तीव्र वातावरणासाठी आधुनिक गहू जाती सक्षम

तीव्र वातावरणात आधुनिक गहू जातीही सक्षम
तीव्र वातावरणात आधुनिक गहू जातीही सक्षम

आधुनिक गहू जातींना खते आणि पीकसंरक्षणाची मोठी गरज असून, त्याशिवाय तीव्र वातावरणामध्ये चांगले उत्पादन मिळणार नाही, असा एक सामान्य समज आहे. मात्र, क्वीन्सलॅंड विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या विस्तृत अभ्यासामध्ये दुष्काळ आणि तीव्र वातावरणामध्ये पीकसंरक्षणाशिवायही या आधुनिक गहू जाती जुन्या जातींइतक्याच किंबहुना अधिक चांगल्या प्रकारे वाढू शकत असल्याचे पुढे आले आहे. हे संशोधन ‘नेचर प्लॅन्ट्स टुडे’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. क्वीन्सलॅंड विद्यापीठातील संशोधक डॉ. काई वॉस-फेलस यांनी तीव्र वातावरणामध्ये गहू पिकांच्या विविध जातींच्या वाढीसंदर्भात विस्तृत अभ्यास केला आहे. या संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. वॉस-फेलस म्हणाले की, सातत्याने निवडपद्धतीने अधिक उत्पादनक्षम गहू जातींचा विकास करण्यात आलेला आहे. मात्र, या प्रक्रियेमध्ये त्यांची तीव्र वातावरणामध्ये तग धरण्याच्या किंवा वाढण्याच्या क्षमता घटल्या असल्याचा दावा करण्यात येतो. तसेच, या जातींच्या वाढीसाठी अधिक खतांची आणि पीकसंरक्षणाच्या उपायांची आवश्यकता आज आपण मान्य करून टाकली आहे. मात्र, आमच्या अभ्यासामध्ये मिळालेल्या माहितीसाठ्यातून आधुनिक जाती खते, बुरशीनाशके आणि पाणी यांच्या मात्रा कमी करून निर्माण केलेल्या तीव्र वातावरणामध्ये चांगल्या वाढत असल्याचे समोर आले आहे. या नव्या जातींतीतल जनुकीय विविधता ही तितकीच समृद्ध असून, त्यांच्याद्वारे उत्पादनामध्ये २३ टक्क्यांपर्यंत वाढ मिळविण्याची क्षमता आहे. हे निष्कर्ष शेतकऱ्यांबरोबरच पर्यावरणतज्ज्ञांनाही आश्चर्यचकित करणारे ठरू शकतात. पूर्वी खत आणि कीडनाशकांशिवाय वाढविताना तयार होणाऱ्या तीव्र वातावरणासाठी जुन्या पारंपरिक गहू जातींचा वापर करण्याविषयी आग्रह धरला जात असे. या निष्कर्षामुळे सेंद्रिय उत्पादन पद्धतीमध्येही आधुनिक गहू जातींपासून चांगले उत्पादन घेणे शक्य आहे.

  • गहू हे जागतिक पातळीवरील सर्वांत महत्त्वाचे धान्य पीक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दुष्काळी वातावरणामुळे उत्पादनात घट झाली आहे. भविष्यात अशाच तीव्र वातावरणांचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशा वातावरणासाठी योग्य गहू जातींचा शोध गेल्या ५० वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. त्यासाठी जस्टस लाईबिग युनिव्हर्सिटी जिईबेन येथील प्रो. रॉड स्नोडोन यांच्या नेतृत्वाखाली अन्य सात जर्मन विद्यापीठांच्या सहकार्याने संशोधन सुरू आहे.
  • QAAFI अंतर्गत प्रो. बेन हायेस यांच्या नेतृत्वाखाली जनुकीय विश्लेषण केले जात आहे. त्यात अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात पश्चिम युरोपमधील कृषी क्षेत्रासाठी महत्त्वाच्या अशा २०० गहू जातींचा समावेश आहे.
  • यासोबत गहू जातींच्या अधिक, मध्यम आणि कमी रासायनिक निविष्ठा वापरासह चाचण्या घेण्यात येत आहेत. जनुकीय माहिती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे आमच्या निष्कर्षांना आणखी पुढील पातळीपर्यंत नेणे शक्य होईल, असा विश्वास डॉ. वॉस-फेलस यांनी व्यक्त केला.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com