स्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड फायदेशीर

स्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड फायदेशीर
स्थानिक जातींची सेंद्रिय पद्धतीने लागवड फायदेशीर

संकरीत जाती आणि रसायनांचा वापर यामुळे शेतकऱ्यांना बाजारातील निविष्ठांवर अवलंबून राहावे लागते. त्याऐवजी स्थानिक पारंपरिक जाती लागवडीखाली आणून, त्यांची व्यावसायिक शेती करण्याचे प्रयोग तमिळनाडूमध्ये शेतकऱ्यांच्या पातळीवर सुरू आहेत. त्यातून भाताच्या तिरुचेंगोडे सांभा, आयन सांभा या जातीबरोबरच वांग्याची सथ्यमंगलम् ही जात उत्तम उत्पादन देणाऱ्या म्हणून पुढे आल्या आहे. कमी खर्चामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ दिसून येत आहे. मोदाकुरीची (तमिळनाडू) येथील आर. युवसेन्थीलकुमार यांनी सेंद्रिय शेतीमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असून, सन २०१२ पासून आपल्या दोन एकर शेतामध्ये ‘आयआर२०’ आणि ‘एडीटी३८’ या सारख्या भात जातींची लागवड करतात. रासायनिक खतांच्या वापराशिवाय स्थानिक जातींची लागवड करण्याची आवड उत्पन्न झाली आहे. उत्तम भातजातींच्या शोधामध्ये त्यांनी जवळपास वर्षभर भ्रमंती केली. त्यांनी काही जातींची लागवड करून पाहिली, मात्र त्याचे उत्पादन समाधानकारक नव्हते. गावातील वयस्कर लोकांच्या चर्चेतून त्यांना १९७० पूर्वी लागवडीमध्ये असलेल्या तिरुचेंगोडे सांभा आणि आयन सांभा या जातीविषयी माहिती कळाली. अलीकडे संकरीत जातींची लागवड वाढल्यामुळे या जातींचे बियाणे स्थानिक पातळीवर उपलब्ध झाले नाहीत. २०१४ मध्ये तमिळनाडू कृषी विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र, मनिला येथील सुमारे ३३ स्थानिक जातींचे बियाणे आयात केल्याचे समजले. त्यातून त्यांना तिरुचेंगोडे सांभा आणि आयन सांभा जातीचे केवळ ५० ग्रॅम बियाणे कसेबसे उपलब्ध झाले. पुढील चार वर्षाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून त्यांनी बियाणे वाढवत नेले. आता एरोडे- कोडूमुंडी- चिरुचेंगोडे पट्ट्यातील १२ शेतकऱ्यांच्या ४५ एकर क्षेत्रामध्ये तिरुचेंगोडे सांभा या स्थानिक भात जातीची लागवड होत आहे. गेल्या वर्षी या जातीखालील क्षेत्र ११ एकर होते. ही जात १३५ दिवसांमध्ये पक्व होते आणि त्याचे प्रति एकर सरासरी उत्पादन १७०० किलो इतके आहे. या जातीविषयी माहिती देताना ते म्हणाले, की या जातींच्या लागवडीसाठी आम्ही अगदी हिरवळीचे खतही वापरत नाही. या वर्षी या जातींच्या भाताची लागवड ३३.८ एकरपर्यंत वाढले आहे. शेतकऱ्यांना या जातींला चांगले दर मिळत आहे. त्यातही सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या स्थानिक जातींच्या भाताचे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने घेतले जाते. त्यासाठी खते आणि रसायनांचा वापर केला जात नाही. अन्य जातींच्या तुलनेमध्ये या भातजातीपासून पेंढ्यांचे प्रमाण अधिक मिळते, त्याचा वापर पशूखाद्य म्हणून होऊ शकतो.

  • युवसेंथिलकुमार आणि त्यांच्या मित्रांनी २०१४ मध्ये ‘रिव्हर बेसिन फौंडेशन’ची स्थापना केली असून, त्याद्वारे स्थानिक जातींना प्रोत्साहन दिले जाते. या वर्षी त्यांनी आयन सांभा जातींची लागवड प्रायोगिक तत्त्वावर एक एकर क्षेत्रामध्ये केली आहे.
  • स्थानिक जाती या प्रदेशानुसार स्थिरावलेल्या आहेत. त्या त्या भागामध्ये वर्षाच्या विशिष्ट हंगामामध्ये चांगल्या येतात. उदा. तिरुचेंगोडे सांभा ची लागवड १५ ऑगस्ट आणि १५ ऑक्टोबर या काळातच करावी लागते.
  • पुढील टप्प्यामध्ये भाताबरोबरच कडधान्ये, तेलबिया पिकांच्या स्थानिक जातींचा लागवडीला चालना देण्याचे नियोजन फौंडेशनने केले आहे. या जातींच्या लागवजीसाठी इच्छूक शेतकऱ्यांची ओळख पटवली असून, जुन्या शेतकऱ्यांच्या क्षेत्रामध्ये विस्तार करण्यात येईल. त्यातून स्थानिक जाती पुनश्च स्थिरावतील.
  • भाजीपाल्यांच्या स्थानिक जातींची लागवड ः

  • बी. शिवाकुमार हे उद्योगपती असून, अलीकडे शेतकरी बनले आहेत. त्यांनीही मद्रास अय्यर थॉट्टम ही संस्था स्थापन केली असून, त्याद्वारे भाजीपाल्याच्या स्थानिक जातींच्या लागवडीला चालना देत आहेत. त्यांच्या स्वतःच्या सथ्यमंगलम् येथील ७० एकर शेतीपैकी १२ एकरवर भाजीपाल्याची लागवड केली जाते. या जातींचे उत्पादनही चांगले असल्याचा दावा ते करतात. उदा. एक किलोमध्ये स्थानिक पारंपरिक वांग्याच्या जातीचे ४० ते ४५ नग येतात, तर रसायनावर वाढवलेल्या संकरीत जातींची वांगी १८ ते २० बसतात.
  • गेल्या तीन वर्षांमध्ये ते सेंद्रिय शेती आणि स्थानिक जातींकडे वळले आहेत. त्याविषयी माहिती देताना शिवाकुमार म्हणाले की, वांग्यांमध्ये आम्ही सहा ते सात जातींचे प्रयोग केले. त्यातील सथ्यमंगलम वांग्यांची जात ही ग्राहकांकडून स्वीकारली जाणारी आणि रोगांसाठी प्रतिकारक असल्याने तिची लागवड केली जाते. सेंद्रिय पद्धतीमुळे शेतकऱ्यांच्या खते आणि किटकनाशकांच्या वापराचा खर्च वाचतो. स्थानिक जातींना ग्राहकांकडून मागणी असल्याने बाजारात दरही चांगला मिळतो. यातील पोषक घटकांचे प्रमाण अधिक असल्याने ग्राहक आणि शेतकरी अशा दोघांसाठीही मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी ती फायदेशीर ठरू शकते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com