गवते घेतात शेजाऱ्याकडून आवश्यक जनुके

गवते घेतात शेजाऱ्याकडून आवश्यक जनुके
गवते घेतात शेजाऱ्याकडून आवश्यक जनुके

इंग्लंड येथील शेफिल्ड विद्यापीठातील संशोधकांना गवते उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये आपल्या शेजाऱ्यांकडून जनुके घेत असल्याचे दिसून आले आहे. स्पर्धात्मक वातावरणामध्ये वाढीसाठी योग्य ते फायदे मिळविण्यासाठी जंगली गवतांनी स्वतःमध्ये नैसर्गिकरीत्या जनुकीय सुधारणा घडवून आणल्याचे स्पष्ट झाले आहे. संशोधकांनी अॅल्लोटेरोप्सिस सेमियालॅटा या गवतांची जनुकीय संरचनेचे विश्लेषण केले असून, त्याबाबतचे निष्कर्ष ‘जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ दी नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’मध्ये प्रकाशित केले आहे. सध्या जागतिक पातळीवर तणनाशकांना सहनशील अशा जनुकांचा समावेश असलेल्या पिकांची जनुकीय तंत्रज्ञानाद्वारे निर्मिती केली जात आहे. या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड सुरू झाल्यानंतर ही जनुके अन्य गवते व तणांमध्ये प्रवाहित होऊ शकतील, अशी रास्त भीती संशोधकांमध्ये आहे. त्यातून तणांमध्येही तणनाशकांसाठी सहनशीलता विकसित होण्याचा धोका संभवतो. हे टाळण्यासाठी आडव्या पद्धतीच्या जनुकीय देवाणघेवाणीवर (हॉरीझॉन्टल जीन ट्रान्स्फर) संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आहे. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेद्वारे आधीच्या पिढीकडून पुढील पिढीकडे जनुकांचे प्रवाहित होण्याच्या पद्धतीपेक्षा (याला इंग्रजीमध्ये ‘व्हर्टिकल जीन ट्रान्स्फर’ असे म्हणतात.) ही पद्धती भिन्न आहे. व्हर्टिककल जीन ट्रान्स्फर ही सामान्य नैसर्गिक प्रक्रिया असून, अपवादात्मक स्थितीमध्ये निसर्गात हॉरीझॉन्टल जीन ट्रान्स्फरचीही उदाहरणे दिसून येतात. शेफिल्ड विद्यापीठातील प्राणी आणि वनस्पतीशास्त्र विभागातील संशोधकांना गवतांच्या काही प्रजाती हा सामान्य नैसर्गिक नियम तोडत असल्याचे दिसून आले. या जंगली गवतांनी आपल्या अत्यंत दूरच्या संबंधातील प्रजातींच्या जनुकांचे ग्रहण केल्याचे लक्षात आले. याविषयी माहिती देताना डॉ. ल्यूक ड्युनिंग यांनी सांगितले, की ही जंगले गवते सरळ अन्य प्रजातींपासून जनुकांची चोरी करतात. उत्क्रांतीच्या एकूण प्रक्रियेला बगल देतात. एखाद्या स्पंजाप्रमाणे आपल्या शेजाऱ्याकडून उपयुक्त जनुकीय माहिती शोषून घेतात. ही बाब त्यांना तग धरण्यासाठी किंवा अन्य प्रजातींशी स्पर्धा करण्यासाठी फायदेशीर ठरते. सामान्य प्रक्रियेद्वारे ही क्रिया घडण्यासाठी लक्षावधी वर्षे लागली असती. गवते अत्यंत महत्त्वाची... पृथ्वीवरील आर्थिकदृष्ट्या आणि पर्यावरणदृष्ट्या सर्वांत महत्त्वाच्या वनस्पती आहेत. त्यात लागवडीखालील गहू, मका, भात, बार्ली, ज्वारी आणि ऊस यांसारखी महत्त्वाची पिकेही आहेत. संशोधकांनी ऑफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया या भागांमध्ये आढळणाऱ्या अॅल्लोटेरोप्सिस सेमियालॅटा या गवताची निवड केली. या गवतांच्या जनुकीय घटकांची तुलना सुमारे १५० अन्य गवतांशी (त्यात भात, मका, भरडधान्य, बार्ली, बांबू इ. ) केली. डॉ. ड्युनिंग म्हणाले, की आम्ही अॅल्लोटेरोप्सिस सेमियालॅटा या गवताच्या आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातील उष्ण आणि समशीतोष्ण भागातील प्रजातींचे नमुने घेतले. त्यांच्या जनुकांमध्ये झालेले बदल तपासण्यात आले. ज्या ठिकाणी जनुकांची देवाणघेवाण झालेल्या गवतांना असंख्ये फायदे मिळाल्याचे स्पष्ट होते. सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घेणे, तग धरणे यासाठी फायदा झाला आहे. हा प्रकार केवळ अॅल्लोटेरोप्सिस सेमियालॅटा या गवतापुरताच मर्यादित नसून अन्य गवतांमध्येही अशीच जनुकांची देवाणघेवाण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com