मधमाशीपालनातून उदायान यांनी मिळविले उत्तम उत्पन्न

मधमाशीपालनातून उदायान यांनी मिळविले उत्तम उत्पन्न
मधमाशीपालनातून उदायान यांनी मिळविले उत्तम उत्पन्न

भारतीय आणि नांगीरहित मधमाशी पालनातून शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढीसह उत्तम स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, हे केरळ राज्यातील शेतकरी उदायान यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. उदायान यांच्याकडे केवळ ६० गुंठे शेती असून, त्यांचे उत्पन्न पूर्वी फक्त ६० हजार रुपये होते. मधमाशीपालनानंतर त्यात वाढ होऊन ते ४.२५ लाख रुपयांपर्यंत पोचले आहे. त्यातील ३.७५ लाख रुपये उत्पन्न मधमाशी वसाहती व मध यांच्या विक्रीतून मिळाले आहे. या उत्पन्नामुळे मधमाशीपालनाकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टिकोन आशादायी झाला आहे.     श्री. उदायान हे पूर्वी केरळ राज्य परिवहन महामंडळामध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत. त्यांना केवळ ७ हजार रुपये पगार होता. यामध्ये उत्पन्नामध्ये घरखर्च चालवणे अत्यंत कठीण होऊ लागल्याने नव्या व्यवसायाच्या शोधामध्ये होते. त्या उद्देशाने त्यांनी कासारगौड येथील कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली. भारतीय मधमाशी पालनाविषयी माहिती मिळाल्याने त्यात प्रशिक्षण घेतले. या उद्योगासाठी मोठ्या शेती किंवा क्षेत्राची आवश्यकता नसल्याने एक मोठी अडचण दूर झाली. त्यांच्याकडे केवळ ६० गुंठे शेती असून, त्यामध्ये आधीच नारळाची ३७ झाडे, मिरीची ९७ झाडे, केळी यासह भाज्यांचे उत्पादन घेतले जाते. एक गाय असून, तिच्या चाऱ्याची सोयही त्यातूनच केली जाते. सध्याच्या शेतीमध्ये कोणतेही बदल न करता नवीन उद्योग करणे शक्य होते. असे आहे तंत्रज्ञान मधमाशीपालन हे शाश्वत शेतीसाठी आवश्यक आहे. त्यातून मध, मेण यांचे उत्पादन मिळताना परागीकरणाद्वारे अन्य पिकांच्या उत्पादनामध्ये भर पडते. उदायान यांनी केव्हिके मधून पूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या व मधमाशीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या अंबू यांची भेट घेतली. त्यांच्याकडून मधमाशीपालन व्यवसायाची माहिती व अनुभव घेतला. विशिष्ट आकाराचे मधमाशी बॉक्स आणून पाच वसाहतीपासून नैसर्गिक मधमाशीपालनाला सुरवात केली. त्यासाठी त्यांनी बांबूच्या दांड्याचा वापर केला. पुढे मधमाश्या आणि त्यांच्या वसाहतींचे आठवड्यातून एकदा निरीक्षण करू लागले. त्यातून या लहान आकाराच्या मधमाश्या झाडे किंवा पोकळ्यामध्ये वसाहत करण्याऐवजी वाळलेल्या बांबूमध्ये वसाहत करण्याला प्राधान्य देत असल्याचे आढळले. त्यातून त्यांनी एक कल्पना लढवली. बांबूच्या दांड्यासह नैसर्गिक मधमाशी वसाहती वेगळ्या करण्याचे तंत्र तयार केले. या तंत्रामुळे काही कालावधीने त्यातील काही वसाहतींची विक्री करणेही त्यांना शक्य झाले. फळांची संख्या व आकार वाढला

  • मधमाश्यांमुळे बागेतील उत्पादनामध्ये वाढ झाली. त्यांच्या नारळांच्या झाडावरील फळांची संख्या व आकार लक्षणीयरीत्या वाढला. त्यांना एका झाडापासून सरासरी ९३ फळे प्रति वर्ष मिळाली. पूर्वी केवळ ६६ फळे प्रति वर्ष मिळत. पूर्वी या फळांचे वजन ३८५ चे ४५० ग्रॅम (सरासरी ४२५ ग्रॅम) मिळत असे, त्यात वाढ होऊन ४९० ते ५६० ग्रॅम (सरासरी ५३० ग्रॅम) पर्यंत मिळाले.  त्याच प्रमाणे नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून घेतलेल्या काकडी आणि कारले या पिकांचेही भरघोस उत्पादन मिळाले.  
  • मध गावाकडे वाटचाल
  • मधमाशी पालनाच्या उद्योगामुळे शेतीही शाश्वत होते. कृषी उत्पादनामध्ये वाढ मिळते. यासोबतच स्वयंरोजगारासाठी मधमाशीपालन ही उत्तम संधी आहे. हे लक्षात आल्याने कारादका पंचायतीने संपूर्ण गाव मध गांव हा प्रकल्प राबवण्याचा उद्देश ठेवला आहे. त्यात प्रत्येक कुटूंहामध्ये किमान एक नांगीरहित मधमाशी वसाहत असणार आहे. यातून अन्न आणि पोषकतेची समस्या कमी होईल.  ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये महिला आणि तरुणांना मधमाशी पालनामुळे स्वयंरोजगार उपलब्ध होऊ शकतो.
  • आर्थिक फायदा  

  • उदायान यांनी दर आठवड्याला ५ ते ७ नैसर्गिक मधमाशी वसाहती गोळा केल्या. त्यांच्याकडे सध्या सुमारे ३०० नांगीरहित मधमाश्यांच्या वसाहती तयार आहेत. आतापर्यंत त्यांनी ६०० वसाहती प्रति वसाहत १२०० रुपये प्रमाणे विकल्या. त्याच प्रमाणे १०० किलो मध १५०० रुपये प्रति किलो दराने विकला. या व्यवसायातील गेल्या तीन वर्षांमध्ये ८ लाख ७० हजार उत्पन्न मिळाले.
  • या सोबतच भारतीय मधमाश्यांच्या ७० वसाहती त्यांनी शेतामध्ये जपल्या आहेत. त्यांच्याकडे भारतीय मधमाश्या आणि नांगीरहित मधमाशी अशा दोन्ही प्रकारचा मध विक्रीसाठी उपलब्ध असतो. त्यासाठी त्यांनी युनिक हनी हा ब्रॅण्ड तयार केला आहे. देशी मधमाश्यांचा मध हा पोषकता, गंध आणि चव या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
  • नांगीरहित मधमाशी (डॅमर बी)पासूनच्या मधाला त्याच्या औषधी गुणधर्मामुळे खूप मागणी असते. मागणीच्या तुलनेमध्ये शुद्ध मधाची उपलब्धता कमी असते. एक मधमाशी वसाहतीपासून प्रति वर्ष केवळ २०० ते ९०० ग्रॅम (सरासरी ४०० ग्रॅम) मध मिळतो.
  • २०१७-१८ या वर्षी उदायान यांना ४.२५ लाख रु. उत्पन्न मिळाले.  ४९९५ नारळाच्या विक्रीतून ६० हजार रु., नांगीरहित मधमाशीचा मध ५० किलो विक्रीतून ७५ हजार रु., १५० नांगरहित मधमाशी वसाहतीच्या विक्रीतून १.८० लाख रुपये मिळाले. भारतीय मधमाशीच्या मधाचे उत्पादन  ४०० किलो मिळाले असून, त्यापासून १.२० लाख रु. मिळाले.
  • २०१३-१४ या वर्षामध्ये मधमाशीपालन करत नसताना शेतीतून त्यांना केवळ ६० हजार रुपये उत्पन्न मिळाले होते. हे पाहता मधमाशीपालनातून त्यांच्या उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.
  • मधमाशीपालनाच्या प्रसाराला मिळाला वेग उदायान यांच्या यशाला स्थानिक आणि राष्ट्रीय दैनिकांनी, वृत्तवाहिन्यांनी चांगली प्रसिद्धी दिल्यामुळे गाव परिसरासह अनेक जिल्ह्यातून तरुणांचा ओढा या उद्योगाकडे वळला आहे. कृषी विज्ञान केंद्रामध्ये प्रशिक्षणासह मधमाशी वसाहती आणि मधाला भरपूर मागणी येत आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com