झोपेमुळे वाढते चेतापेशीतील समन्वयाची कार्यक्षमता

झोपेमुळे वाढते चेतापेशीतील समन्वयाची कार्यक्षमता
झोपेमुळे वाढते चेतापेशीतील समन्वयाची कार्यक्षमता

आयुष्याचा तिसरा हिस्सा माणसे झोपण्यामध्ये का घालवतात, असा प्रश्न एखाद्या कार्यक्षमतेविषयी चर्चा करणाऱ्याला पडू शकतो. तसाच तो संशोधकांनाही सतावत आला आहे. माणूस किंवा प्राण्यांच्या झोपेविषयी अशा प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी बार-इलान विद्यापीठामध्ये काम सुरू आहे. झोपेमध्ये प्राण्याच्या चेतापेशींमध्ये व डीएनएमध्ये दिवसभराच्या कामामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांवर काम केले जात असल्याचे दिसून आले आहे. माणसाची किंवा प्राण्याची झोप ही आळशीपणाचे लक्षण मानले जाते. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये अनेक बदल घडले असले तरी झोप ही बाब वैश्विक आवश्यकतेची राहिली आहे. सर्व प्राण्यांच्या चेतासंस्थेसाठी ती अत्यंत आवश्यक मानली आहे. मात्र, तरीही झोपेमध्ये अन्य भक्षकाकडून फडशा पाडला जाण्याचा धोका असतानाही प्राणी कसे झोपू शकतात, यासारखे प्रश्न जैवशास्त्राच्या अभ्यासकांना सातत्याने पडत असतात. याविषयी नुकतेच ‘जर्नल नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आलेले इस्त्राईलमधील एक संशोधन अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. इस्राईलमधील बार इलान विद्यापीठातील संशोधकांनी झोपेची कार्यपद्धती आणि त्यातील अडथळ्यांमुळे मेंदूच्या कार्यक्षमता, वार्धक्य आणि अन्य मेंदूचे विकार यावर होणाऱ्या परिणाम उलगडले आहेत. प्रो. अॅप्पेलबाऊम यांच्यासह त्यांचे पीएच. डी.चे विद्यार्थी डेव्हिड झादा आणि सहलेखक डॉ. टॅली लेरेर-गोल्डश्टेन, डॉ. इरिना ब्रोनश्टेन आणि प्रो. युवाल गरीनी यांनी झोपेविषयी काही गृहितके मांडून अभ्यासाला सुरवात केली. त्यांनी जिवंत झेब्राफिश या माशाच्या झोपेचा थ्रीडी टाइम लॅप्स प्रतिमा तंत्राने अभ्यास केला आहे. त्यातून त्यांनी झोपेचे एका गुणसूत्राच्या प्रक्रियेवर होणाऱ्या परिणामावर लक्ष केंद्रित केले. त्यातून चेतापेशींच्या अंतर्गत देखभालीसाठी झोप अत्यंत आवश्यक असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. डीएनएला नुकसान पोचवण्यामध्ये किरणोत्सार, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि चेतापेशींचे कार्य यांची भूमिका असते. त्याच्या देखभालीसाठीची यंत्रणा प्रत्येक पेशीमध्ये असते. या अभ्यासामध्ये जागेपणी जेव्हा गुणसूत्राची कार्य कमी असते, डीएनए हानी पोचवणारे घटक साठत जातात. ठराविक काळाने ते असुरक्षिततेच्या टप्प्यावर पोचतात. प्रत्येत वेगळ्या चेतापेशीमध्ये (न्युरॉन) गुणसूत्रांचे होणारे नुकसान सामान्य पातळीवर आणण्याचे काम झोप करते. जागेपणीही क्रिया सुरू असली तरी ती पुरेशी ठरत नाही. त्यासाठी मेंदूला विश्रांती मिळण्याची म्हणजेच झोपेची आवश्यकता असते. त्याविषयी माहिती देताना प्रो. लियोर अॅप्पेलबाऊम यांनी सांगितले, की  रस्ता सततच्या वापरामुळे ज्या प्रमाणे खराब होतो, त्याच प्रमाणे सततच्या कामकाजामुळे चेतापेशींच्या संपर्क यंत्रणांमध्ये अडथळे निर्माण होऊ लागतात. रस्त्याची दुरुस्ती कमी रहदारीच्या वेळी करणे अत्यंत सोईस्कर आणि कार्यक्षम असते, तोच प्रकार चेतापेशींबाबत होतो. सतत दक्ष किंवा जागे राहण्याची किंमत डिएनएच्या नुकसानीतून चुकवावी लागते. झोपेमुळे प्रत्येक न्युरॉन्समधील केंद्रकाच्या पातळीवर देखभालीच्या कामामध्ये सुसूत्रीकरण होते.  संशोधकांना झेब्राफिशचे रात्रीच्या वेळी संपूर्ण शरीर विश्रांती घेत असताना ही गुणसूत्रे अधिक कार्यरत आढळली. याचाच अर्थ डीएनएमधील नुकसानीची देखभाल करण्याची कार्यक्षमता या काळात वाढली. प्रो. अॅप्पेलबाऊम यांनी सांगितले, की आम्हाला झोप, गुणसूत्रांचे कार्य, न्युरॉन्स पातळीवर कार्य आणि डीएनए नुकसान आणि देखभाल सरळ संबंध असल्याचे आढळले आहे. जागेपणी गुणसूत्रांच्या पातळीवर जमा होत जाणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी झोप अत्यंत महत्त्वाची ठरते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com