केरळ जैव कार्षका समितीला आंतरराष्ट्रीय नावीन्यपूर्ण सेंद्रिय शेती पुरस्कार

केरळ जैव कार्षका समितीला आंतरराष्ट्रीय नावीन्यपूर्ण सेंद्रिय शेती पुरस्कार
केरळ जैव कार्षका समितीला आंतरराष्ट्रीय नावीन्यपूर्ण सेंद्रिय शेती पुरस्कार

केरळ राज्यामध्ये गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत सेंद्रिय शेतकऱ्यांच्या केरळ जैव कार्षका समिती या गटाला नावीन्यपूर्ण सेंद्रिय शेतीचा मानाचा जागतिक पुरस्कार जाहीर झाला आहे. चीन येथील क्षीचोंग नगरपालिका आणि दक्षिण कोरिया येथील इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गनिक अॅग्रिकल्चर मूव्हमेंट (IFOAM), आशिया यांच्या वतीने गुरुवारी (ता. ३०) समितीला देण्यात आला. ५००० अमेरिकी डॉलर आणि सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या केरळ जैव कार्षका समितीचे सुमारे १५ हजार शेतकरी सदस्य आहेत. समितीचे कामकाज लोकशाही पद्धतीने चालवण्यात येते. त्याचप्रमाणे संस्थेची आर्थिक निधी गोळा करण्याची पारदर्शक पद्धत अवलंबण्यात येते. या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याची माहिती समितीचे राज्य सचिव अशोककुमार व्ही. यांनी दिली. ते पुढे म्हणाले, की या समितीमध्ये अल्पभूधारकांसह मोठे शेतकरी असून, भाजीपाला, अन्नधान्य उत्पादनासाठी नगदी पिकेही घेतात. समितीचे कामकाज चालवण्यासाठी अध्यक्ष, सदस्य व संचालक म्हणून यातील शेतकऱ्यांची निवड होते. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व येईल, असे पाहिले जाते. सर्व शेतकरी एकत्र येऊन सेंद्रिय शेती पद्धती आणि संबंधित समस्येवर चर्चा करून मार्ग काढतात. त्यानंतर प्रत्येक पंचायत, तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर संघटनात्मक पदे लोकशाही पद्धतीने निवडली जातात. अन्य बहुतांश शेतकरी गट हे स्वयंसेवी पद्धतीने काम करतात. त्यांच्या विविध कार्यक्रमांसाठी देणग्या स्वीकारल्या जातात. अशा वेळी समितीमार्फत सदस्यांकडून वर्गणी काढून असे कार्यक्रम केले जात असल्याची माहिती दिली. नावीन्यपूर्णता

  • समिती स्थानिक ते राज्य पातळीवरील पारंपरिक भात आणि भाजीपाला वाणांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. पारंपरिक भात जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. अशा शेतकऱ्यांचे उत्पादन व बियाणे अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोचवले जाते.
  • पारंपरिक भाज्या, उदा. भेंडी, वांगी, शेंगा, हिरवी मिरची यांच्या जुन्या जातींची लागवड व संवर्धन केले जाते.
  • नव्याने सेंद्रिय शेतीमध्ये उतरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षणाची सोय केली आहे. त्यात वर्ग आणि शिक्षक अशा रचनेऐवजी सैद्धांतिक माहितीसह प्रात्यक्षिकही दाखवले जाते. २० वेगवेगळ्या शेतांमध्ये २० रविवारी असे प्रशिक्षण वर्ग होतात, त्याचे शिक्षक हे स्वतः शेतकरी असतात.
  • सेंद्रिय पद्धतीने पिकांच्या लागवडीपासून काढणीपर्यंतची माहिती शेतकऱ्यांना दिली जाते. सोबतच सेंद्रिय उत्पादनांतील पोषक घटक टिकवून ठेवणाऱ्या स्वयंपाक पद्धतींचाही त्यात समावेश असतो.
  • केवळ कीडनाशकांद्वारेच विषारी रसायने आपल्या घरात येतात असे नाही, तर रंग, स्वच्छता द्रावणे यामध्येही ती असतात. अशी उत्पादने ओळखून त्याला पर्यायी उत्पादनांच्या वापराविषयी माहिती मुले व महिलांसह सर्वांना दिली जाते.
  • दरवर्षी विविध जिल्ह्यांमध्ये सेंद्रिय शेती महोत्सवाचे आयोजन केले जाते. यात सेंद्रिय शेतीसंबंधी माहितीचा प्रसार केला जातो. त्याचप्रमाणे प्रत्येक जण आपले अनुभव मांडतो. २०१९ मध्ये कन्नूर येथील वडकारा येथे महोत्सव पार पडला. यात राज्याबाहेरील शेतकऱ्यांचाही समावेश असतो. गेल्या वर्षी तमिळनाडू येथील स्वामिनाथन या शेतकऱ्यांने आपले सेंद्रिय कपाशी उत्पादनांचे प्रयोग येथे मांडले होते. या सेंद्रिय कपाशी लागवडीसाठी बियाणेही देशी वापरण्यात आले होते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com