तेल प्रदूषित मातीची सुपीकता मिळवण्यासाठी तंत्र विकसित

तेल प्रदूषित मातीची सुपीकता मिळवण्यासाठी तंत्र विकसित
तेल प्रदूषित मातीची सुपीकता मिळवण्यासाठी तंत्र विकसित

राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी तेलांच्या प्रदूषणामुळे नापीक झालेल्या मातीला सुपीक करण्यासाठी पायरॉलिसिस तंत्रज्ञानामध्ये अचूकता आणली आहे. तेलातील विषारी हायड्रोकार्बन काढून टाकणे शक्य होते. या मातीमध्ये हायड्रोकार्बनच्या विषारीपणासाठी संवेदनशील असलेले लेट्यूसचीही वाढ उत्तम होत असल्याचे प्रयोगशाळेतील प्रयोगात आढळले आहे. या पायरॉलिसिस प्रक्रियेत निर्माण होणारी धूलिकणही आरोग्यासाठी हानीकारक नसल्याचे प्रयोगात दिसून आले. एकूण ही प्रक्रिया आता अधिक शाश्वत झाली असल्याचा दावा राईस विद्यापीठातील अभियंत्यांनी केला आहे. हे संशोधन ‘अमेरिकन केमिकल सोसायटी’चे ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी’मध्ये प्रकाशित करण्यात आले. खनिज तेलाच्या प्रदूषणामुळे जमिनी खराब आणि नापीक होतात. यावर राईस विद्यापीठातील अभियंते क्यरिकोज झॅगोरस्कीज आणि पेड्रो अल्वारेझ यांच्यासह सहकाऱ्यांनी पायरॉलिसिस तंत्रज्ञानाने मार्ग काढला आहे. त्यांनी पायरॉलिसिस प्रक्रियेमध्ये अचूकता आणली आहे. या तंत्रामध्ये मातीमध्ये ऑक्जिजनविरहित अवस्थेत किंचितशी तापवली जाते. नव्या प्रक्रियेमुळे हायड्रोकार्बन जळण्यातून मातीच्या सुपीकतेवर होणारा परिणाम रोखणे शक्य होते. याविषयी माहिती देताना अल्वारेझ यांनी सांगितले, की तेल काढण्याच्या प्रक्रियेमध्ये सागरी भागामध्ये तेलांचा तवंग दिसतात. त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले जात असले, तरी ९८ टक्के ऑईल स्पील्स हे प्रामुख्याने जमिनीवर असतात. पर्यावरण रक्षण संस्थेद्वारे असे २५ हजारांपेक्षा अधिक स्पिल्स एका वर्षात नोंदवले होते. म्हणजे एवढ्या मोठ्या भागामध्ये मातीमध्ये तेलाचे प्रदूषण होते. ते दूर करून मातीची सुपीकता वाढवण्यासाठी स्वस्त असा पर्याय आवश्यक होता. झॅगोरस्कीज यांच्या दिलेल्या माहितीनुसार, मातीची सुपीकता टिकवण्यासाठी त्यातील चिकणपणा जपावा लागतो. ही चिकणमाती पाणी धरून ठेवते. मात्र, मातीचे तापमान वाढवल्यास आपण त्यातील चिकणपणा नष्ट करून टाकतो. मातीचे तापमान ५०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाल्यास, त्यात पाणी टिकून राहणे अवघड होते. या समस्येवर मात करण्यासाठी संशोधकांनी हेर्ने (टेक्सास) येथून मातीचे नमुने घेऊन, ते क्रूड तेलाच्या साह्याने प्रदूषित केले. त्यातील तेलाचे प्रदूषण कमी करण्यासाठी दिलेल्या विविध तापमानाचे काय परिणाम होतात, याचा अभ्यास केला. यासाठी लागलेल्या कालावधीचेही मोजमाप केले. फिरत्या ड्रममध्ये मातीच्या नमुन्यांना ४२० अंश सेल्सिअस तापमान १५ मिनिटांसाठी ठेवण्यात आले. मातीतील एकूण पेट्रोलियम हायड्रोकार्बन (टीपीएच) ९९.९ टक्के कमी झाले आणि पॉलिसायक्लिक अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन (पीएएच) ९४.५ टक्के कमी झाले.

  • पुढे याच संशोधक गटाने प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यासाठी पायरोलिसिस तंत्रामध्ये आवश्यक त्या सुधारणा केल्या. त्यामुळे अवांछित हायड्रोकार्बनचे कोळशांमध्ये रूपांतर होते. जमीन जवळपास पुन्हा पहिल्यांप्रमाणे सुपीक होते.
  • झॅगोरस्कीज यांनी सांगितले, की तेलाच्या प्रदूषण कमी करण्यासाठी उष्णता देण्याची प्रक्रिया जुनीच असली, तरी त्यातील अचूकता साधण्यामध्ये आम्हाला यश आले. रिअॅक्टरमध्ये सातत्यपूर्ण पायरॉलिसिस तंत्राद्वारे टीपीएच वेगाने कमी करणे शक्य झाले. अन्य प्रक्रियांच्या तुलनेमध्ये ऊर्जेमध्ये बचत शक्य झाली. अशा प्रकारे प्रक्रिया केलेल्या मातीमध्ये पालकाचे (लेट्यूस) उत्पादनही चांगले मिळत असल्याचे दिसून आले.
  • मातीवर तापमानाचे असे होतात परिणाम ः

  • मातीचे तापमान ४२० अंश सेल्सिअसऐवजी ४७० अंश सेल्सिअस ठेवल्यास प्रदूषक काढण्याचे प्रक्रिया वेगाने होते. मात्र, या प्रक्रियेमध्ये अधिक ऊर्जा लागते आणि मातीची सुपीकता मोठ्या प्रमाणात कमी होते. ही सुपीकता पुन्हा प्राप्त करणे शक्य होते.
  • २०० ते ३०० अंश सेल्सिअम तापमानामध्ये हलके संप्लवनशील पदार्थांचे बाष्पीभवन होते.
  • ३५० ते ४०० अंश सेल्सिअस तापमान मातीला दिल्यानंतर प्रथम मातीतील हेटेरोअॅटम बंध तुटण्यास सुरवात होते. त्यानंतर कार्बन-कार्बन आणि कार्बन - हायड्रोजन बंधामध्ये रासायनिक अभिसरण वेगाने होते. त्यातून अधिक जड हायड्रोकार्बनचे रूपांतर स्थिर, कमी कार्यक्षम अशा कोळशामध्ये होते.
  • मातीसोबतच मानवी आरोग्यासाठी फायदेशीर.. प्रदूषण कमी केलेल्या मातीसह विविध मातींच्या प्रकारामध्ये पेट्रोलियम पदार्थांसाठी संवेदनशील असलेल्या काळ्या बियांच्या लेट्यूसची लागवड केली. त्यात प्रक्रिया केलेल्या मातीमध्ये बियांचे उगवण सावकाश झाली, तरी २१ दिवसांनंतर त्यांची वाढ नुसत्या पाणी आणि खतांचा पुरवठा केला असता चांगली झाली. या सर्व मातीमध्ये साध्या पाण्याच्या वापरामध्ये उगवण दर आणि संपूर्ण वाढीनंतरचे वजन सारखेच होते. हे सारे खरे असले तरी मातीतील विषारी घटकांचे प्रमाण कमी करण्यात या प्रक्रियेद्वारे यशस्वी झालो का, असा प्रश्न घेऊन राईस संशोधकांची गट बायलोर वैद्यकीय महाविद्यालयातील प्रो. भागवाटूला मूर्ती यांच्याकडे गेला. त्यांचा प्रदूषक घटकांमुळे शरीरात होणाऱ्या विकृतीसंदर्भात अभ्यास आहे. मूर्ती यांच्या प्रयोगशाळेमध्ये तेलांने प्रदूषित मातीतील अर्कांचे मानवी फुफ्फुसाच्या पेशीवर होणारे परिणाम तपासण्यात आले. ते फुप्फुसातील पेशींसाठी विषारी ठरतात. मात्र, अशाच पेशींवर प्रक्रिया केलेल्या मातीच्या अर्काचे वाईट परिणाम दिसून आले नाहीत. यामुळे पायरोलिसिस प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या धुळीच्या कणांचेही परिणाम मानवी आरोग्यासाठी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com