बायोप्रिंटर तंत्राने भरतील मोठ्या जखमा
बायोप्रिंटर तंत्राने भरतील मोठ्या जखमा

बायोप्रिंटर तंत्राने भरतील मोठ्या जखमा

बहुतांश लोकांना संगणक आणि प्रिंटर यांचा एकच उपयोग म्हणजे प्रिंट करणे माहीत असतो. मात्र, जग आता थ्रीडी प्रिंटर तंत्राकडे वळले आहे. त्याचाच एक भाग असलेल्या बायोप्रिंटर तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये क्रांती होण्याची शक्यता आहे. मोठ्या जखमा किंवा भाजलेल्या त्वचा भरण्यासाठी त्याच रुग्णांच्या पेशींचा वापर बायोप्रिंटर तंत्राने करण्यात अमेरिकन संशोधकांना यश आले आहे. आपल्याला संगणकांवरून दिलेली प्रिंट एखाद्या प्रिंटरमधून येणे इतकेच माहीत असते. त्यापेक्षा प्रगत असे थ्रीडी प्रिंटर हे तंत्रज्ञान भविष्यामध्ये प्रचंड उलथापालथ करणारे तंत्रज्ञान मानले जात आहे. या तंत्रज्ञानामध्ये सध्याच्या संपूर्ण उद्योगक्षेत्र आणि कामगार क्षेत्रावर चांगला आणि वाईट दोन्ही परिणाम करण्याची क्षमता आहे. त्याचीच एक बाजू असलेल्या थ्रीडी बायोप्रिंटरमधील एक नावीन्यपूर्ण संशोधन अमेरिकेमध्ये करण्यात आले. या प्रिंटरद्वारे माणसांच्या जखमांवर पेशींच्या साह्याने थर देणे शक्य होणार आहे. एकावर एक दिलेल्या अशा थरामध्ये जखमा लवकर भरून येतील, असा दावा संशोधकांनी केला आहे. अमेरिकेतील वेक फॉरेस्ट इन्स्टिट्यूट फॉर रिजनरेटिव्ह मेडिसीन (व्हिफार्म) येथील सहायक प्रो. सीन मर्फी यांनी सांगितले, की सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे हे तंत्रज्ञान, यंत्रणा सहजतेने प्रत्यक्ष जागेवर नेणे शक्य आहे. मोठ्या जखमांचे स्कॅनिंग करून, त्याचा आकार निश्चित करण्यात येतो. त्यानंतर त्या जागेवर आवश्यक तितक्या पेशींचे थर दिले जातात. असे काम करतो बायोप्रिंटर ः सामान्य त्वचेच्या मुख्य पेशी (डेर्मल फिब्रोब्लास्ट आणि इपिडेर्मल केराटिनोसायट्स) या लहान बायोप्सीद्वारे सहजतेने वेगळ्या केल्या जातात. जखमा भरून येण्यामध्ये फिब्रोब्लास्ट या पेशीद्वारे होणारी पेशीबाह्य जुळवाजुळव आणि टकराव यांचा मुख्य वाटा असतो. तर केराटिनोसायट्स या पेशी प्रामुऱ्याने त्वचेच्या सर्वांत बाहेरील थरांमधील एपिडेर्मिसमध्ये आढळतात. या पेशी हायड्रोजेलमध्ये मिसळून बायोप्रिंटरमध्ये ठेवल्या जातात. या उपकरणामध्ये असलेल्या अंतर्गत प्रतिमांकन तंत्र आणि सॉफ्टवेअरला पुरवलेल्या माहितीनुसार प्रिंट हेड जखमेच्या नेमक्या जागेवर पेशींचे थर देत जातो. एकावर एक असे दिल्याने जखम लवकर भरून येते. हे संशोधन ‘जर्नल सायंटिफिक रिपोर्टस्’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. संशोधकांनी या यंत्रणेच्या पूर्ववैद्यकीय प्रारूपांवर यशस्वी चाचण्या घेतलेल्या आहेत. पुढील टप्प्यामध्ये माणसांवर वैद्यकीय चाचण्या घेण्यात येणार आहेत. सध्याची त्वचा पुनर्रोपणाची पद्धत ः

  • सध्या जखमा किंवा भाजलेल्या जखमावर लावण्यांसाठी योग्य प्रमाणात त्वचा मिळवणे अत्यंत कठीण बाब ठरते. सामान्यतः त्याच रुग्णांच्या मांडीवरील त्वचा काढून, त्याचा वापर केला जातो. मात्र, मोठ्या प्रमाणात भाजलेल्या माणसांसाठी हा पर्याय तितकाच योग्य राहत नाही. अन्य दात्यांच्या त्वचा हा एक पर्याय असला तरी असे पुनर्रोपण शरीराच्या प्रतिकारतेमुळे नाकारले जाण्याचा किंवा व्रण राहण्याचा धोका असतो.
  • व्हिफार्म च्या संचालक अॅन्थोनी अटाला व संशोधक जेम्स यू यांनी सांगितले, की नव्या तंत्रामध्ये नव्या त्वचेची निर्मिती शरीराबाहेर त्याच रुग्णांच्या साह्याने केली जात असल्यामुळे नाकारले जाण्याचा धोका कमी होतो. प्रक्रिया अत्यंत वेगाने व वेदनारहित पूर्ण होते. अन्य उपचारामध्ये जखम भरण्यासाठी केवळ मदत केली जाते. या तंत्रामध्ये प्रत्यक्ष त्वचेची निर्मिती केली जाते, हेच वैशिष्ट्य आहे.
  • यासाठी उपयुक्त

  • अपघात, युद्धामध्ये झालेल्या मोठ्या जखमा आणि भाजल्यामुळे खराब झालेली त्वचा यांचे प्रमाण १० ते ३० टक्क्यापर्यंत असते.
  • सध्या मधुमेही लोकांच्या जखमा न भरण्याची समस्या तीव्रतेने जाणवत आहे, त्यांच्यासाठीही हे तंत्रज्ञान जीवनदायी ठरणार आहे. त्यातही मधुमेहींचे अंतर्गत ताणामुळे निर्माण झालेले अल्सर बरे करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपचार करावे लागत असल्याने अत्यंत खर्चिक मानले जातात.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com