नत्र कमतरतेत मुळांच्या वाढीसाठी कार्यरत घटकांचा घेतला शोध

नत्र कमतरतेत मुळांच्या वाढीसाठी कार्यरत घटकांचा घेतला शोध
नत्र कमतरतेत मुळांच्या वाढीसाठी कार्यरत घटकांचा घेतला शोध

जमिनीमध्ये नत्राची कमतरता असताना नत्राची पूर्तता करण्यासाठी वनस्पतींच्या मुळांची वाढ व विकास मोठ्या प्रमाणात होतो. या मागे कार्यरत संप्रेरकांचा शोध लेईब्निझ वनस्पती जनुकशास्त्र आणि पीक संशोधन संस्थेतील संशोधकांनी घेतला आहे. हे संशोधन ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. सामान्यतः वनस्पतींना तग धरण्यासाठी जमिनीतील पोषक घटकांच्या प्रमाणानुसार आपल्या मुळांच्या वाढ आणि विकासावर अवलंबून राहावे लागते. वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची ही क्षमता त्यांच्या तग धरण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. नत्राची कमतरता असलेल्या स्थितीमध्ये मुख्य मुळांची लांबी, तर उपमुळांचे दूरपर्यंत पसरणे ही बाब प्राधान्याने दिसून येते. नत्राच्या कमतरता असताना वनस्पती करत असलेल्या बदलांना प्रामुख्याने अन्न मिळण्याचे धोरण म्हणून पाहिले जाते. अगदी अलीकडेपर्यंत मुळांच्या नत्रावर आधारित प्रतिक्रियांविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती. लेईब्निझ इन्स्टिट्यूट ऑफ प्लॅंट जेनेटिक्स अॅण्ड क्रॉप प्लॅंट रिसर्च, गॅटर्स्लेबेन येथील संशोधकांनी मुळांच्या नत्र कमतरतेमध्ये विकसित होत असलेल्या गुणधर्मांमागील संप्रेरकांच्या मार्गांचा अभ्यास केला आहे. याचा फायदा नत्राचे शोषण चांगल्या प्रकारे करणाऱ्या जातींची पैदास करणे शक्य होणार आहे. असे आहे संशोधन जमिनीमध्ये पिकासाठी उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांचे प्रमाण हे मातीतील आर्द्रता आणि सूक्ष्मजीवांच्या प्रक्रिया यावर अवलंबून असते. अन्नद्रव्याच्या स्थितीची माहिती वनस्पतींना होऊन, त्यानुसार मुळांच्या वाढीला, विकासाला चालना दिली जाते. वनस्पतींची ही प्रतिक्रिया मुळांच्या तंतूची संख्या, वाढ, त्याची दिशा यातून उमटते. वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वाधिक लागणाऱ्या घटकांमध्ये नत्र (नायट्रोजन)चा समावेश आहे. जेव्हा या नत्राची जमिनीमध्ये कमतरता असते, त्या वेळी वनस्पतींना कमतरता भासू लागल्यानंतर नत्राचे प्रमाण अधिक असलेल्या जमिनीकडे मुळांची वाढ होऊ लागते. मुळांच्या वाढीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा ही प्रामुख्याने नत्रावर आधारित असल्याचे पूर्वी अज्ञात होते. संशोधक प्रो. एन. व्होन वायरेन यांनी नुकत्याच केलेल्या संशोधनामध्ये मुळांच्या कमी नत्राच्या स्थितीमध्ये अन्नद्रव्याच्या शोषणामध्ये कार्यरत असलेल्या विशिष्ठ स्टिरॉईड संप्रेरकांचा शोध घेतला आहे. त्यांनी अर्बिडॉप्सिस थॅलिना या प्रारूप वनस्पतींची वाढ नत्राची किचिंत कमतरता असलेल्या जमिनीमध्ये केली होती. त्यानंतर या वनस्पतींचा जनुकीय नकाशा मिळविण्यासाठी प्रो. टी. अल्टमॅन यांच्या गटाने काम सुरू केले. या जनुकीय माहितीमध्ये बीएसके ३ हे ब्रासिनोस्टिरॉईड कार्यान्वित होण्यासोबत मुळांच्या वाढीचा संबंध असल्याचे दिसून आले. अत्यंत कमी प्रमाणात नत्राची कमतरता भासली तरी हे संप्रेरक कार्यान्वित होत असून, सोबतच बीएके १ या सहसंप्रेरकालाही कार्यान्वित करत असल्याचे आढळले. संशोधनाचे फायदे ः वनस्पतीच्या वाढीमध्ये मोठी भूमिका निभावणाऱ्या या घटकांचे कृषी क्षेत्रामध्ये उत्पादन वाढीसाठी मोठा फायदा होऊ शकतो. कारण, सध्या जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक होणे, आम्लता वाढणे यामुळे नत्राची कमतरता मोठ्या प्रमाणात भासू शकते. अशा जमिनींसाठी व्यावसायिक पिकांच्या खास जातींची निर्मिती करावी लागणार आहे. त्याचप्रमाणे खतांचे प्रमाण कमी लागणाऱ्या वनस्पतींची निर्मिती करण्यासाठी बीएसके ३ हे नियंत्रक संप्रेरक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com