कमी कर्बयुक्त आहार आरोग्यासह पर्यावरणासाठीही चांगला

कमी कर्बयुक्त आहार आरोग्यासह पर्यावरणासाठीही चांगला
कमी कर्बयुक्त आहार आरोग्यासह पर्यावरणासाठीही चांगला

अमेरिकेतील तुलाने आणि मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी १६ हजारांपेक्षा अधिक अमेरिकन लोकांचे सर्वेक्षण केले असून, त्यातून रोजच्या आहाराचे कर्ब पदचिन्ह (कार्बन फूट प्रिंट) मिळवले आहे. हे संशोधन ‘अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशन’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. रोजच्या आहारामध्ये कमी कार्बन फूटप्रिंटयुक्त आहार घेतल्यास केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर आरोग्यासाठीही चांगला फायदा होत असल्याचे मत व्यक्त केले आहे. अन्नाच्या उत्पादनातून ऊत्सर्जित होणाऱ्या हरितगृह वायूंचा विचार करण्याची आवश्यकता संशोधकांना वाटत आहे. कारण अन्नाच्या उत्पादनातून निर्माण होणाऱ्या हरितगृह वायूंमुळे वातावरणातील बदलांना मोठी चालना मिळते. याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी तुलाने विद्यापीठ आणि मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी एकत्रितरीत्या अमेरिकन लोकांच्या दैनंदिन आहाराच्या निवडीच्या परिणामांचा अभ्यास केला आहे. त्यांनी अन्न उत्पादनातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनाविषयी प्रचंड माहिती साठा मिळवला असून, त्याची सांगड प्रत्यक्ष लोकांच्या सर्वेक्षणाशी घातली आहे. या सर्वेक्षणामध्ये सर्वसामान्य अमेरिकन २४ तासांमध्ये काय काय खातात, याविषयीचे प्रश्न विचारण्यात आले होते. सर्वेक्षणाविषयी माहिती देताना सार्वजनिक आरोग्य आणि उष्णकटिबंधीय औषधी विद्यालयातील पोषकता आणि अन्न सुरक्षितता विभागातील प्रा. दियागो रोज यांनी सांगितले, की ज्यांच्या आहारामध्ये लाल मांस (रेड मीट) आणि दुग्धजन्य उत्पादनाचे प्रमाण कमी असते, त्यांचा आहार हा कमी कार्बन फूटप्रिंटचा असतो. तसेच लाल मांस आणि डेअरी उत्पादनामध्ये उच्च संपूक्त मेद असून, त्यातून हरितगृह वायूही मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होत असतात. त्याऐवजी पोल्ट्री, संपूर्ण धान्य आणि वनस्पतीजन्य प्रथिनांचा वापर करणाऱ्या लोकांचे आरोग्यही उत्तम राहते.

  • प्रति १००० कॅलरीसाठी ऊत्सर्जित होणाऱ्या हरितगॉह वायूंच्या प्रमाणानुसार खाद्यपदार्थांचा क्रम लावला. त्याचे पाच समान भाग गेले. त्यानंतर ग्रहण केलेल्या अन्नांच्या पोषकतेचे मूल्य नोंदवण्यात आले. त्याची तुलना अमेरिकी आरोग्यदायी खाण्याच्या निर्देशांकांशी करून, किमान आणि कमाल परिणाम करणारे गट वेगळे केले.
  • किमान कार्बन फूटप्रिंट अंतर्गत गटातील लोकांचे आहार हा निर्देशांकानुसार आरोग्यादायी गटात मोडत होता. अर्थात, यातील काही घटक उदा. साखर आणि अधिक पॉलिश केलेली धान्ये ही जर कमी कर्बवायू उत्सर्जित करत असली, तरी त्यात आरोग्यासाठी आवश्यक घटकांचे प्रमाण कमी होते. तसेच लाल मांस आणि दुग्धजन्य उत्पादनांचा आहारात समावेश नसल्यामुळे लोह, कॅल्शिअम आणि ड जीवनसत्त्वाचे प्रमाणही कमी आढळले.
  • मात्र, एकूण विचार करता कमी परिणाम करणाऱ्या गटातील लोकांचा आहार हा काही कमतरता वगळता तुलनेने अधिक पोषक होता. रोज यांच्या मते, कोणताही आहार हा अत्यंत गुंतागुंतीच्या अनेक अन्नपदार्थांच्या एकत्रीकरणातून तयार होतो. त्याचा पोषकतेचा दर्जा आणि पर्यावरणावरील परिणाम अशा दृष्टीने विचार केला गेला पाहिजे.
  • पाचपैकी अधिक परिणाम करणाऱ्या आहारातून होणारे ऊत्सर्जन हे कमी परिणाम करणाऱ्या आहाराच्या पाचपट होते.
  • पर्यावरणावर अधिक परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये मांस ( गोमांस, वराह मांस व अन्य लाल मांस), डेअरी उत्पादने आणि घन मेद यांचे प्रमाण प्रति १००० कॅलरीने अधिक होते. त्यात प्राणीज प्रथिनांचे प्रमाण अधिक होते.
  • २० टक्के अमेरिकन लोकांमुळे एकूण अमेरिकेच्या आहारविषयक कर्बवायू उत्सर्जनाच्या सुमारे निम्मेइतके प्रमाण होते.
  • अधिक आरोग्यपूर्ण आणि त्याच वेळी कर्बवायूंचे उत्सर्जन करणाऱ्या आहाराचा पर्याय अधिक लोकांनी निवडला पाहिजे. विशेष म्हणजे रोजच्या आहारातून काही घटकांचे प्रमाण कमी करावे लागेल इतकेच. उदा. जर आपण आपल्या आहारातून लाल मांसाचे प्रमाण कमी करून त्याऐवजी चिकन, अंडी किंवा वाटाणा यातून प्रथिनांचे पूर्तता करू शकलो, तर ते आपल्या आरोग्याबरोबरच पृथ्वीच्या पर्यावरणासाठीही फायद्याचे ठरू शकते. - प्रा. दियागो रोज, तुलाने विद्यापीठ.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com