुरवठा करताच तो आपल्या संरचनेमध्ये आवश्यक ते बदल करून घेतो.
  • संशोधकांचे मत... १) प्रो. ले ब्रुन यांनी सांगितले, की नायट्रस ऑक्साइडच्या विघटनाच्या दिशेने योग्य अशी ठिकाणे तयार करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. या विकराची संरचना योग्य प्रकारे न झाल्यास उलट त्यातून नायट्रस ऑक्साइड तयार होऊन वातावरणामध्ये मिसळत राहण्याचा धोका आहे. २) ब्रुन यांचे सहकारी डॉ. अँण्डी गेट्स यांच्या मते, लोकांमध्ये कार्बन डाय-ऑक्साइडबाबत पुरेशी जागृती निर्माण झालेली आहे. मात्र, त्या तुलनेमध्ये नायट्रस ऑक्साइडचा धोका जागतिक पातळीवर वाढत असतानाही जागरुकता नाही. संशोधकांमध्येही यासाठी खास कौशल्यांची आवश्यकता आहे. नायट्रस ऑक्साइडला नष्ट करण्यासंबंधीच्या विकरांविषयी अधिक माहिती मिळवण्याची आवश्यकता आहे.  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com